नुकत्याच झालेल्या देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांपैकी ४ राज्यांचे निकाल आज जाहीर झाले. या निकालाने आधी जाहीर झालेले अनेक एग्झिट पोलचे अंदाज चुकीचे ठरवले आहेत. यात काँग्रेसला मिळणारं यश कमालीचं कमी झालं आहे. काँग्रेसला मध्य प्रदेशमध्ये भाजपाविरोधी जनमताचा फायदा मिळेल, अशी आशा होती. मात्र, निकालात भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले. इतकेच नाही तर काँग्रेसचा ४ पैकी ३ राज्यांमध्ये पराभव झाल्याचंही स्पष्ट होत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी यांनी प्रतिक्रिया देत निकालावर आश्चर्य व्यक्त केलं.

रेणुका चौधरी म्हणाल्या, “हा आमच्यासाठी फार मोठा धक्का आहे. कुणाला तरी याची जबाबदारी घ्यावीच लागेल. तीन राज्यांमध्ये पराभव का झाला यावर आम्हाला आत्मपरिक्षणही करावं लागेल. तसेच तत्काळ मैदानात उतरून काम सुरू करावं लागेल.”

हेही वाचा : Madhya Pradesh Election Result 2023 Live: “एग्झिट पोल, वर्तमानपत्रातील रिपोर्टमध्ये…”; आश्चर्य व्यक्त करत काँग्रेस नेते म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आमच्याकडे हातावर हात चोळत बसण्याला वेळ नाही”

“ही एक निवडणूक आहे, ठीक आहे. पुढील पाच महिन्यात लोकसभा निवडणूकही आहे. अनेकदा मतदार राज्यात वेगळ्या पद्धतीने मतं देतात आणि केंद्रात वेगळ्या पद्धतीने मतदान देतात. आता आमच्याकडे हातावर हात चोळत बसण्याला वेळ नाही. आम्ही लढू आणि पुढे जाऊ,” असं मत रेणुका चौधरी यांनी व्यक्त केलं.