अठराव्या लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निवडणुकीत एनडीएला ४०० हून अधिक जागा मिळतील, अशी घोषणा केली होती. तसेच लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याअगोदर दिल्लीत भाजपा पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेऊन “अब की बार ४०० पार” चा नारा दिला होता. मात्र लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या, दुसऱ्या टप्प्यानंतर भाजपाने हा नारा देणे सोडून दिले आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे. नुकतीच त्यांनी सकाळ दैनिकाला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याना ही निवडणूक मोदींना जड जाऊ लागली आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावरही देवेंद्र फडणवीस यांनी थेट उत्तर दिले.
“एकनाथ शिंदेंना अपमानित करायचे नव्हते, म्हणून…”, ठाणे लोकसभेवरून देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान
अजित पवार अभिमन्यू सारखे लढले
या मुलाखतीमध्ये एकनाथ शिंदे, अजित पवार आणि राज ठाकरे यांना बरोबर घेण्याची भाजपावर वेळ का आली? असाही प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अजित पवार यांनी मोदींच्या विकासकामांना पाठिंबा दिला आहे. बारामतीच्या लढाईत दादांच्या कुटुंबानेच त्यांना एकटे पाडले. ते अभिमन्यूसारखे एकटे लढले. भाजपाला त्यांच्या लढ्याचे अप्रूप वाटते.
मोदींना निवडणूक जड जातेय?
ही निवडणूक पंतप्रधान मोदींना जड जात आहे? असा प्रश्न विचारल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “तसे चित्र काही विशिष्ट हितसंबंध असलेल्यांनी तयार केले आहे.” तसेच मोदी आता चारशे पारचा उल्लेख करत नाहीत, असाही प्रश्न यावेळी विचारण्यात आला. त्यावर फडणवीस म्हणाले, “घटना बदलण्याची हाकाटी केली जात आहे. म्हणून हा नारा टाळला जात आहे.”
राज ठाकरेंचं पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, सुषमा अंधारेंची क्लिप दाखवत उद्धव ठाकरेंवर टीका
घटना बदलण्याची चर्चा कधी सुरू झाली?
मार्च २०२४ मध्ये भाजपाचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी घटनादुरुस्ती करण्याबाबतचे विधान केले होते. लोकसभेत बहुमत मिळाल्यानंरत राज्यसभेतही दोन तृतीयांश बहुमत झाल्यानंतर घटनेत दुरुस्ती केली जाईल. काँग्रेसच्या काळात हिंदू समाजावर वर्चस्व गाजविण्यासाठी घटनेत नको ते बदल केले गेले. भाजपाचे बहुमत आल्यानंतर हे सर्व बदल पुर्ववत केले जातील, असे हेगडे म्हणाले होते.