काँग्रेस हा असा पक्ष आहे ज्या पक्षावर भाजपाकडून घराणेशाहीचा आरोप कायम केला जातो. याच बाबत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना विचारलं असता त्यांनी थेट दोन प्रश्न विचारत टीका करणाऱ्या भाजपालाच झापलं आहे. तसंच घराणेशाहीचा आरोप भाजपाने करणं म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असा प्रकार आहे असंही मल्लिकार्जुन खरगेंनी म्हटलं आहे. बंगळुरूमध्ये आज तकने कर्नाटक राऊंड टेबल हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्यांना रोखठोक उत्तर दिलं आहे.

काय म्हटलं आहे मल्लिकार्जुन खरगेंनी?

“भाजपाचे ३६ लोक असे आहेत ज्यांच्या नात्यातले लोक निवडणूक लढवत आहे. इथे राहुल गांधींची घराणेशाही आहे का? सोनिया गांधी या देशाच्या पंतप्रधान झाल्या होत्या का? राहुल गांधी हे कधी मंत्री झाले आहेत का? किंवा त्यांना उप पंतप्रधान पद देण्यात आलं आहे का? नाही ना? मग भाजपाचे लोक कायम त्यांचं नाव का घेतात? भाजपाचे लोकच घराणेशाही करत आहेत आणि नाव घेत आहेत ते सोनिया गांधी आणि राहुल गांधींचं. त्यापेक्षा स्वतःच्या तत्त्वांवर आणि विचारधारांवर मतं मागा. असा सल्लाही खरगेंनी भाजपाला दिला आहे.”

भाजपाविषयी आणखी काय म्हणाले खरगे?

“भाजपाने गांधी कुटुंबीयांचा कायमच अपमान केला आहे. भाजपाने या कुटुंबाला किती नावं ठेवली आहेत याची काही सीमाच नाही. काहीवेळा तर असे अपशब्द वापरले आहेत की ते उच्चारतानाही आम्हाला लाज वाटते. मात्र तरीही त्यांची गांधी कुटुंबीयांबाबत बोलण्याची सवय काही सुटत नाही.” असं म्हणत भाजपावर त्यांनी टीका केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भ्रष्टाचाराबाबत विचारलं असता त्यांनी त्या मुद्द्यावरही खरगेंनी भाष्य केलं. आम्ही भाजपाला रंगेहात पकडलं आहे. भाजपाने आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणं हे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असं म्हणत मल्लिकार्जुन खरगेंनी भाजपावर जोरदार टीका केली आहे.