महायुतीच्या नेत्यांची बैठक दिल्लीत अमित शाह यांची भेट महायुतीच्या नेत्यांनी घेतली. त्यानंतर ही बैठक अडीच तास चालली. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे तिन्ही नेते दिल्लीला गेले होते. जे पहाटे मुंबईत परतले. अडीच तास चाललेल्या बैठकीत काय काय चर्चा झाली ते महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं नाही. मात्र त्यांचं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे.

महाराष्ट्रात महायुतीतलं पक्षीय बलाबल कसं आहे?

महाराष्ट्रात महायुतीला एकूण २३९ जागा मिळाल्या आहेत. त्यापैकी १३२ जागा भाजपाने जिंकल्या आहेत. भाजपा १३२ आमदारांसह राज्यातला सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यानंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने ५७ जागा जिंकल्या आहेत. तर त्यांच्या शिवसेनेचे ४ पुरस्कृत आमदार विजयी झाले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडे ६१ आमदारांचं बळ आहे. तर अजित पवार यांच्याकडे ४१ आमदारांचं बळ आहे कारण त्यांनी तेवढे आमदार निवडून आणले आहेत. असं असलं तरीही मुख्यमंत्री कोण होणार? हा सस्पेन्स कायम आहे.

दिल्लीतल्या बैठकीचा फोटो चर्चेत

दिल्लीत एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह यांची भेट घेतली. अजित पवारांसह प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेही आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डाही आहेत. दरम्यान हा फोटो चर्चेत आला आहे कारण या फोटोंमध्ये अमित शाह यांच्यासह सगळे दिग्गज नेते हसताना आणि आनंदी दिसत आहेत. अपवाद आहे तो एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्याचा. एकनाथ शिंदे या फोटोंध्ये उभे आहेत मात्र त्यांच्या चेहऱ्यावर असलेल्या गांभीर्याने लक्ष वेधलं आहे. याबाबतही एकनाथ शिंदेंनी मिश्कील भाष्य केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

“मुंबईत भाजपाची बैठक होईल. त्यानंतर निर्णय होईल. दिल्लीतली आमची बैठक सकारात्मक झाली. अमित शाह, जे. पी. नड्डा यांच्याशी चर्चा झाली. मी होतो, देवेंद्र फडणवीस, अजित पवार सगळे होते. चर्चा सकारात्मक होते. माझी भूमिका मी जाहीर केली आहे. मी शिवसेना म्हणून महायुतीच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे. डेडलॉक संपला आहे. सगळं काही व्यवस्थित आहे. मी काळजीवाहू मुख्यमंत्री आहे, मी सगळ्यांची काळजी घेतो आहे. तसंच माझा चेहरा तुम्हाला गंभीर, कधी हसरा दिसतो ते सगळं तुम्ही ठरवत आहात. महाराष्ट्राच्या जनतेसाठी कल्याणकारी योजना आम्ही केल्या. लाडकी बहीण योजना महत्त्वाची आहे. जनता समाधानी आहे यातच आमचं समाधान आहे.” असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.