शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर यवतमाळ-वाशीमच्या विद्यमान खासदार भावना गवळी या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल झाल्या. मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाने भावना गवळी यांचं तिकीट कापत राजश्री पाटील यांना उमेवारी दिली. त्यामुळे भावना गवळी पक्षावर नाराज असल्याची चर्चा आहे. पक्षाने तिकीट कापल्यावर गवळी यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली होती. तसेच पक्षाच्या अनेक बैठकांना त्या उपस्थित राहिल्या नाहीत. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मध्यस्तीनंतर गवळी आता राजश्री पाटील यांच्याबरोबर प्रचार करताना दिसत आहेत. अशीच काहीशी परिस्थिती हिंगोलीचे खासदार हेमंत पाटलांची देखील आहे. महायुतीत हिंगोलीची जागा शिंदे गटाने आपल्याकडे घेतली असली तरी मुख्यमंत्री शिंदे यांनी खासदार हेमंत पाटील यांचं तिकीट कापून त्यांच्याऐवजी यंदा बाबुराव कदम यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. त्यामुळे पाटीलदेखील शिंदे गटावर नाराज असल्याची चर्चा आहे.

भारतीय जनता पार्टीने राज्यातल्या वेगवेगळ्या मतदारसंघांचा आढावा घेऊन, सर्वेक्षण करून एक अहवाल मांडला असून तो अहवाल विचारात घेऊन भाजपाने शिंदे गटाला हिंगोली आणि यवतमाळ-वाशीमचे उमेदवार बदलण्यास सांगितल्याचे दावे केले जात आहेत. यावर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. टाईम्स इंडियाला दिलेल्या मुलाखतीत शिंदे यांनी गवळी आणि पाटलांना यंदा तिकीट न देण्याबाबत सविस्तर प्रतिक्रिया दिली.

शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला होता की, यवतमाळ वाशीममध्ये भावना गवळी आणि हिंगोलीत हेमंत पाटील या दोन विद्यमान खासदारांचं तिकीट तुम्ही कापलं आहे. भाजपाच्या सर्वेक्षणामुळे तुम्ही यांचं तिकीट कापलंय का? की यामागे इतर कुठलं कारण आहे? यावर शिंदे म्हणाले, भाजपाचं कोणतंही सर्वेक्षण नव्हतं, किंवा त्यांचा आमच्यावर कुठल्याही प्रकारचा दबाव नव्हता. उमेदवार बदलणं ही आमची अंतर्गत बाब आहे. आम्ही हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ वाशीममधून लोकसभेचं तिकीट दिलं आहे. त्याचबरोबर भावना गवळी यांचंदेखील राजकीय पुनर्वसन केलं जाणार असून त्यांना आगामी काळात अधिक मानाचं स्थान मिळेल. राहिला प्रश्न भाजपााबाबतचा, तर मुळात त्यांनी (भाजपा) आम्हाला उमेदवार बदलायला सांगण्याचा प्रश्नच येत नाही.

हे ही वाचा >> “फडणवीसच नव्हे, मविआच्या काळात आणखी तीन भाजपा नेत्यांच्या अटकेचा कट रचलेला”, एकनाथ शिंदेंचा गंभीर आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भावना गवळी यांची नाराजी

यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाचं पाचवेळा प्रतिनिधीत्व करूनही भाजपाच्या दबावात शिंदे गटाने या मतदारसंघातून भावना गवळी यांना उमेदवारी नाकारल्याची मतदारसंघात चर्चा आहे. त्यांच्याऐवजी शिंदे गटाने हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना येथून उमेदवारी दिली आहे. उमेदवारी न मिळाल्यामुळे भावना गवळी व त्यांचे समर्थक प्रचंड नाराज असून त्यांनी त्यांचा रोष व्यक्त केला आहे. गवळींनी महायुतीच्या सर्व कार्यक्रमांवर अघोषित बहिष्कार टाकल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र आता त्या राजश्री पाटलांच्या काही प्रचारफेऱ्यांमध्ये आणि प्रचारसभांमध्ये दिसल्या आहेत.