लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सध्या सुरु आहे. मात्र, ऐन निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेसला धक्का बसला आहे. काँग्रेसचे नेते, खासदार रणजीत सुरजेवाला यांना प्रचार करण्यास दोन दिवसांची बंदी घालण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे. रणजीत सुरजेवाला यांनी प्रचाराच्या सभेत भाजपा खासदार हेमा मालिनी यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे.

रणजीत सुरजेवाला यांच्यावर आज (१६ एप्रिल) संध्याकाळी ६ वाजल्यापासून पुढील ४८ तास प्रचार करण्यास बंदी घातली आहे. या दरम्यान त्यांना रॅली, मुलाखती किंवा कोणत्याही प्रकारची सभा घेता येणार नाही. यासंदर्भातील वृत्त ‘इंडिया टुडे’ने दिले आहे.

हेही वाचा : नरेंद्र मोदींची पोस्ट चर्चेत! “अपयशाने खचून जायचं नसतं, भारतात संधींची कमतरता नाही”

हरियाणामधील कुरुक्षेत्र लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार सुशील गुप्ता यांच्या प्रचाराच्या सभेत बोलताना खासदार रणदीप सुरजेवाला यांनी खासदार हेमा मालिनी यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. यानंतर त्यांच्यावर टीका झाली होती. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजपाच्या नेत्यांनी रणदीप सुरजेवाला यांच्यासह काँग्रेसवर निशाणा साधला होता. रणदीप सुरजेवाला यांच्या आक्षेपार्ह टिप्पणी संदर्भात भाजपाने आयोगाकडे तक्रार केली होती.

रणदीप सुरजेवाला यांनी त्यांच्या विधानासंदर्भात स्पष्टीकरणदेखील दिले होते. “आपला हेतू कोणालाही अपमानीत करण्याचा नव्हता. मात्र, माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला”, असे ते म्हणाले होते. रणदीप सुरजेवाला यांना निवडणूक आयोगाने नोटीसही बजावली होती. यानंतर आज निवडणूक आयोगाने त्यांच्यावर दोन दिवसांची प्रचार बंदीची कारवाई केली.