शिवसेना पक्षात फूट पडून दोन गट तयार झाले आहेत. या फुटीमुळे पक्षातील अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या घरातही दोन गट तयार झाले आहेत. शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांच्या कुटुंबाचीदेखील अशीच परिस्थिती आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर मुंबई वायव्य (मुंबई उत्तर-पश्चिम) मतदारसंघाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनीदेखील एकनाथ शिंदेंची साथ दिली. कीर्तिकर शिंदेंच्या गटात सहभागी झाले. मात्र त्यांचे पूत्र आणि शिवसेना नेते अमोल कीर्तिकर यांनी मात्र शिवसेनेच्या ठाकरे गटात थांबणं पसंत केलं. गजानन कीर्तिकर शिवसेनेच्या शिंदे गटात असले तरी त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांचा त्यांच्या मुलाला म्हणजेच अमोल कीर्तिकर यांना पाठिंबा आहे. शिवसेनेतील फुटीमुळे कीर्तिकर कुटुंबातही दोन गट तयार झाल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, शिवसेनेच्या ठाकरे गटाने यंदा अमोल कीर्तिकर यांना वायव्य मुंबईतून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. त्यामुळे गजानन कीर्तिकर यांनी लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेच्या शिंदे गटाने या मतदारसंघातून आमदार रवींद्र वायकर यांना उमेदवारी दिली. आहे. गजानन कीर्तिकर यांनी या निवडणुकीत वायकरांचा प्रचार केला. तर कीर्तिकरांचं कुटुंब अमोल कीर्तिकरांच्या बाजूने उभं आहे. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात सोमवारी (२० मे) मुंबईत मतदान पार पडलं. यावेळी गजानन कीर्तिकर यांच्या पत्नी आणि अमोल कीर्तिकर यांच्या आईनेदेखील मतदान केलं. यावेळी त्या म्हणाल्या, “मी माझं मत माझ्या मुलाला… अमोलला दिलं.”

मतदान केल्यानंतर गजानन कीर्तिकरांच्या पत्नी विदीशा म्हणाल्या, “मी माझ्या मुलाला मत दिलं आहे. गजानन कीर्तिकर हे जरी शिंदे गटात गेले असले तरी ते त्यांचे विचार आहेत. आम्हाला काही ते आवडलेलं नाही. त्यांच्या या निर्णयाला आम्ही विरोध केला होता. मी तसं बोलूनही दाखवलं होतं. मी त्यांना थेट म्हणाले होते की तुम्ही हे काही बरोबर केलेलं नाही. मी काही हातचं ठेवून बोलत नाही. मला जे पटत नाही ते मी सांगून टाकते. आपल्याला पटत नसलेली गोष्ट सांगायला कशाची भीती? आणि हे राजकारण आहे, राजकारणात प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा, व्यक्त होण्याचा अधिकार आहे.” विदीशा कीर्तिकर झी २४ तास या वृत्तवाहिनीशी बोलत होत्या.

हे ही वाचा >> Pune Porsche Crash : काँग्रेसकडून न्यायिक चौकशीची मागणी, आरोपीचा ‘तो’ VIDEO पोस्ट करत विचारले ५ महत्त्वाचे प्रश्न

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गजानन कीर्तिकरांच्या पत्नी म्हणाल्या, “मी त्यांना म्हणाले होते की तुम्ही हा निर्णय घ्यायला नको होता. हा शिंदे आमच्याकडे अनेकदा यायचा. मी यांना (गजानन कीर्तिकर) म्हणाले होते, तो (एकनाथ शिंदे) तुमच्यापेक्षा लहान आहे. आता तुम्ही त्याला सलाम ठोकणार हे काही मला पटलेलं नाही. मला ते बरं वाटत नाही. मी त्यांच्या निर्णयाला विरोध केला तरी त्याने काही फरक पडला नाही.”