हरियाणात काँग्रेसचा पराभव करत भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासह भाजपा हरियाणात तिसऱ्यांचा सरकार स्थापन करणार आहे. या निवडणुकीत भाजपाला एकूण ४८, तर काँग्रेसला ३७ जागांवर विजय मिळाला आहे. महत्त्वाचे म्हणजे भाजपाने हरियाणात पूर्ण बहुमताचा आकडा पार केला असला तरी मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांच्या मंत्रीमंडळातील आठ मंत्र्यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळातही विविध चर्चांनाही उधाण आलं आहे.

हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या आठ मंत्र्यांसह विधानसभा अध्यक्षांचा पराभव झाला आहे. यामध्ये कृषीमंत्री कंवरपाल गुर्जर, विकास आणि पंचायत राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) असीम गोयल, आरोग्य मंत्री कमल गुप्ता, अर्थमंत्री जय प्रकाश दलाल, क्रीडा राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) संजय सिंग, स्थानिक स्वराज्य संस्था राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) सुभाष सुधा, पाटबंधारे आणि जलसंपदा राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) अभयसिंग यादव, तसेच माजी मंत्री रणजित चौटाला यांचा समावेश आहे. या निवडणुकीत विधानसभा अध्यक्ष ज्ञानचंद गुप्ता यांच्याही पराभव झाला आहे.

हेही वाचा – हरियाणातील पराभवानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “हा निकाल…”

अभयसिंग यादव यांना काँग्रेसच्या मंजू चौधरी यांनी ६ हजार ९३० मतांनी पराभूत केलं आहे. तर सुभाष सुधा यांना काँग्रेसच्या अशोक कुमार अरोरा यांनी ३ हजार २४३ मतांनी पराभूत केलं आहे. याशिवाय असीम गोयल यांना काँग्रेसचे उमेदवार निर्मल सिंग मोहरा यांनी ११ हजार १३१ मतांनी पराभूत केलं आहे. आरोग्य मंत्री कमल गुप्ता यांना अपक्ष उमेदवार सावित्री जिंदाल यांनी ३१ हजार ८४६ मतांनी पराभूत केलं आहे. कंवरपाल गुर्जर यांचा ६ हजार ८६८ मतांनी पराभव झाला आहे. तर जयप्रकाश दलाल यांचा केवळ ७९२ मतांनी पराभव झाला आहे. काँग्रेसचे राजबीर फर्टिया यांनी त्यांचा पराभव केला आहे.

हेही वाचा – प्रतिकूल परिस्थितीतही हरियाणाच्या चाव्या भाजपाकडेच राखणारे नायब सिंग सैनी!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय या निवडणुकीत मुख्यमंत्री नायबसिंग सैनी, उद्योग आणि वाणिज्य मंत्री मूलचंद शर्मा तसेच विकास आणि पंचायत राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) महिपाल धांडा यांचा विजय झाला आहे. मुख्यमंत्री नायबसिंग सैनी हे त्यांच्या लाडवा मतदारसंघातून १६ हजार ५४ मतांनी विजयी झाले आहेत. तर मूलचंद शर्मा हे बल्लभगड मतदारसंघातून १७ हजार ७३० मतांनी विजयी झाले आहेत. तसेच पानिपत ग्रामीणमधून महिपाल धांडा यांनी ५० हजार २१२ मतांनी विजय मिळवला आहे.