“मी साहेबांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती”, अशी खंत अजित पवारांनी बोलून दाखवली. तसंच, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अजित पवारांची री ओढत “आपल्याला पक्षात स्थान मिळणार नाही हे समजल्यामुळे ते बाहेर पडले”, असं म्हणाले. यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

अजित पवार नेमकं काय म्हणाले होते?

“शरद पवार हे आमचे दैवत आहेत, पण प्रत्येकाचा काळ असतो. ८० वर्षांच्या पुढे गेल्यावर नव्या लोकांनाही संधी द्यायला हवी. मी आता साठीचा झालो आहे. मी जर साहेबांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती. पण मी त्यांचा मुलगा नाही म्हणून संधी नाही. दिवसरात्र सगळा जिल्हा सांभाळला. शरद पवारांकडे जिल्हा बँक नव्हती. जिल्हा बँक इतरांच्या हाती असायची. मी राजकारणात आल्यापासून १९९१ पासून आजपर्यंत ताब्यात ठेवली आहे. जिल्हा परिषद ताब्यात ठेवली. मी कधीही कुणाला वाऱ्यावर सोडत नाही. पिंपरी चिंचवड ताब्यात नव्हतं. १९९२ ते २०१७ या कालावधीत ताब्यात ठेवलं.” असंही अजित पवार म्हणाले आहेत.

हेही वाचा >> “..म्हणून अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडली”, देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

शरद पवार काय म्हणाले?

“अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस काय म्हणाले हे मला माहीत नाही”, असं शरद पवार म्हणाले. पुढे पत्रकारांनी त्यांना विचारलं की अजित पवारांना तुमची काळजी वाटू लागली आहे. गेल्या १५ दिवसांपासून ते सातत्याने असं बोलत आहेत. ते असं का बोलत आहेत? त्यावर शरद पवार म्हणाले, “ते असं का बोलतात हे त्यांनाच माहीत.” तसंच, शरद पवारांच्या जवळच्यांनी शरद पवारांना त्रास दिला का असा प्रश्नही पत्रकारांनी विचारला. त्यावर ते म्हणाले, “मला कोणी त्रास देत नाही. जवळचे लोक प्रेमाने वागतात. पाहिजे ते कष्ट घेण्याची त्यांची तयारी आहे.”

देवेंद्र फडणवीसांनीही केली होती टीका

“अजित पवारांनी शरद पवारांबरोबर पक्ष उभा केला. पण त्यांना बाहेर पडावं लागलं कारण त्यांना लक्षात आलं की आपल्याला पक्ष मिळणार नाही. आपल्याला पक्षात स्थान मिळणार नाही. सुप्रिया सुळेंनाच ते पक्षाची जबाबदारी मिळणार हे समजल्यामुळे ते बाहेर पडले.” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघ हा हायवोल्टेज मतदारसंघ आहे. तिसऱ्या टप्प्यात येथे मतदान प्रक्रिया पार पडली असून येथे गेल्यावर्षीपेक्षा कमी मतदान झालं असल्याची चर्चा आहे. पवार कुटुंबातीलच दोन व्यक्ती यावेळी आमनेसामने आल्याने मतविभाजन झाले असल्याचीही चर्चा आहे. परिणामी ४ जून रोजी निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वाधिक मते कोणाला मिळाली हे स्पष्ट होणार आहे.