गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली मुस्लिमविरोधी वक्तव्ये पाहता त्यांना या निवडणुकीत मुस्लिम मते मिळणार नाहीत, असं वातावरण होतं. परंतु, त्यांनी यावर भाष्य केलं आहे. मी मुस्लिम कुटुंबात राहिलो असून त्यांच्याबरोबर जेवलोसुद्धा आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले. न्यूज १८ ने घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. वाराणसी लोकसभा मतदारसंघातील गंगा नदीच्या काठावर ही मुलाखत पार पडली.
माझे शासन मॉडेल धर्म किंवा जातीच्या आधारावर आधारलेलं नाही, असं मोदींनी स्पष्ट केलं. ते पुढे म्हणाले की, “मी लहानपणी मुस्लिम कुटुंबात राहिलो आहे. माझे अनेक मुस्लिम मित्र आहेत. पण २००२ नंतर माझी प्रतिमा डागाळण्याचे प्रयत्न करण्यात आले”, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हणाले.
वास्तव जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण केलं
“आमच्या शेजारी मुस्लिम कुटुंबे राहत होती. ईदच्या दिवशी आम्ही माझ्या घरी जेवण बनवत नसे कारण शेजारच्या मुस्लिम घरातून जेवण यायचे. मोहरमच्या दिवशी आम्हाला ताजियाच्या खाली जायला शिकवले गेले ”, असंही ते म्हणाले. पंतप्रधान म्हणाले की, “२००२ नंतर जेव्हा त्यांची प्रतिमा डागाळली तेव्हा त्यांनी जमिनीवरील वास्तव जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण केले. “अहमदाबादमध्ये मानेक चौक नावाची जागा आहे जिथे लोक संध्याकाळी जेवायला जातात. पण दिवसा सर्व व्यापारी मुस्लिम आणि सर्व खरेदीदार हिंदू आहेत. मी काही लोकांना त्या मार्केटमध्ये सर्वेक्षण करण्यासाठी पाठवले. त्यांच्यापैकी एकजण माझ्याविरोधात बोलला तेव्हा दुकानदाराने त्याला थांबवले आणि म्हणाले, ‘मोदींविरुद्ध एक शब्दही बोलू नका. मोदींमुळे माझी मुलं शाळेत जात आहेत. जवळपास ९० टक्के दुकानमालकांचे म्हणणे असेच होते”, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
हिंदू मुस्लीम फूट न पाडणं माझी बांधिलकी
पंतप्रधान म्हणाले की त्यांच्या आयुष्यात अशा बऱ्याच गोष्टी घडल्या आहेत परंतु ते या सर्वांची जाहिरात करत नाहीत. ‘सबका साथ सबका विकास’ हा माझा मंत्र आहे. मी व्होट बँकेसाठी काम करत नाही. जर काही चुकीचे असेल तर मी ते चुकीचे आहे असे म्हणेन”, पंतप्रधान म्हणाले.“मला विश्वास आहे की देशातील लोक मला मतदान करतील. ज्या दिवशी मी हिंदू-मुस्लिम करायला लागेन, तेव्हा मी सार्वजनिक जीवनात राहण्यास योग्य राहणार नाही. मी हिंदू-मुस्लिम फूट पाडणार नाही, ही माझी बांधिलकी आहे, असंही ते म्हणाले.