लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा सुरु होणार आहे. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या प्रमाणावर दौरे सुरु केले आहेत. तसंच उद्धव ठाकरे कायमच मोदींवर टीका करताना दिसत आहेत. मात्र मी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देणार नाही हे मी ठरवलं आहे कारण मी बाळासाहेब ठाकरेंचा आदर करतो असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. तसंच मोदींनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचं आव्हान वाटतं का? यावर उत्तर दिलं आहे.

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

“महाराष्ट्राची यावेळी असलेली भावनिक स्थिती ही भाजपाच्या बाजूने आहे. युतीच्या बाजूने आहे. कारण बाळासाहेबांची शिवसेना आमच्या बरोबर आहे. तसंच राष्ट्रवादी काँग्रेस आमच्याबरोबर आहे. त्यामुळे लोकांना वाटतं आहे की ठाकरेंनी सत्तेच्या हव्यासापोटी बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न का मोडलं? कुटुंबाच्या भल्यासाठी? आपल्या मुलाला पुढे आणण्यासाठी? बाळासाहेब ठाकरेंचा वारसा इतका मोठा आहे. शिवसैनिकांसाठी त्यांनी आयुष्य वेचलं. शिवसैनिकांच्या सन्मानासाठी जी शिवसेना काम करत होती ती आज आमच्याबरोबर आहे. त्यामुळे महाराष्ट्रातला मतदार आमच्याशी भावनिकदृष्ट्या जोडला गेला आहे.” असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- “मोदी की गॅरंटी हे मी का म्हणतो?”, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच सांगितलं कारण

शरद पवारांबाबत काय म्हणाले मोदी?

“शरद पवारांबाबत जे झालं ती काही राजकीय समस्या नाही. त्यांनी हा सगळा राजकीय मुद्दा केला आहे. तरीही महाराष्ट्रातल्या जनतेला कसं पटणार? त्यांच्या कुटुंबातला हा प्रश्न आहे. घरातलं भांडण, वारसा मुलाला द्यायचा की मुलीला? हा त्यांच्या घरातला वाद आहे. त्यामुळे शरद पवारांबाबत सहानुभूती नाही उलट संतापाचं वातावरण आहे. शरद पवारांना या वयात कुटुंब सांभाळता आलं नाही तर महाराष्ट्र कसा सांभाळतील असं लोकांना वाटतं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लोक भावनिकदृष्ट्या आमच्या बरोबर आहेत.” असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. टीव्ही ९ ला दिलेल्या मुलाखतीत नरेंद्र मोदींनी हे वक्तव्य केलं आहे.

उद्धव ठाकरेंमध्ये सत्तेची लालसा

उद्धव ठाकरे औरंगजेबाचं कौतुक करणाऱ्या काँग्रेसबरोबर सत्तेसाठी जाऊन बसले. औरंगजेबाचं कौतुक करणाऱ्यांबरोबर बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा सत्तेसाठी गेला याचा राग महाराष्ट्राच्या मनात आहे. असंही मोदी यांनी म्हटलं आहे. तसंच उद्धव ठाकरे जेव्हा आजारी होते तेव्हा मी वहिनींशी (रश्मी ठाकरे) बोलत होतो. त्यांच्या संपर्कात होतो. उद्धव ठाकरेंची शस्त्रक्रिया झाली तेव्हा त्यांची मी फोनवरुन चौकशी आणि विचारपूस करत होतो. असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे.