२१ जून २०२२ ही महाराष्ट्राच्या राजकारणातली अशी तारीख आहे जी कधीही महाराष्ट्र विसरणार नाही. कारण याच दिवशी शिवसेनेतलं सर्वात मोठं बंड एकनाथ शिंदे यांनी पुकारलं होतं. एकनाथ शिंदे यांना शिवसेनेतेल्या ४० आमदारांची साथ लाभली. अपक्ष वगैरे मिळून ही संख्या ५० आमदारांपर्यंत गेली होती. एकनाथ शिंदेंनी जो उठाव केला त्यानंतर उद्धव ठाकरेंनी २९ जून २०२२ या दिवशी राजीनामा दिला. या राजीनाम्यामुळे महाराष्ट्रातलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं. आता या बंडामागे संजय राऊतही होते असा दावा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेत्याने केला आहे.

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर काय घडलं?

एकनाथ शिंदे यांनी जे बंड केलं त्यानंतर महाराष्ट्रात ३० जून २०२२ या दिवशी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. निवडणूक आयोगात जेव्हा खरी शिवसेना कुणाची? हा वाद गेला तेव्हा उद्धव ठाकरेंकडे असलेलं आमदारांचं संख्याबळ आणि एकनाथ शिंदेंकडे असलेलं आमदारांचं संख्याबळ लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदेंना दिलं. या बंडाला एक वर्ष एक दिवस पूर्ण झाल्यानंतर २ जुलै २०२३ या दिवशी अजित पवार हे त्यांच्या आमदारांच्या मोठ्या गटासह महायुती सरकारमध्ये सहभागी झाले. महायुतीचं जे सरकार राज्यात आहे त्यात सुमारे १८० आमदार आहेत. आता लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शिंदे गटातील एका बड्या नेत्याने संजय राऊत यांनीच आम्हाला आपण बंड करु असं सांगितलं होतं असा दावा केला आहे.

हे पण वाचा- “एकनाथ शिंदे म्हणाले, ईडी-सीबीआयवाले माझ्या मागे लागल्यामुळे…”, राऊतांनी सांगितला अयोध्या दौऱ्यातील प्रसंग

नरेश म्हस्के यांचा मोठा दावा

शिंदेंच्या शिवसेनेने नरेश म्हस्केंना ठाण्यातून तिकिट दिलं आहे. नरेश म्हस्के यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे राजन विचारे आहेत. राजन विचारे हे विद्यमान खासदार आहेत. आता या ठिकाणी कशी लढत होते आणि लोक कुणाला निवडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र बंड करु हे संजय राऊत म्हणाले होते असं वक्तव्य आता नरेश म्हस्केंनी केलं आहे.

अयोध्येत संजय राऊत यांनी सांगितलं आपण बंड करु

“अयोध्येत संजय राऊत, मी आणि एकनाथ शिंदे आम्ही तिघे बसलो होतो. त्यावेळी मला संजय राऊत यांनी सांगितलं आपण सर्व जण मिळून बंड करु मी तुमच्या बरोबर आहे असं संजय राऊत म्हणाले होते. मी हे तुम्हाला अत्यंत जबाबदारीने सांगतो आहे की आपण सगळे बंड करु संजय राऊत यांचं वाक्य आहे.” असं नरेश म्हस्के यांनी म्हटलं आहे.