कंगना रणौतने साधारण दोन वर्षांपूर्वी एक वक्तव्य केलं होतं. देशाला स्वातंत्र्य मिळालं ते १९४७ मध्ये नाही तर २०१४ मध्ये मिळालं. यावरुन तिला चांगलंच ट्रोलही करण्यात आलं. कंगना रणौत आता भाजपाची उमेदवार आहे. तिला हिमाचलप्रदेशातल्या मंडी लोकसभा मतदारसंघातून तिकिट दिलं गेलं आहे. याच अनुषंगाने तिची एक मुलाखत काही दिवसांपूर्वी घेण्यात आली. या मुलाखतीत तिने काँग्रेसचा तिरस्कार का करते ते सांगितलं. तसंच सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी तिने केलेलं वक्तव्य आता चर्चेत आलं आहे.

काँग्रेसबाबत काय म्हणाली कंगना रणौत?

“काँग्रेस पक्ष हा घराणेशाही मानणारा पक्ष आहे. तर राहुल गांधी हे हिंदी चित्रपटातल्या सिनेमात दाखवल्या जाणाऱ्या नायकाप्रमाणे राजा बेटा आहेत. त्यांचा पक्ष, त्यांची विचारधारा ही मला कधीही पटली नाही. त्यामुळे माझे आजोबा जरी काँग्रेस विचारांचे असले तरीही मी त्या पक्षात कधीही जाऊ शकत नाही. मी सिनेसृष्टीत ज्या घराणेशाहीचा आणि गटबाजीचा सामना केला ते सगळं मला काँग्रेस पक्षातही दिसतं. त्यामुळे मी ती विचारधारा मान्य करण्याचा प्रश्नच येत नाही.” असं कंगनाने म्हटलं होतं. टाइम्स नाऊच्या इव्हेंटमध्ये तिला बोलवण्यात आलं होतं. त्यावेळी कंगनाने हे भाष्य केलं.

हे ही वाचा- “देशात लोकशाहीची हत्या”, राहुल गांधींच्या टीकेवर कंगनाचं चोख प्रत्युत्तर; म्हणाली, “कदाचित त्यांना…”

आता कंगनाचा याच मुलाखतीतला एक भाग सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस हे आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान होते असं कंगना म्हणाली आहे. त्यावरुन तिला चांगलंच ट्रोल केलं जातं आहे. तू राहुल गांधींना नावं ठेवतेस तर मग तू काय आहेस? असा प्रश्न तिला लोक एक्सवरुन विचारत आहेत.

Photo: ‘इंग्रजी येत नाही म्हणून वल्लभभाई पटेलांना…’, कंगनाचं विधान वादात

कंगना नेमकं मुलाखतीत काय म्हणाली?

“विचारधारेचं स्वातंत्र्य आपल्याला नव्हतं, म्हणून २०१४ ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं असं मी म्हटलं होतं.” असं कंगनाने म्हणताच तिला पश्न विचारला गेला की लोक म्हणत आहेत स्वातंत्र्य आत्ता गेलं आहे कारण लोक म्हणतात नरेंद्र मोदी हुकूमशाही राबवत देश चालवत आहेत. तेव्हा कंगना म्हणाली, “मी उत्तर देण्याआधी मला हे सांगा, जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा भारताचे पहिले पंतप्रधान सुभाषचंद्र बोस कुठे गेले?” त्यावर कंगनाला अँकरने सांगितलं सुभाषचंद्र बोस हे देशाचे पंतप्रधान नव्हते. कंगना चटकन म्हणाली, “सुभाषचंद्र बोस देशाचे पंतप्रधान का झाले नाहीत? त्यांना गायब का करण्यात आलं? तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दुंगा असं नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणाले होते. स्वतंत्र राष्ट्र म्हणजे आपण आहोत हेदेखील त्यांनी जाहीर केलं होतं अशा व्यक्तीला भारतात येऊ दिलं गेलं नाही. जे टीव्ही पाहात होते ते सरकार चालवत होते. काँग्रेस हे ब्रिटिशांचं पुढचं रुप होतं.” असं कंगनाने म्हटलं आहे.