Karnataka Assembly Elections 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधला. भाजपा कार्यकर्त्यांनी बुथवर जी मेहनत घेतली, त्याआधारावर आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाला घवघवीत यश नक्कीच मिळेल, असा विश्वास यावेळी पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला. “जेव्हा बुथवर आपण विजय संपादन करतो, तेव्हा आपोआपच राज्याच्या निकालातही आपला विजय निश्चित होतो. तुम्ही बुथस्तरावर जी मेहनत घेत आहात, त्याच्यामुळेच पक्षाचा राज्यात विजय शक्य होणार आहे. पक्षाचा शिस्तबद्ध कार्यकर्ता या नात्याने मी तुमच्या आणि कर्नाटकमधील जनतेच्या सोबतच आहे.”, अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. तसेच कर्नाटकमधील जनता राज्यात स्थिर सरकार आणण्यासाठी भाजपाला संपूर्ण बहुमत देईल, असेही ते म्हणाले.
कर्नाटकला स्थिर आणि बहुमताचे सरकार केवळ भाजपा देऊ शकते. अस्थिर सरकारमुळे काय अडचणी निर्माण होतात, याची जाणीव लोकांना करून द्या, असा मंत्रही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांना दिला. कर्नाटक राज्यात १० मे रोजी विधानसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडणार आहे, तर १३ मे रोजी मतमोजणी संपन्न होईल. भाजपा पुन्हा एकदा सत्ता मिळवण्यासाठी आतुर आहे तर काँग्रेस भाजपाला सत्तेतून पायउतार करण्यासाठी झगडत आहे.