पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नाशिकपाठोपाठ कल्याणमध्ये महायुतीच्या उमेदवारासाठी प्रचारसभा घेतली. नाशिकमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाचे लोकसभेचे उमेदवार हेमंत गोडसे (विद्यमान खासदार) आणि कल्याणमध्ये शिंदे गटाचे उमेदवार श्रीकांत शिंदे (विद्यमान खासदार) यांच्यासाठी पक्षाने आयोजित केलेल्या सभेला संबोधित करताना मोदी यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. तसेच माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी वीर सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यांवरून टीका केली. मोदी यांनी कल्याणमधील सभेतून शिवसेनेच्या ठाकरे गटाला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाला आणि इंडिया आघाडीतल्या इतर पक्षांना आव्हान दिलं की, त्यांनी काँग्रेसच्या युवराजांकडून म्हणजेच राहुल गांधी यांच्या तोंडून सावरकरांबद्दल पाच चांगली वाक्ये वदवून घ्यावी.

नरेंद्र मोदी म्हणाले, काँग्रेसवाले सातत्याने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचा अपमान करत असतात. मात्र नकली शिवसेनावाले त्यावर काहीच बोलत नाहीत. नकली शिवसेनेमध्ये काँग्रेसला असं करण्यापासून रोखण्याची हिंमत नाही. ते काँग्रेसला काही बोलूच शकत नाहीत. महाराष्ट्रातील इंडिया आघाडीच्या लोकांना मी आव्हान देतो की त्यांनी काँग्रेसच्या युवराजांच्या तोंडून वीर सावरकरांबद्दल पाच चांगली वाक्ये वदवून घेऊन दाखवावी. माझं इंडिया आघाडीला आव्हान आहे, त्यांच्या मोठ्या नेत्यांना माझं ओपन चॅलेंज आहे की त्यांनी काँग्रेसच्या युवराजांकडून वीर सावरकरांबद्दल चांगली वाक्ये वदवून घ्यावी.

नरेंद्र मोदी म्हणाले, काँग्रेसच्या युवराजांची वीर सावरकरांवरील टीका पाहून आम्ही त्याला विरोध केला. आम्ही नकली शिवसेनेवरही टीका केली. त्यानंतर नकली शिवसेनेसह काँग्रेसच्या मित्र पक्षांनी काँग्रेसच्या युवराजाला सांगितलं की, बाबा रे, तू आता वीर सावरकरांबद्दल काही बोलू नकोस. तेव्हापासून काँग्रेसचा युवराज सावरकरांबद्दल काहीही बोललेला नाही.

हे ही वाचा >> “मोदींनीच ७५ वर्षे वयाचा नियम केला, आता…”, तिसऱ्या टर्मबाबत पृथ्वीराज चव्हाणांचं सूचक वक्तव्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंतप्रधान मोदी म्हणाले, देशात काँग्रेसचं सरकार असताना देशात दहशतवादी याकूब मेमनची कबर बांधली जाते. तेच काँग्रेसवाले राम मंदिरातील श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेचं निमंत्रण नाकारतात आणि राम मंदिराबाबत सातत्याने अपमानजनक भाषा वापरतात. मला राज्यातील जनतेला विचारायचं आहे की तुम्हाला काँग्रेसचं हे सगळं वागणं मान्य आहे का? तुम्ही त्यांना मत देणार का? तुम्ही इंडिया आघाडीवाल्यांना या निवडणुकीत शिक्षा देणार की नाही? माझी इच्छा आहे की हे सगळं करणाऱ्या काँग्रेसला तुम्ही या निवडणुकीत शिक्षा द्यायला हवी, जेणेकरून ते लोक अशा प्रकारचं पाप करण्याची परत कधी हिंमत करणार नाहीत.