राजस्थानच्या बन्सवाडा भागात रविवारी (२१ एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रचारसभा झाली. त्यावेळी त्यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं. मोदी भाजपाच्या प्रचारसभेत जनतेला उद्देशून म्हणाले, “आधीचं जे सरकार (यूपीएचं सरकार) होतं, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा आहे. याचा अर्थ हे सर्वसामान्यांची संपत्ती गोळा करून कोणाला वाटणार? ज्यांची जास्त मुलं आहेत त्यांना वाटणार, घुसखोरांना वाटणार. तुमच्या कमाईचा पैसा घुसखोरांना दिला जाणार, तुम्हाला हे मान्य आहे का?

नरेंद्र मोदी एवढ्यावरच थांबले नाहीत. ते म्हणाले, काँग्रेसचा जाहीरनामाच सांगतोय की ते देशातील महिलांकडील सोन्याचा हिशेब घेतील आणि नंतर ती संपत्ती वाटून टाकतील. मनमोहन सिंग सरकारनं म्हटलं होतं की देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुसलमानांचा आहे. हा शहरी नक्षलवादाचा विचार आपल्या महिलांकडचं मंगळसूत्रही त्यांच्या गळ्यात ठेवणार नाही.

मोदींच्या या वक्तव्यानंतर काँग्रेससह विरोधी पक्ष त्यांच्यावर टीका करू लागले आहेत. काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी यावर आक्षेप घेत एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, पंतप्रधान मोदींनी काल (२१ एप्रिल) राजस्थनाच्या जालोर आणि बन्सवाडा येथे केलेली वक्तव्ये पाहा. याआधी कोणत्याही पंतप्रधानाने असं वक्तव्य केल्याचं माझ्या ऐकिवात नाही. त्यांच्या प्रत्येक वाक्यात खोटेपणा आणि निर्लज्जपणा दिसत होता. चिदंबरम यांनी मोदी आणि भाजपाला तीन प्रश्नांची उत्तरं देण्यास सांगितलं आहे.

भाजपाने या प्रश्नांची उत्तर द्यावी – चिदंबरम

  1. आम्ही लोकांच्या जमिनी, सोनं आणि इतर मौल्यवान वस्तू मुसलमानांमध्ये वाटून टाकू असं काँग्रेसने कधी आणि कुठे म्हटलं होतं?
  2. लोकांच्या मालमत्तेचं, स्त्रियांकडे असलेलं सोनं, आदिवासी कुटुंबांकडे असलेल्या चांदीचं मूल्य जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण केलं जाईल असं काँग्रेसने कुठे आणि कधी म्हटलं?
  3. सरकारी कर्मचाऱ्यांच्या जमिनी आणि त्यांच्याकडे असलेली रोख रक्कम वाटून टाकली जाईल, असं काँग्रेसने कुठे आणि कधी म्हटलं?

हे ही वाचा >> विधानसभा निवडणुकीआधी शरद पवारांबरोबर एकत्र येणार? अजित पवार म्हणाले, “साहेब जर आम्हाला…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चिदंबरम म्हणाले, आपल्या पंतप्रधानांनी त्यांच्या आधीच्या पंतप्रधानांबद्दल थोडा आदर बाळगायला हवा. पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं डिसेंबर २०१६ मधील एनडीसी येथील भाषण इंडियन एक्सप्रेसने प्रसिद्ध केलं आहे. त्यात. डॉ. सिंग म्हणाले होते की, देशातील संसाधनांवर एससी, एसटी, ओबीसी, अल्पसंख्यांक, महिला आणि लहान मुलांचा पहिला अधिकार आहे. मोदींनी त्यांच्या प्रत्येक शब्दाचा विपर्यास करणं निंदनीय आहे. २१ एप्रिलनंतर त्यांच्या (नरेंद्र मोदी) वक्तव्यांची पातळी खूपच खाली गेली आहे. हे सगळं लाजिरवाणं आहे.