लोकसभा निवडणुकीत भाजपा पुन्हा एकदा सरकार बनविणार असल्याचे राजकीय विश्लेषक प्रशांत किशोर काही दिवसांपूर्वी म्हणाले होते. त्यानंतर विरोधकांच्या ट्रोलिंगला सामोरे गेलेल्या प्रशांत किशोर यांनी आता योगेंद्र यादव यांच्या दाव्याचा एक स्क्रिनशॉट शेअर करून विरोधकांना खोचक टोला लगावला आहे. काही दिवसांपूर्वी प्रशांत किशोर यांनी ज्येष्ठ पत्रकार करण थापर यांना मुलाखत दिली होती. या मुलाखतीत दोघांमध्येही वादावादी झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. प्रशांत किशोर यांच्यानंतर आता निवडणुकीचे अंदाज वर्तविणारे आणि राजकारणात उतरलेले योगेंद्र यादव यांनीही भाजपाचे सरकार येण्याबाबतचे भाकीत वर्तविले आहे. प्रशांत किशोर यांनी एक्सवर यादव यांच्या दाव्याबाबत भाष्य केले.

एनडीएच्या जागा ३७५ ते ३०५ च्या दरम्यान

भाजपाने ४०० पारचा नारा दिला असला तरी त्यांना तेवढ्या जागा मिळविता येणार नाहीत, असे प्रशांत किशोर याआधी म्हणाले होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात जनतेमध्ये रोष नसून त्यांना पाहून मतदान होऊ शकते, असा दावा त्यांनी केला होता. आता योगेंद्र यादव यांनीही भाजपाला अनुकूल असे मत नोंदविले आहे. भाजपा २४० ते २६० च्या आसपास जागा जिंकू शकते. तर त्यांचे घटक पक्ष ३४-४५ जागा मिळवू शकतात, असा दावा त्यांनी केला आहे. यामुळे एनडीएची संख्या २७५ ते ३०५ च्या आसपास पोहोचते.

योगेंद्र यादव यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना वरील दावा केला होता. प्रशांत किशोर यांनी याचा स्क्रिनशॉट एक्सवर शेअर केला आहे. त्यात ते म्हणाले, देशातील निवडणुकांचा आणि सामाजिक-राजकीय विषयांची उत्तम समज असणाऱ्यांमध्ये योगेंद्र यादव यांचा चेहरा विश्वासार्ह मानला जातो. त्यांनी लोकसभा निवडणुकीचे स्वतःचे अंतिम आकलन मांडले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार भाजपा २४०-२६० आणि एनडीएच्या मिळून २७५ – ३०५ जागांवर पोहोचू शकतात. सरकार स्थापन करण्यासाठी २७२ जागांची आवश्यकता आहे. विद्यमान लोकसभेत एनडीएच्या ३२३ जागा आहेत. (यात शिवसेनेच्या १८ जागा आहेत, मात्र ते आता एनडीएचा भाग नाहीत.) आता तुम्ही स्वतःच विचार करा की कशापद्धतीने सरकार स्थापन होणार आहे. बाकी ४ जूनला सर्व स्पष्ट होईलच.”

काँग्रेसला किती जागा मिळणार?

योगेंद्र यादव यांच्या आकलनानुसार काँग्रेसला ८५ आणि १०० च्या दरम्यान जागा मिळू शकतात. तर एनडीएला रोखण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंडिया आघाडीला १२० ते १३५ दरम्यान जागा मिळण्याचा अंदाज त्यांनी वर्तविला आहे. विशेष म्हणजे २०१९ साली निवडणुकीत काँग्रेसला केवळ ५२ लोकसभा मतदारसंघात विजय मिळविता आला होता.