Radhakrushna Vikhe Patil Reaction on Vasantrao Deshmukh Derogatory Speech : माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी शुक्रवारी (२५ ऑक्टोबर) संगमनेर तालुक्यातील धांदरफळ गावात युवा संकल्प मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात त्यांचे समर्थक वसंतराव देशमुख यांनी आपल्या भाषणात संगमनेरचे आमदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची कन्या डॉ. जयश्री थोरात यांच्याबद्दल काही आक्षेपार्ह वक्तव्ये केली. यावरून राज्यभर संताप व्यक्त केला जातोय. जयश्री थोरात यांनी वसंतराव देशमुख यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन पुकारले आहे. वसंतराव देशमुख यांच्याविरोधात कारवाई होत नाही तोवर इथून हलणार नसल्याचा इशारा देण्यात आलाय. तर, दुसरीकडे सुजय विखे यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला. या सर्व घडामोडींवर आता भाजपाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एक्स या मायक्रोब्लॉगिंग साईटवर त्यांनी पोस्ट केली आहे.

“संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे डाॅ.सुजय विखे पाटील यांच्या युवा संकल्प सभेत वसंतराव देशमुख यांनी केलेले वक्तव्य म्हणजे राजकीय षडयंत्र असल्याचा संशय आहे. देशमुख यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध करतो. सभेला मिळणारा प्रतिसाद पाहून डाॅ.सुजय विखे यांच्यावरही हल्ला करण्याचा हल्लेखोरांचा प्रयत्न होता. संगमनेर तालुक्यातील महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा मी निषेध करतो. हल्लेखोरांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी मी करत आहे”, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

नेमका वाद काय?

भाजपाचे माजी खासदार सुजय विखे यांनी एका मेळाव्यात बोलताना काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. ‘राज्याचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना आता आमदार होणंही अवघड झालं आहे, त्यामुळे मुख्यमंत्री सोडा, आता ते आमदार तरी राहतात का?’, असा सवाल करत सुजय विखे यांनी बाळासाहेब थोरातांवर खोचक टीका केली होती. त्यानंतर आता बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांनी सुजय विखेंना इशारा देत हल्लाबोल केला आहे. “खबरदार! माझ्या बापाविषयी बोलाल तर”, असं जयश्री थोरात यांनी म्हटलं आहे. युवक काँग्रेसच्या पदाधिकारी मेळाव्यात जयश्री थोरात बोलत होत्या. जयश्री थोरातांच्या या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना सुजय विखे यांचे समर्थक वसंतराव देशमुख यांनी जयश्री थोरात यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका केली. जवळपास एक मिनिट ते जयश्री थोरात यांच्याबद्दल अपमानास्पद विधान करत होते. त्यांच्या विधानानंतर आता संगमनेर तालुक्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून थोरात यांच्या कार्यकर्त्यांनी सुजय विखे यांचे बॅनर फाडून निषेध व्यक्त केला आहे.

हेही वाचा >> Jayashree Thorat : “मी काय केलं होतं की माझ्याबद्दल…”, भाजप नेत्याच्या अश्लाघ्य वक्तव्यावर जयश्री थोरात पहिल्यांदाच बोलल्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुजय विखेंच्या ताफ्यातील वाहनांची तोडफोड

देशमुख यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी संगमनेर तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते रात्री आक्रमक झाल्याचे दिसले. सभेनंतर विखे यांच्याबरोबरचे लोक लोणी गावी परतत असताना त्यांच्या वाहनांची अज्ञातांकडून तोडफोड आणि जाळपोळही करण्यात आली. सभेचे आयोजक व संबंधित वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई करून अटक करावी, या मागणीसाठी मध्यरात्रीनंतरही हजारोंचा जमाव पोलीस स्टेशन पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या देऊन बसला होता. तसेच धांदरफळ येथील सभेठिकाणी लावलेले सुजय विखेंच्या समर्थनाचे बॅनर फाडून टाकण्यात आले आहेत.