लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी वादविवाद करण्याचे निमंत्रण काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वीकारले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मदन लोकूर, उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एपी शाह आणि ज्येष्ठ पत्रकार एन. राम यांनी आयोजित केलेल्या या चर्चासत्राचे निमंत्रण राहुल गांधी यांनी स्वीकारले असल्याचे शनिवारी जाहीर केले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने एकाच मंचावर येऊन महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी या तिघांकडून राहुल गांधी आणि पंतप्रधान मोदींना विनंती करण्यात आली होती.

माजी न्यायाधीश आणि ज्येष्ठ पत्रकार यांनी दोन्ही नेत्यांना पत्र लिहून सार्वजनिक आणि तटस्थ मंचावर एकत्र येण्याचे आवाहन केले होते. निष्पक्ष आणि अव्यावसायिक मंचावर जर राजकीय नेत्यांनी एकत्र येऊन त्यांची भूमिका मांडली तर सामान्य जनतेला नक्कीच त्याचा लाभ होईल, अशी अपेक्षा ९ मे रोजी पाठविलेल्या पत्रातून व्यक्त करण्यात आली होती.

‘७५ वर्षांचे झाल्यानंतर नरेंद्र मोदी निवृत्त होणार?’ केजरीवालांच्या दाव्यावर अमित शाहांचे प्रत्युत्तर

राहुल गांधी यांनी हे निमंत्रण स्वीकारले असल्याचे पत्राद्वारे कळविले आहे. काँग्रेसकडून ते स्वतः किंवा राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जु खरगे या चर्चेसाठी उपस्थित राहतील, असे ते म्हणाले. “तुमच्या निमंत्रणाबाबत माझी आणि मल्लिकार्जुन खरगे यांची चर्चा झाली. अशा चर्चांमधून लोकांना आमच्या ध्येयधोरणाबाबत पक्की कल्पना मिळेल आणि योग्य निर्णय घेण्यासंबंधी त्यांना दिशा ठरवता येईल. तसेच आपापल्या मंचावरून होणारे बिनबुडाचे आरोप टाळण्यासाठीही अशी चर्चा महत्त्वाची आहे”, अशी भूमिका राहुल गांधी यांनी मांडली.

VIDEO : नंदुरबारची सभा संपताच काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी केले असे काही की, सुरक्षा यंत्रणेची तारांबळ

पंतप्रधान नरेंद्र मोदीही या चर्चेत सहभागी होतील, अशी आमची अपेक्षा असल्याचेही राहुल गांधी यांनी पत्रात म्हटले आहे.