राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया संपली असली तरीही चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी प्रचारसभांना वेग आला आहे. बीड लोकसभा मतदारसंघातून यंदा पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांच्या प्रचारासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी बीडमध्ये आले आहेत. यावेळी त्यांनी काँग्रेससह अनेक नेत्यांवर टीका केली. तसंच, सोनिया गांधींवर त्यांनी गंभीर आरोपही केला.

“मोदी विकसित भारताच्या मिशनवर निघाला आहे. या संकल्पासाठी आज मी आपल्याकडून काही मागायला आलो आहे. मला तुमच्याकडून आशीर्वाद पाहिजे आहेत. माझे वारसदार तुम्हीच आहात. तुमच्या येणाऱ्या पिढ्या माझे वारस आहेत. मी तुमच्या भविष्याला उत्तम बनवायला निघालो आहे. मी तुमच्या मुलांच्या भविष्याला उत्तम बनवण्याकरता दिवसरात्र मेहनत करत आहे. तुम्हीच माझं कुटुंब आहे. माझा भारत, माझं कुटुंब”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

“पण तुम्हाला माहीत आहे का की इंडीया आघाडी कोणत्या अजेंड्याला घेऊन निवडणुकीत आहे? यांचा एकच अजेंडा आहे. हे सरकारमध्ये येऊन मिशन कॅन्सल राबवणार. इंडीवाले सरकारमध्ये येतील, तेव्हा ते हटवलेलं कलम ३७० पुन्हा आणतील. सीएए रद्द करणार, तीन तलाकविरोधातील कायदा रद्द करतील, हे लोक मोदी शेतकरी सन्मान योजेतील पैसे रद्द करतील, मोफत रेशन योजना रद्द करतील, आम्ही देशाच्या ५५ कोटी गरिबांना ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार देत आहोत, काँग्रेस ही योजनासुद्धा रद्द करेल”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

“काँग्रेसवाले, इंडी आघाडीवाले राम मंदिरलाही रद्द करतील. तुम्ही आश्चर्यचकीत होऊ नका. २०-२५ वर्षे काँग्रेसमध्ये राहिलेल्या एका जुन्या नेत्याने ज्याने आता काँग्रेस सोडली आहे, त्यांनी खळबळजनक खुलासा केला आहे. ते म्हणाले की, कोर्टातून राम मंदिराच्या बाजूने निर्णय आला होता तेव्हा राजपुत्राने काही खास लोकांची मीटिंग बोलावली होती. काँग्रेस सरकार आल्यावर राम मंदिराबाबतचा सुप्रिम कोर्टाचा निर्णय बदलवू. यांच्या वडिलांनी तुष्टीकरणासाठी तीन तलाकच्या प्रकरणात सुप्रिम कोर्टाचा निर्णय बदलला होता. तसंच आता राम मंदिराचा निर्णय बदलतील”, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला.

दहशतवाद्यांसाठी अश्रू ढाळले होते

“महाराष्ट्र काँग्रेसचे लोक २६/११ दहशतवाद्यांना क्लीन चीट देत आहेत. कसाबसहीत जे १० आतंकवादी पाकिस्तानातून आले होते, असं वाटतंय की काँग्रेसचं त्यांच्याबरोबर काही नातं आहे. देश विचारू इच्छितं की काँग्रेसच्या लोकांचं आणि दहशतवाद्यांचं हे नातं काय आहे. तो दिवस देश विसरला नाहीय, जेव्हा काँग्रेसच्या काळात आंतकवाद्यांचं स्वागत पंतप्रधान आवासात होत असे. तसंच, बाटला हाऊसमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांसाठी काँग्रेसच्या बड्या महिला नेत्याने अश्रू ढाळले होते. इंडिया आघाडीवाल्यांनो, तोच दिवस पुन्हा आणू इच्छिता का? लक्षात ठेवा मोदी चट्टान बनून तुमच्यासमोर उभा आहे”, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.