बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार अशी नणंद-भावजय यांच्यात लढत होत आहे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आहे. असे असतानाच आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा राजेंद्र पवार यांनीही उमेदवारी अर्ज घेतला आहे. सुनंदा पवार यांनी उमेदवारी अर्ज घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फूटीनंतर बारामतीची निवडणूक ही प्रतिष्ठेची बनली आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यासाठी स्वत: शरद पवार प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. तर दुसरीकडे महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार प्रचार करत आहेत. सुनेत्रा पवार या १७ एप्रिलला आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. सुनेत्रा पवार यांच्याबरोबर अजित पवार यांचाही डमी अर्ज भरला जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : “सासूचे चार दिवस संपले, आता सुनेचे…”; अजित पवार यांचा शरद पवारांना टोला

आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे या उमेदवार आहेत. मात्र, सुनंदा पवार यांनीही उमेदवारी अर्ज घेतला असला तरी त्या सुप्रिया सुळे यांच्यासाठी डमी उमेदवार असतील अशी माहिती सांगितली जात आहे. कारण निवडणुकीचा अर्ज भरताना अनेक तांत्रिक गोष्टीची काळजी घ्यावी लागते. एखाद्या उमेदवाराचा तांत्रिक कारणामुळे अर्ज बाद झाल्यास निवडणुकीच्या रिंगणाबाहेर जावे लागते. त्यामुळे याबाबतची काळजी म्हणून अनेकदा डमी अर्ज भरले जातात. दरम्यान, सुनंदा पवार यांनी उमेदवारी अर्ज घेतल्यानंतर यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

“मी तीनवेळा निवडणूक लढले, साधारणपणे डमी अर्ज भरलाच जातो. मी आणि अजून एक असे दोन अर्ज भरले जातात”, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून दोन किंवा तीन डमी अर्ज का भरले जात आहेत, हे त्यांना विचारावे लागेल, असा टोलाही त्यांनी लगावला.