लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आणि महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यासाठी सोमवारी (ता. २० मे) मतदान होणार आहे. आतापर्यंत चार टप्यांतील मतदान झाले आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी एक व्हिडीओ एक्स अकाउंटवर पोस्ट केला आहे. तसेच बीड लोकसभा मतदारसंघातील मतदानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर थेट नाव न घेता गंभीर आरोप केले आहेत.

लोकसभा निवडणुकीचे आतापर्यंत चार टप्प्यात मतदान पार पडले आहे. या चारही टप्प्यातील मतदानादरम्यान बारामती, अहमदनगर, शिरूर मतदारसंघातील काही व्हिडीओ रोहित पवार यांनी एक्स अकाउंटवर शेअर केले होते. त्यामध्ये काही मतदान केंद्रामध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. १३ मे रोजी बीड लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडले होते. या मतदानानंतर विरोधकांनी मतदान केंद्रामध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप केला होता. मात्र, यानंतर आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी बीड लोकसभा मतदारसंघातील एक व्हिडीओ एक्स अकाउंटवर शेअर केला आहे.

हेही वाचा : “२०१९ मध्ये शिंदेच मुख्यमंत्री झाले असते, पण…”, राऊतांनी सांगितल्या आतल्या घडामोडी; फडणवीस-तटकरेंचा उल्लेख करत म्हणाले…

रोहित पवार यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं की, “बूथ ताब्यात घेऊन मतदान करण्याचा परळी पॅटर्न महाराष्ट्राला शोभत नाही. ही हिम्मत कुठून येते? निवडणूक आयोग किती दिवस बघ्याची भूमिका घेणार?”, असे अनेक सवाल रोहित पवार यांनी विचारले आहेत. रोहित पवार यांनी शेअर केलेला व्हिडीओ हा बीड जिल्ह्यातील इंजेगावमधील असल्याची माहिती समोर येत आहे. यानंतर येथील काही गावकऱ्यांनी प्रतिक्रिया देत आमच्या गावाला बदनाम करू नये, असं तेथील म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रोहित पवार यांचं ट्विट काय?

“बूथ ताब्यात घेऊन मतदान मारण्याचा हा नवा परळी पॅटर्न महाराष्ट्राला शोभत नाही. पंकजाताई तुम्ही कदाचित यामध्ये सहभागी नसालही, पण तुमचे बंधुराज कुठल्या पातळीला जाऊ शकतात. हे कदाचित तुम्हालाही माहित नसेल. महाराष्ट्रासारख्या राज्यात असे प्रकार घडवून आणण्याची हिम्मत येतेच कुठून? असे प्रकार करण्याची गरज पडतेच का? सत्तेतून ही हिम्मत येत असेल तर मग ही लोकशाहीसाठी निश्चितच धोक्याची घंटा आहे. निवडणूक आयोगाने स्थानिक मंत्री महोदयासह स्थानिक प्रशासनाची चौकशी करावी ही विनंती. निवडणूक आयोग किती दिवस बघ्याची भूमिका घेतं, हे बघुया”, असं रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. दरम्यान, रोहित पवार यांनी केलेल्या या आरोपावर धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया आलेली नाही.