काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांचा दबाव झुगारत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांचे नातू तथा माजी खासदार प्रकाशबापू पाटील यांचे पूत्र विशाल पाटील यांनी सांगलीची लोकसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवण्याचा निर्णय घेतला आहे. विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्जदेखील दाखल केला आहे. विशाल पाटलांना या निवडणुकीत निवडणूक आयोगाकडून ‘लिफाफा’ हे चिन्ह देण्यात आलं आहे. दुसऱ्या बाजूला पाटलांनी संपूर्ण मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून पाटलांनी अनेकवेळा मतदारसंघात जोरदार शक्तीप्रदर्शनदेखील केलं आहे. विशाल पाटील ही निवडणूक लढत असल्यामुळे सांगलीत आता तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. सांगलीत भाजपा उमेदवार संजयकाका पाटील, ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील आणि विशाल पाटील यांच्यात सामना होणार आहे.
विशाल पाटलांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी महाराष्ट्र काँग्रेसमधील काही नेत्यांनी प्रयत्न केले, मात्र पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. विशाल पाटील यांना त्यांचे थोरले बंधू प्रतीक पाटील, पलूस-कडेगावचे आमदार विश्वजीत कदम यांच्यासह सांगलीतील इतर नेत्यांचं पाठबळ आहे. त्यामुळे पाटील यांनी माघार घेतली नाही. दरम्यान, पाटलांना भाजपाने फूस लावल्याचं वक्तव्य ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.
संजय राऊत म्हणाले, मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीने सांगलीत दोन दोन उमेदवार उभे केले आहेत. आमच्या पैलवानाशी लढत द्यायला त्यांचा एक उमेदवार कमी पडतोय म्हणून त्यांनी दोन उमेदवार दिले आहेत. आमचे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे भाजपाला जड जातायत. त्यामुळे भाजपाने दुसरा उमेदवार लिफाफा घेऊन पाठवला आहे. त्याच्यावर आम्ही योग्य वेळी बोलू. या लिफाफ्यामागे कोण आहे? यामागे कोणाची प्रेरणा आहे? कोणाची ताकद आहे? याबद्दल लवकरच बोलू.
भाजपाने लिफाफा घेऊन दुसरा उमेदवार पाठवण्याचं कारस्थान रचलं आहे. भारतीय जनता पार्टीला सांगलीची निवडणूक सोपी जात नाहीये, आमचे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील झपाट्याने पुढे जातायत, लोकांचा त्यांना मोठा पाठिंबा मिळतोय, त्यामुळे घराघरात लिफाफे वाटण्यासाठी भाजपाने अप्रत्यक्षपणे दुसरा उमेदवार आणलाय का अशी लोकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे.
हे ही वाचा >> “…त्यांनी मंगळसुत्रांची उठाठेव करू नये”, राऊतांची पंतप्रधानांवर टीका; म्हणाले, “काश्मीरमध्ये मोदीपुरस्कृत दहशतवाद्यांनी…”
संजय राऊत म्हणाले, राज्य मंत्रिमंडळाने राज्यातील साखर कारखान्यांना कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरही संजय राऊत यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली. राऊत म्हणाले, महाराष्ट्र कॅबिनेटने राज्यातील साखर कारखान्यांना काही हजार कोटी रुपयांचं कर्ज देणं म्हणजे ऐन निवडणुकीच्या तोंडावर दिलेली ही एक प्रकारची लाच आहे. निवडणुकीच्या आधी साखर कारखान्यांना अशा प्रकारे हजारो कोटींचा मलिदा देणे ही निवडणुकीतील मतदानासाठी दिलेली लाच आहे, हा मोठा भ्रष्टाचार आहे. मतं विकत घेण्यासाठी हा त्या त्या भागात दिलेला सरकारी निधी आहे. आता मला विचारायचं आहे की हे सगळं चालू असताना नेमका निवडणूक आयोग कुठे आहे? निवडणूक आयोग जागेवर आहे का हे आता पहावं लागेल.