राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणात मतमोजणी सुरू आहे. सुरूवातील समोर आलेल्या कलानुसार मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजपा आघाडीवर आहे. तर, छत्तीसगड आणि तेलंगणात काँग्रेस आघाडीवर दिसत आहे. यावर शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “राजस्थान आणि मध्य प्रदेशात भाजपाला यश मिळालं, तर त्याचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री अमित शाह यांचं नाही, तर शिवराज सिंह चौहान आणि वसुंधरा राजे शिंदे यांचं असेल,” असं राऊतांनी सांगितलं.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले, “पाचही राज्यात आपलं सरकार येईल, हा भाजपाचा दावा एक विनोद म्हणून घ्यायला हवा. मिझोरामध्ये भाजपा कुठे औषधालाही दिसत नाही. तेलंगणात भाजपा चौथ्या क्रमांकाला आहे. तेलंगणात भाजपाला १० जागाही मिळण्याची शक्यता नाही. छत्तीसगडमध्ये काँग्रेसचं सरकार येणार आहे.”

“मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये काँग्रेस-भाजपा जोरदार लढाई आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजपाला यश मिळालं, तर त्याचं श्रेय मोदी किंवा शाहांचं नसेल. तर, मध्य प्रदेशात शिवराज सिंह चौहान आणि राजस्थानमध्ये वसुंधरा राजे शिंदे यांचं श्रेय असेल,” असं संजय राऊतांनी म्हटलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, छत्तीसगडमध्ये भाजपा ४० तर काँग्रेस ३६ जागांवर आघाडीवर आहे. तर, तेलंगणात काँग्रेस ५४ आणि भारत राष्ट्र समिती ( बीआरएस ) ३३ आणि भाजपाचे ७ उमेदवार आघाडीवर आहेत. मध्य प्रदेशात भाजपा १४९ तर काँग्रेस ६२ आघाडीवर असल्याचं दिसत आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. भाजपा १०० तर काँग्रेस ७८ जागांवर आघाडीवर आहे.