बाळासाहेब ठाकरेंवर माझं प्रेम होतं. मी ते कधीच विसरु शकत नाही, त्यांच्यावर माझी श्रद्धा आहे. त्यामुळेच आमचे आमदार जास्त असूनही आम्ही एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. त्यावरुन आता संजय राऊत यांनी नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. मोदींचं बाळासाहेबांबाबत असलेलं प्रेम खोटं आहे असं संजय राऊत म्हणाले आहेत.

काय म्हणाले संजय राऊत?

“नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात आणि शिवसेनेत अडचणी निर्माण केल्या. बाळासाहेब ठाकरेंवर जर नरेंद्र मोदींचं प्रेम असतं तर त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना अशा प्रकारे फोडली असती का? त्यांनी शिवसेना नुसती फोडली नाही तर बाळासाहेब ठाकरेंनी दिलेलं शिवसेना हे नाव एका बेइमान माणसाला देण्याचं कृत्य केलं. बाळासाहेब ठाकरेंचं चिन्ह असलेला धनुष्य-बाण बेइमानाच्या हाती ठेवला. मोदींचं बाळासाहेब ठाकरेंवरचं उफाळून आलेलं प्रेम खोटं आहे. नकाश्रू आहेत.” असं म्हणत संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे.

उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मोदी यांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय ? ठाकरे गटाला सहानुभूती की नुकसान

खिडकी काय दरवाजा उघडला तरीही आम्ही जाणार नाही

बाळासाहेब ठाकरेंबाबत वक्तव्य करुन नरेंद्र मोदी उद्धव ठाकरेंसमोर एक वेगळी खिडकी उघडू पाहात आहेत का? असं विचारलं असता संजय राऊत म्हणाले, “मोदींनी खिडकी काय दरवाजे उघडले तरीही आम्ही त्यासमोर उभं राहणार नाही. स्वाभिमान नावाची गोष्ट महाराष्ट्रात शिल्लक आहे. जर ते खिडकी वगैरे उघडत असतील तर त्यांना बहुमत दिसत नाही, पराभव स्पष्ट दिसतोय म्हणून ते अशा फटी, खिडक्या, दरवाजे शोधत आहेत. सध्याच्या घडीला मोदी आणि शाह अडचणींत आले आहेत.” अशीही टीका संजय राऊत यांनी केली. आदित्य ठाकरेंनीही भाजपासह पुन्हा जाण्याच्या चर्चांवर मौन सोडलं आहे. आता ते शक्य नसल्याचं ते म्हणाले आहेत. तर दुसरीकडे संजय राऊत यांनीही पुन्हा एकदा भाजपासह जाण्याच्या चर्चांना अर्थ नाही असं म्हटलं आहे.

हे पण वाचा- पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य चर्चेत, “उद्धव ठाकरे हे माझे शत्रू नाहीत, उद्या…”

बाळासाहेब ठाकरेंबाबत मोदींनी काय म्हटलं होतं?

“बाळासाहेब ठाकरेंचं माझ्यावर खूप प्रेम होतं. त्यांची ती आपुलकी, प्रेम हे मी कधीही विसरु शकत नाही. आजच्या घडीला महाराष्ट्रात आमचे सर्वाधिक आमदार आहेत. तरीही शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देऊन आम्ही एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं. मी बाळासाहेब ठाकरेंना वाहिलेली ही एक प्रकारे आदरांजली आहे. बाळासाहेब ठाकरेंवर माझी खूप श्रद्धा आहे, मी त्यांचा आदर आजही करतो आणि यापुढे आयुष्यभर करत राहिन” टीव्ही ९ ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. त्यावर आता संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे.