शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी एका प्रचारसभेत बोलताना शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शायना एनसी यांच्याबाबत एक विधान केलं होतं. मुंबादेवीत इम्पॉर्टेड चालत नाही, ओरिजनल माल चालतो, असे ते म्हणाले होते. या विधानानंतर त्यांच्यावर चहुबाजूने टीका होऊ लागली. दरम्यान, आता शायना एन.सी यांनी यावरून अरविंद सावंत यांना लक्ष केलं आहे.

काय म्हणाल्या शायना एनसी?

शायना एन.सी यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी या विधानावरून अरविंद सावंत यांच्यावर जोरदार टीका केली. “अरविंद सावंत यांनी शुक्रवारी माझ्याबाबत टिप्पणी केली. मी इम्पोर्टेड माल असल्याचे त्यांनी म्हटलं. एका स्वाभिमानी महिलेला तुम्ही माल म्हणता? इतकंच नाही, तर त्यावर त्यांच्याबाजुने उभे असलेले आमदार अमीन पटेल हसतात, हे दुर्दैवी आहे. यातून त्यांची पुरुषप्रधान मानसिकता दिसून येते”, असं त्या म्हणाल्या.

हेही वाचा – CM Eknath Shinde : अरविंद सावंत यांच्या ‘त्या’ विधानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “राजकारणापायी…”

“उद्धव ठाकरे गटाने भूमिका स्पष्ट करावी”

पुढे बोलताना, “हेच अरविंद सावंत आज माफी मागत आहेत, पण त्यांच्याच पक्षाचे खासदार संजय राऊत अरविंद सावंत यांच्या विधानाचे समर्थन करत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाने आता त्यांची भूमिका स्पष्ट करावी”, अशी मागणीही त्यांनी केली.

“तेव्हा मी त्यांची लाडकी बहीण होती, पण आता…”

“२०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मी अरविंद सावंत यांच्यासाठी प्रचार केला होता. त्यावेळी मी त्यांची लाडकी बहीण होती, पण आता मी इम्पोर्टेड माल झाली आहे. खरं तर माझ्या कुटुंबाच्या तीन पिढ्या मुंबईत राहत आहेत. मी अनेक वर्षांपासून दक्षिण मुंबईत कामं करते आहे. मी मुंबादेवीची मुलगी आहे. त्यामुळे मी आयात केलेली उमेदवार नाही, तर स्थानिक उमेदवार आहे”, असेही त्या म्हणाल्या.

“आता महाविकास आघाडीचे नेते का बोलत नाही?”

“मी एक स्वाभिमानी महिला आहे. मात्र, हे लोक मला माल म्हणतात. आता महाविकास आघाडीचे नेते कुठं आहेत? ज्यावेळी राज्यात एखाद्या महिलेवर अत्याचार होतो, तेव्हा प्रियंका चतुर्वैदी असो किंवा सुप्रिया सुळे असो, आवाज उठवतात, पण आता त्या काहीही बोलायला तयार नाही. महाविकास आघाडीचे नेते नाना पटोले, शरद पवार आणि उद्धव ठाकरे सुद्धा यावर बोलत नाही”, अशी टीकाही त्यांनी केली.

हेही वाचा – Arvind Sawant : “शायना एन. सी. माझी जुनी मैत्रीण…”, ‘त्या’ वक्तव्यावरून अरविंद सावंत यांचं स्पष्टीकरण!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अरविंद सावंत नेमकं काय म्हणाले होते?

मुंबादेवी मतदारसंघातून काँग्रेसच्या अमिन पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांचा प्रचार करण्याकरता अरविंद सावंत २९ ऑक्टोबर रोजी त्यांच्या मतदारसंघात गेले होते. शायना एन. सी याआधी वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छूक होत्या. परंतु, त्यांना मुंबादेवी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. याबाबत बोलताना अरविंद सावंत म्हणाले, “त्यांची अवस्था पहा. त्या आयुष्यभर भाजपात राहिल्या आणि आता शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षात आल्या. पण इथे इम्पोर्टेड चालत नाही. आमच्या इथे ओरिजनल माल चालतो.”