महाराष्ट्रातील सत्ताधारी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आता गोव्यातील विधानसभा निवडणूक एकत्र लढणार आहेत. गोव्याशिवाय उत्तर प्रदेशातही शिवसेना उमेदवार देणार आहे. शनिवारी पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ही माहिती दिली होती. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महाराष्ट्रातील तीन पक्षांच्या महाविकास आघाडीच्या धर्तीवर गोव्यात युतीचा नवा प्रयोग करण्याचा प्रयत्न असल्याचे राऊत म्हणाले. याअंतर्गत गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार आहेत. मात्र निवडणुकांआधी काँग्रेस सोबत नसणार हे आता स्पष्ट झाले आहे. संजय राऊत यांनी माध्यमांसोबत बोलताना याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

“पश्चिम बंगालमध्ये लाखोंच्या सभा पंतप्रधान, गृहमंत्री आणि भाजपा अध्यक्षांनी घेतल्या. तिसऱ्या लाटेचा जोर दुसऱ्या लाटेपेक्षा जास्त आहे. महाराष्ट्रात आकडे भयावह आहेत तर उत्तर प्रदेशात रुग्णांची नोंदच होत नाही. त्यामुळे पुढच्या महिनाभरात उत्तर प्रदेशात काय होईल हे सांगता येत नाही. निवडणुक आयोगाने आरोग्य विभागाबरोबर चर्चा केल्याचे म्हटले आहे. पण हा काही उपाय नाही. निवडणुका वेळेत जाहीर केल्या आहेत पण लोकांचे प्राण महत्त्वाचे आहेत. अनेकदा निवडणुका काही काळासाठी पुढे ढकलल्या जातात. पण कोणाला तरी घाई झाली आहे पटकन निवडणुका घेण्याची. पंजाब, उत्तर प्रदेश, मनीपूर आणि उत्तराखंडमध्ये करोनाच्या बाबतीत परिस्थिती चांगली नाही. निवडणुक आयोगाने निर्बंध घातले आहेत. हे कागदावरती ठिक आहेत. देशाचे पंतप्रधान आणि भाजपा अध्यक्षांना कुठलेही नियम नसतात आणि तेच इतरांसाठी असतात. त्यामुळे निवडणुकांच्या आचारसंहितेच्या बाबतही समान नागरी कायदा असायला हवा, असे संजय राऊत म्हणाले.

“गोव्यामध्ये महाविकास आघाडीसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आम्ही मनापासून प्रयत्न केले पण काँग्रेसच्या मनामध्ये आहे की ते गोव्यामध्ये स्वबाळावर सत्ता आणू शकतात. त्यांनी तसे संकेत दिल्लीत दिले असतील त्यामुळे ते मागेपुढे करत आहेत. काँग्रेसने आम्हाला काही जागा दिल्या आहेत पण आमच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. आम्ही प्रयत्न करत आहोत पण शिवसेना निवडणुका लढणार आहे,” अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

डिपॉझिट जप्तीसाठी शिवसेनेला पैसे मिळतात : चंद्रकांत पाटील</strong>

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, उत्तर प्रदेश आणि गोव्यात दुसऱ्यांदा शिवसेना निवडणूक लढवण्याच्या घोषणेवर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला आहे. पुण्यात पाटील यांनी दावा केला की, विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला प्रत्येक वेळी उमेदवारांच्या अनामत रक्कम जप्त करण्यासाठी पैसे मिळतात. त्यामुळे उत्तर प्रदेश आणि गोव्यात शिवसेना निवडणूक लढवत आहे. दरम्यान, राऊत यांच्या वक्तव्यावर पाटील म्हणाले की, भाजपाने जर विरोधी पक्षाचे नेते आपल्या दरबारात उभे केले असतील तर शिवसेनेनेही तेच करायला हवे. शिवसेनेला असे यश का मिळत नाही?