पंजाब विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर अभिनेता सोनू सुदच्या बहिणीने काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. सोनूची बहीण मालविका सूद पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी पंजाब काँग्रेस कमिटीचे प्रमुख नवज्योत सिंग सिद्धू यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये सामील झाल्या आहेत. यावेळी अभिनेता सोनू सूद देखील उपस्थित होता.

“सामाजिक कार्यकर्त्या आणि अभिनेता सोनू सूदची बहीण मालविका सूद सच्चर यांचे पक्षात स्वागत. मला खात्री आहे की मालविका पूर्ण प्रामाणिकपणे आणि सचोटीने लोकांची सेवा करेल आणि काँग्रेस पक्षाचा संदेश तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करेल,” असं ट्वीट मुख्यमंत्री चन्नी यांनी केलंय.

“राजकारण म्हणजे लोकांची सेवा करणे आहे आणि मालविका सूदने केवळ याच उद्देशाने पक्षात प्रवेश केला आहे”, असे पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांनी सोमवारी सांगितले. “आता मोगामधून काँग्रेसचा उमेदवार कोण असेल यात शंका नसावी,” असेही ते म्हणाले. त्यांच्या या ट्वीटमुळे मालविका मोगा मतदारसंघातून निवडणूक लढवतील हे स्पष्ट झालंय.

सोनू सूदने देखील बहिणीने काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर ट्वीट केलंय. “माझी बहीण मालविका सूद तिच्या राजकीय प्रवासाला सुरुवात करतेय. मी तिला शुभेच्छा देतो आणि तिच्या आयुष्याच्या या नवीन अध्यायात तिची प्रगती होण्याची वाट पाहतोय. मालविकाला शुभेच्छा! एक अभिनेता म्हणून माझे कार्य आणि लोकांना मदत करणं कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय सुरू आहे,” असं त्याने ट्वीटमध्ये म्हटलंय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापूर्वी सोनु सूद देखील राजकारणात येणार असल्याच्या चर्चा होत्या. परंतु सोनूने नाही तर, त्याची बहीण मालविकाने काँग्रेसमध्ये प्रवेश करून तिच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली आहे.