महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे पाचही टप्पे पार पडले आहेत. तर देशातले दोन टप्पे अद्याप बाकी आहेत. १ जून रोजी लोकसभा मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडणार आहे. त्यानंतर ४ जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या दिवशी नेमकं काय होणार याकडे देशाचं लक्ष लागलं आहे. अशात रासपचे प्रमुख महादेव जानकर यांनी मोठा दावा केला आहे. महाविकास आघाडीचे नेते आमच्या ३० ते ३५ जागा येतील असा दावा करत आहेत. तर महायुतीचे नेते ४० पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा दावा करत आहेत. महादेव जानकरांच्या वक्तव्याने लक्ष वेधलं आहे.

काय म्हणाले महादेव जानकर?

“मी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी ५५ सभा घेतल्या. मला त्यावेळी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांविषयी सहानुभूती दिसली. तरीही महायुतीच्या ४२ जागा येतील असा विश्वास महादेव जानकर यांनी व्यक्त केला आहे. तसंच बीडमध्ये पंकजा मुंडे, परभणीत मी आणि बारामतीत सुनेत्रा पवार निवडून येतील असाही दावा जानकर यांनी केला आहे. तसंच महाविकास आघाडीने खतपाणी घालून मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद बीड आणि परभणीत उभा केला असं महादेव जानकर यांनी म्हटलं आहे. बीड आणि परभणीत सगळ्यात जास्त कोण फिरलं हेदेखील पाहिलं पाहिजे. एका जातीवर राजकारण करणं चुकीचं आहे असंही जानकर म्हणाले.

हे पण वाचा- महादेव जानकर यांचं मोठं विधान; म्हणाले, “मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा…”

बारामती आणि बीडबाबत काय म्हणाले जानकर?

बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार, बीडमधून पंकजा मुंडे आणि परभणीतून मी निवडून येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे असं महादेव जानकर म्हणाले. एबीपी माझाशी केलेल्या चर्चेत त्यांनी हे विधान केलं आहे. अशात महादेव जानकर यांचा दावा खरा ठरतो का ? हे पाहण्यासाठी ४ जून पर्यंत वाट बघावी लागणार आहे. कारण ४ जूनलाच सगळं चित्र स्पष्ट होणार आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा काही प्रमाणात फटका आपल्याला बसला असल्याचं महादेव जानकर यांनी म्हटलं आहे. तसेच महाराष्ट्रात ४८ जागांपैकी महायुतीला ४२ जागा मिळतील आणि महाविकास आघाडीला फक्त ६ जागा मिळतील, असा दावा महादेव जानकर यांनी केला आहे.

परभणीत विजयाचा गुलाल माझाच असेल

“परभणीच्या जनतेने कोणाला आशीर्वाद दिला हे ४ जून रोजी कळेल. मात्र, मी परभणीच्या जनतेचे आभार मानतो. कारण त्यांनी मला लवकर स्वीकारलं. विकासाच्या मुद्यांवर येथील जनतेनं माझ्यावर प्रेम केलं. यामध्ये सर्व समाजातील लोकांनी मला मदत करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ४ जून रोजी विजयाचा गुलाल हा माझा असेल असा विश्वास वाटतो”, असंही जानकर म्हणाले.