Telangana Assembly Election 2023 : प्रखर हिंदुत्ववादी म्हणून ओळख असलेल्या आणि वर्षभरापूर्वी तेलंगणा भाजपामधून निलंबित केलेल्या टी. राजा सिंह यांचे भाजपाकडून पुनर्वसन करण्यात आले आहे. त्यांना गोशामहल या मतदारसंघातून पून्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. ३० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपाने तेलंगणामधील ५२ मतदारसंघांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यामध्ये भाजपाने राजा सिंह यांना गोशामहल येथून तिकीट दिले असल्याचे नमूद केले आहे. राजा सिंह आतापर्यंत निवडणूक प्रक्रिया आणि प्रचारापासून लांब राहिले होते. पक्षाने निलंबन मागे घेऊन तिकीट दिले नाही, तर आपण अपक्ष म्हणून निवडणुकीला उभे राहू, अशी घोषणा राजा सिंह यांनी हल्लीच केली होती. त्यानंतर भाजपाने त्यांना तिकीट देण्याचा निर्णय जाहीर केला. जरी अपक्ष म्हणून निवडणूक जिंकलो तरी आपण भाजपालाच पाठिंबा देऊ, असेही त्यांनी जाहीर केले होते.

तेलंगणा भाजपाचे प्रमुख व केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी सांगितले की, राजा सिंह यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर पक्षाच्या केंद्रीय शिस्तपालन समितीने त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली होती. या नोटिशीला त्यांनी दिलेले उत्तर समाधानकारक असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले. २०१८ साली विद्यमान सत्ताधारी भारत राष्ट्र समितीच्या बाजूने वारे वाहत असताना भाजपाच्या पाच आमदारांपैकी सिंह हे एकमेव आमदार असे होते; ज्यांनी आपली जागा कायम राखली.

हे वाचा >> तेलंगणा विधानसभेसाठी भाजपाची पहिली यादी जाहीर, KCR यांच्याविरोधात BRS च्या माजी नेत्याला उमेदवारी; तीन खासदारही रिंगणात

मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात राजा सिंह यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला होता; ज्यात त्यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर हैदराबाद पोलिसांनी त्यांना अटक केली होती. त्यानंतर भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांना पक्षातून निलंबित केले होते. राजा सिंह यांचे वक्तव्य पक्षाच्या घटनेविरोधात असल्याने त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली होती; ज्याचे लेखी उत्तर द्यावे, असे निर्देश पक्षाने दिले होते.

मुन्नवर फारूकीच्या विरोधासाठी बनवला होता व्हिडीओ

हैदराबाद येथे स्टॅण्डअप कॉमेडियन मुन्नवर फारूकी याचा कार्यक्रम होणार होता. त्याआधी राजा सिंह यांनी एक व्हिडीओ प्रसारित करून, त्याच्यावर टीका केली होती. आपण पोस्ट केलेला व्हिडीओ मनोरंजनासाठी असून, त्यात कुठेही प्रेषितांचा उल्लेख केलेला नाही, अशी भूमिका राजा सिंह यांनी घेतली होती. हैदराबाद येथे मुस्लीम संघटनांनी त्यांच्याविरोधात आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली.

मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात राजा सिंह यांनी कारणे दाखवा नोटिशीला तुरुंगातूनच उत्तर दिले. तेलंगणा राज्य सरकारने एमआयएम पक्षाच्या दबावाला बळी पडून, आपल्यावर खोटे गुन्हे दाखल केले असल्याचा दावा त्यांनी केला होता. ” तेलंगणा सरकारने मुन्नवर फारूकीला दिलेल्या निमंत्रणाला आपण विरोध केला होता. भाजपाचा विधिमंडळ पक्षनेता या नात्याने फारूकीचा कार्यक्रम रद्द करण्यात यावा”, असे निवेदन बीआरएस सरकारला दिले असल्याचे राजा सिंह यांनी पत्रात म्हटले होते. कारण याआधी फारूकीने हिंदू देवतांच्या विरोधात विधान केल्यामुळे काही ठिकाणी धार्मिक तणाव निर्माण झाला होता, असे कारण राजा सिंह यांनी पुढे केले होते.

“राज्य सरकारने माझ्या निवेदनाची दखल तर घेतलीच नाही; उलट फारूकीला सुरक्षा पुरवून निमंत्रित केले. फारूकीच्या कार्यक्रमाविरोधात आंदोलन केल्यामुळे माझ्यासह ५०० भाजपा कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून, अटक करण्यात आली. फारूकी आपल्या कार्यक्रमात काय चाळे करतो, हे दाखविण्यासाठी मी तो व्हिडीओ तयार केला होता. मी कोणत्याही धर्माचा अवमान केलेला नाही किंवा कोणत्याही देवी-देवता आणि धर्मावर टीका केली नाही. मी कुणाचेही नाव व्हिडीओमध्ये घेतलेले नाही. गूगलवरून माहिती गोळा करून, मी फक्त फारूकीची नक्कल केली होती. त्यामुळे मी भाजपाचे संविधान किंवा पक्षाची शिस्त भंग केली, असे मला वाटत नाही”, अशी भूमिका राजा सिंह यांनी उत्तरात मांडली होती.

हे वाचा >> Telangana : कल्याणकारी योजना विरुद्ध बेरोजगारी-लाचखोरी; तेलंगणच्या जनतेसमोर काय आहेत पर्याय?

तब्बल तीन महिने तुरुंगात काढल्यानंतर तेलंगणा उच्च न्यायालयाने मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात राजा सिंह यांना अटी-शर्तींवर जामीन दिला. द्वेषपूर्ण वक्तव्य केल्याबाबत महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातही त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आले होते. मागच्याच आठवड्यात कर्नाटक उच्च न्यायालयाने त्यांच्याविरोधातील फौजदारी प्रकिया रद्द ठरविली.

टी. राजा सिंह कोण आहेत? त्यांची पार्श्वभूमी काय?

४६ वर्षीय राजा सिंह हे गोशामहल या मतदारसंघातून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. मतदारसंघात ते राजा भैया किंवा टायगर भैया या नावाने प्रसिद्ध आहेत. मतदारसंघ आणि हैदराबाद परिसरात त्यांची बरीच लोकप्रियता आहे. विशेषकरून कट्टर गोरक्षक म्हणून त्यांना ओळखले जाते. बजरंग दलाचे सदस्य असलेले सिंह २००९ साली राजकारणात उतरले. मंगलहाट या ठिकाणाहून तेलगू देसम पक्षाचे नगरसेवक या पदापासून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपामध्ये प्रवेश करीत गोशामहल या मतदारसंघात दणदणीत विजय मिळवून काँग्रेसकडून हा मतदारसंघ खेचून घेतला.

कायदा व सुव्यवस्थेत बाधा आणणे, कर्फ्यूच्या आदेशाचे उल्लंघन करणे व द्वेषपूर्ण भाषण यासंबंधीचे ७५ हून अधिक एफआयआरसिंह यांच्यावर दाखल झालेले आहेत. अयोध्येतील राम मंदिराचा विरोध करणाऱ्यांचा ते अनेकदा सोशल मीडियावरून समाचार घेतात आणि त्यांना धमकीवजा इशारा देत असतात. ज्यावेळी सिंह यांनी प्रेषितांवर वक्तव्य करून वाद ओढवून घेतला होता, त्यावेळी पक्षाने त्यांच्यापासून अंतर राखले. सिंह यांच्या विधानामुळे भाजपा बीआरएस व काँग्रेस यांच्याविरोधात लढत असलेली लढाई कमकुवत होत असून, भ्रष्टाचार, घराणेशाही या मुद्द्यांवरचे लक्ष बाजूला होत आहे, अशी भूमिका पक्षाने जाहीर केली होती.

आणखी वाचा >> महाराष्ट्र-तेलंगणा सीमावाद पुन्हा का वाढतो आहे?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपामधील सूत्रांनी सांगितले की, सिंह जे बोलतात आणि करतात, त्यामागे पक्षाचा नेहमीच पाठिंबा असतो, असे नाही. “सिंह त्यांचे निर्णय स्वतः घेत असतात. ते पक्षाच्या इतर नेत्यांना फारसे भेटत नाहीत किंवा अलिप्त राहणे पसंत करतात. परंतु, ते पक्षाशी एकनिष्ठ असल्यामुळे वरिष्ठ नेते त्यांना सहन करीत असतात”, अशी प्रतिक्रिया एका पदाधिकाऱ्याने दिली.