ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अमरावतीतल्या सभेत नवनीत राणा यांचा उल्लेख नाची, बबली असा केला होता. त्यानंतर नवनीत राणा आणि रवी राणा यांची प्रतिक्रिया समोर आली. संजय राऊत यांनी माझ्याविषयी बोलण्याआधी स्वतःच्या सासरी गेलेल्या मुलीकडे, स्वतःच्या आईकडे आणि पत्नीकडे पाहायला हवं होतं असं नवनीत राणा म्हणाल्या. त्यानंतर नाचीला नाची म्हणायचं नाही तर मग काय म्हणायचं? अशी संजय राऊत यांची प्रतिक्रिया आली आहे.

काय म्हणाले होते संजय राऊत?

“ज्या बाईनं मातोश्रीला आव्हान देण्याचा प्रयत्न केला, ज्या बाईनं मातोश्रीत घुसण्याचा प्रयत्न केला, मातोश्रीविषयी अपशब्द वापरले, हिंदुत्वाविषयी अपशब्द वापरले. त्या बाईचा पराभव करणं शिवसैनिकांचं पहिलं कर्तव्य आणि नैतिक कर्तव्य आहे. ती नाची…डान्सर.. बबली.. तुम्हाला खुणावेल.. पडद्यावरून इशारे करेल.. पण भुरळून जाऊ नका.. अशा एका अप्सरेने विश्वामित्रांनाही फसवले होते” हे विसरु नका. असं संजय राऊत म्हणाले होते.

हे पण वाचा- संजय राऊत म्हणतात, ‘ती नाची, डान्‍सर, बबली….’

काय म्हणाल्या नवनीत राणा?

“कोण संजय राऊत? महिला जेव्हा काम करत असतात तेव्हा त्यांना या सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागतात. यांच्यासारख्या लोकांनी सीतेलाही तिचे भोग भोगायला लावले. मी अमरावतीची सून आहे. तरीही माझा अपमान केला. संजय राऊतांनी बोलताना ज्या मुलीची लग्नानंतर सासरी पाठवणी केली तिचा विचार करायला हवा होता. ज्या आईच्या पोटातून जन्म घेतला त्या आईचा विचार करायला हवा होता. माझ्यावर टीका करण्याआधी स्वतःच्या पत्नीकडे एकदा बघायचं होतं. एखादी महिला सार्वजनिक क्षेत्रात काम करते म्हणजे तिचा स्वाभिमान विकत नाही. नवनीत राणासह अमरावतीतल्या प्रत्येक महिलेचा स्वाभिमान जोडला गेला आहे. संजय राऊत यांनी माझाच नाही प्रत्येक महिलेचा अपमान केला आहे.”

या टीकेनंतर काय म्हणाले संजय राऊत?

“मी कुठलाही असंसदीय शब्द वापरलेला नाही. नाचीला नाची नाही तर मग काय म्हणायचं? मी म्हटलं नटी आहे तर मग काय म्हणणार? डान्सरला नाची म्हणालो. मला डान्सर शब्द आठवला नाही.” असं संजय राऊत म्हणाले. तर जयंत पाटील म्हणाले नाची हा शब्द मराठी आहे. मी ऐकलं तुमचं भाषण असं म्हणाले.