पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी देशभरात वेगवेगळ्या भागात प्रचारसभा घेत आहेत. यादरम्यान मोदींकडून विरोधकांवर केल्या जाणाऱ्या टीकेसंदर्भात बरीच चर्चा पाहायला मिळत आहे. मोदींनी मुलांच्या संख्येवरून, मंगळसूत्रावरून किंवा अदाणी-अंबानींवरून केलेल्या टीकेबाबत विरोधकांकडून तीव्र निषेध केला जात आहे. याचसंदर्भात महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांना विचारणा केली असता त्यांनी त्यावरून मोदीवर परखड शब्दांत टीकास्र सोडलं.

काय म्हणाले तुषार गांधी?

मुंबईत इंडिया आघाडीच्या उमेदवारासाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत तुषार गांधी सहभागी झाले होते. यावेळी त्यांना मराठी भाषिकांना प्रवेश नाही, अशा आशयाच्या व्हायरल झालेल्या नोकरीसंदर्भातल्या पोस्टबाबत विचारणा केली असता मराठी व गुजराती हे मुंबईचा आत्मा असल्याचं ते म्हणाले. “मुंबईच्या आत्म्यामध्ये मराठी, गुजराती अशा सगळ्यांचे श्रम, रक्त आहे. ते विभाजित करता येणार नाहीत. पण आपल्या राजकारणात ही विभाजनाची वृत्ती आली आहे. आपण मिळून-मिसळून राहिलो तर ते त्यांना आवडत नाही. कारण तसं झालं तर त्यांचं राजकारण चालू शकत नाही. त्यांनी इंग्रजांकडून राजकारणाचे धडे घेतले आहेत. फोडा आणि राज्य करा. त्यामुळेच मुंबईत गुजराती आणि मराठी लोकांचा अनेक वर्षांपूर्वीचे संबंध तोडण्याचा ते प्रयत्न करत आहेत. पण या एकीतच मुंबईचं स्पिरीट आहे”, असं तुषार गांधी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका

दरम्यान, यावेळी तुषार गांधी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जाहीर सभा आणि त्यांची भाषणं याबाबत विचारणा केली असता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “निवडणूक जसजशी पुढे जात आहे, तसतशी पंतप्रधानांची झोपमोड झाली आहे. जेव्हा त्यांनी निवडणुकीसाठी प्रचार सुरू केला, तेव्हा अब की बार ४०० पार अशी घोषणा होती. तिथून आता मंगळसूत्र, मुसलमान, अदाणी, अंबानींवर ते आले आहेत. त्यामुळे हे स्पष्टपणे दिसून येत आहे की त्यांना किती असुरक्षित वाटतंय”, असं तुषार गांधी म्हणाले.

“त्यांना गद्दार नाही तर हुतात्मा म्हणायचं का?”; पंतप्रधान मोदींची नक्कल करत प्रियांका चतुर्वेदींची पुन्हा टीका

“मोदींना असुरक्षित वाटतंय याचं कारण एकच आहे. भारताचा आत्मा एकत्र येत आहे. इंडिया आघाडी म्हणजे भारताचा आत्मा आहे. त्या शक्तीसमोर इंग्रजही उभे राहू शकले नाहीत”, असं भाष्य तुषार गांधी यांनी केलं आहे.

“मोदींचा कुणावरच विश्वास नाही”

खुद्द पंतप्रधान मोदी महाराष्ट्रासह वेगवेगळ्या ठिकाणी उमेदवारांच्या प्रचारासाठी फिरत आहेत. त्यावरून तुषार गांधी यांनी खोचक टीका केली आहे. “निवडणुका आल्या की प्रचारासाठी सर्व माध्यमं वापरली जातात. यात काही नवल नाही. पण भारताचा इतिहास जर आपण पाहिला तर पंतप्रधानांनी प्रचारक म्हणून कधी एवढं काम केलं नव्हतं जेवढं मोदींना करावं लागतंय. कारण मोदींना स्वत:च्या पक्षावर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळेच माझी सत्ता मीच मिळवणार आणि मीच भोगणार ही त्यांची वृत्ती झाली आहे. त्यांचा कुणावरच विश्वास नाहीये. भाजपावर नाही, भाजपा नेतृत्वावर नाही, संघावरही नाही. त्यामुळेच सगळीकडे ते स्वत:चाच प्रचार करत आहेत”, असं ते म्हणाले.

“…मग राज ठाकरेंचे ते व्हिडीओ लावायचे”

यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही टोला लगावला. २०१९ साली मोदी-शाहांवर जाहीर सभांमधून ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत हल्लाबोल करणारे राज ठाकरे आता फक्त मोदींना पंतप्रधान करण्यासाठी महायुतीत सहभागी झाल्याचं सांगत आहेत. त्यावरून तुषार गांधींनी खोचक टिप्पणी केली. “१७ तारखेला मोदींसह राज ठाकरेही जाहीर सभेत सहभागी होणार आहेत. त्यामुळे राज ठाकरे २०१९ मध्ये जे लाव रे तो व्हिडीओ म्हणायचे, तेच व्हिडीओ १७ तारखेला मोदी व त्यांच्या संयुक्त सभेच्या दिवशी लावायचे”, असा टोला त्यांनी लगावला.

Live Updates