पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आधी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना आणि नंतर एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये काँग्रेस आणि राहुल गांधींवर कधी परखड तर कधी खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर आता राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी सध्या उत्तराखंडमध्ये निवडणूक प्रचारासाठी दौऱ्यावर असून यादरम्यान राहुल गांधी यांनी मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेच्या दोन्ही सभागृहातील त्यांचा पूर्ण वेळ काँग्रेसबद्दल बोलण्यासाठी दिला. पण त्यांनी चीनबाबत मी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिलं नाही”, असं राहुल गांधी म्हणाले आहेत. उत्तराखंडच्या हरिद्वार जिल्ह्यातल्या मंगलौरमध्ये ते प्रचारसभेत बोलत होते.

“मोदींच्या बोलण्याचा अर्थ तुम्हाला कळला का?”

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये “जे काही ऐकतच नाहीत, त्यांच्या विधानावर मी काय स्पष्टीकरण देणार”, असं राहुल गांधींना उद्देशून म्हटलं होतं. त्यावर राहुल गांधींनी निशाणा साधला आहे. “त्यांच्या मुलाखतीमध्ये मोदी म्हणतात ‘राहुल गांधी ऐकत नाहीत’. तुम्हाला याचा अर्थ कळला का? याचा अर्थ ईडी किंवा सीबीआयचा दबाव राहुल गांधींवर काम करत नाही. (त्यांना म्हणायचंय) राहुल गांधी माझं ऐकत नाहीत. मी त्यांच्यावर कितीही दबाव टाकला, तरी ते मागे हटत नाहीत. ते ऐकत नाहीत”, असं राहुल गांधी म्हणाले आहेत.

“जे सभागृहात बसतच नाहीत, त्यांच्या…”, राहुल गांधींच्या टीकेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खोचक टोला!

“मोदींनी शेतकरी, कामगार, लघु उद्योजकांना उद्ध्वस्त केलं”

“मी मोदींचं का ऐकू? नरेंद्र मोदींनी नोटाबंदी, जीएसटीच्या माध्यमातून देशातील लघु आणि मध्यम उद्योजक, शेतकरी आणि कामगार यांचं मोठं नुकसान केलं आहे. मी त्यांना घाबरत नाही. त्यांच्या उद्धटपणामुळे मला हसू येतं”, असं राहुल गांधी यावेळी म्हणाले आहेत.

काय म्हणाले पंतप्रधान त्या मुलाखतीमध्ये?

मोदींनी राहुल गांधींचं नाव न घेता त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. “हल्ला करण्याची भाषा मला माहिती नाही किंवा माझा तो स्वभावही नाही. पण तथ्यांच्या आधारावर सभागृहात मी कोणती बाब सांगितली, तर माध्यमांमध्ये हेडलाई करण्यासाठी हल्ला या शब्दाचा वापर केला जात असेल. पण आम्ही हल्ला करत नाहीत, आम्ही संवाद करतो. वादविवाद होतो. पण मी या गोष्टींचा स्वीकार करतो. मी त्यावरून नाराज होत नाही. पण मी प्रत्येक विषयावर तथ्य मांडली आहेत”, असं मोदी म्हणाले. “काही विषयांवर आपल्या परराष्ट्र मंत्रालयाने, संरक्षण मंत्रालयाने भूमिका मांडली आहे. ज्या विषयांवर गरज पडली, तिथे मी देखील स्पष्टीकरण दिलं आहे. पण जे ऐकतच नाहीत, जे सभागृहात बसतच नाहीत, त्यांच्या वक्तव्यावर मी काय भूमिका मांडणार?” असा प्रतिप्रश्न मोदींनी यावेळी केला होता.

मराठीतील सर्व उत्तराखंड विधानसभा निवडणूक २०२२ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi slams pm narendra modi remarks on congress in interview pmw
First published on: 10-02-2022 at 19:32 IST