भाजपाने लोकसभा निवडणुकीत अनेक विद्यमान खासदारांचे तिकीट कापलेले आहे. उत्तर प्रदेशमधील कैसरगंजचे खासदार आणि भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह, मुंबई उत्तर मध्य लोकसभेच्या खासदार पूनम महाजन आणि लडाखचे खासदार जामयांग नामग्याल यांनाही भाजपाने अद्याप उमेदवारी जाहीर केलेली नाही. त्यामुळे या तिघांचेही तिकीट कापले जाणार का? असा प्रश्न पडला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने या तिघांच्या उमेदवारीबाबत भाजपामधील सूत्रांच्या हवाल्याने बातमी दिली आहे. त्यात या तिघांचे तिकीट कापले गेले तर त्यामागे काय कारणे असू शकतात? याची चर्चा करण्यात आली आहे.

भाजपामधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रिजभूषण सिंह यांच्या पत्नी केतकी देवी सिंह यांना त्यांच्याजागी उमेदवारी दिली जाऊ शकते. केतकी देवी सिंह यांनी १९९६ ते ९८ या दोन वर्षांसाठी गोंडा लोकसभेचे प्रतिनिधित्व केले होते. मात्र ब्रिजभूषण सिंह यांच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी न्यायालयाचा अंतिम निकाल अद्याप आलेला नाही, त्यामुळे उमेदवारीचा निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार ब्रिजभूषण सिंह हे पुन्हा निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक आहेत. पण न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत त्यांना वाट बघण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान केतकी देवी यांना उमेदवारी दिल्यास महिला नेतृत्वाची पोकळीही भरून काढता येईल, असा पक्षातील नेत्यांचा अंदाज आहे.

दिल्ली न्यायालयाने मागच्या आठवड्यात ब्रिजभूषण सिंह यांच्यावर आरोप निश्चिती करण्यासाठी स्थगिती दिली होती. सहा महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात केलेल्या लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते.

दुसरीकडे पूनम महाजन आणि नामग्यल यांनाही उमेदवारी मिळणे कठीण असल्याचे पक्षातील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. मतदारसंघातून आलेला नकारात्मक अहवाल आणि खासदार म्हणून जबाबदारी पार पाडण्यास असमर्थ ठरले असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आल्याचे भाजपामधील सूत्रांनी सांगितल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे. या तीनही खासदारांच्या मतदारसंघातील मतदान २० मे रोजी होणार आहे. तर ३ मे ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पूनम महाजन यांच्याजागी कोण निवडणूक लढविणार याबाबतची स्पष्टता अद्याप दिलेली नाही. माध्यमातील चर्चांनुसार ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांना मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य लोकसभेत एकेकाळी काँग्रेसचा दबदबा होता. त्यानंतर भाजपा आणि शिवसेना युतीने १९८९ साली विद्याधर गोखले, १९९६ साली नारायण आठवले, १९९९ साली मनोहर जोशी यांनी याठिकाणाहून विजय प्राप्त केला होता. २०१४ साली मोदी लाटेमुळे पूनम महाजन यांना याठिकाणी विजय मिळवणे सोपे गेले. २०१९ साली त्यांनी दुसऱ्यांदा याठिकाणाहून विजय मिळविला होता.