– शैलजा तिवले

करोनाचा संसर्ग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे होतो. करोना साथीच्या प्रसाराचे चार टप्पे आहेत. पहिला टप्पा म्हणजे बाधित देशातून आलेल्या प्रवाशांना करोनाचा संसर्ग झालेला असणे. या प्रवाशांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनाही करोनाची लागण होते. हा दुसरा टप्पा असून स्थानिक प्रसार (लोकल ट्रान्समिशन)असे म्हणतात.

तिसरा टप्पा म्हणचे समूह प्रसार

या टप्प्यात प्रवास न केलेल्या किंवा प्रवाशांच्या संपर्कात न आलेल्या व्यक्तींना संसर्गाची लागण होण्याचे प्रमाण मोठ्या संख्येने दिसायला लागते. अशा परिस्थितीमध्ये संसर्ग स्थानिक भागातून समाजामध्ये पसरत चालला असल्याचे स्पष्ट होते. या टप्प्यात समाजामध्ये संसर्गाचा प्रसार कसा, कुठे आणि कशाप्रकारे होत आहे, याचा माग लावणे कठीण होते. यात एका विशिष्ट भौगोलिक भागामध्ये उदारहणार्थ, विभाग, शहर, जिल्हा यात मोठ्या प्रमाणात असे रुग्ण आढळून येतात. तेव्हा समूह प्रसार झाल्याचे नोंदले जाते.

कसो होतो समूह प्रसार

करोनाबाधित व्यक्ती घरातील किंवा बाहेरील चार जणांच्या संपर्कात येते. ते चार जण आठ जणांच्या, आठ जण १६ लोकांच्या आणि त्यांच्याकडून २५६ जणांकडे असा करोनाच्या संसर्गाचा प्रसार पसरतच जातो. करोनाबाधित एका व्यक्तींकडून सुरू झालेली ही प्रसाराची मालिका समाजापर्यत पोहचते तेव्हा समूह प्रसार सुरू झाला, असे म्हटले जाते.

रुग्णसंख्येत अनेक पटीने वाढ

स्थानिक प्रसाराच्या टप्प्यापर्यत रुग्णांची संख्या प्रवासी आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती इथपर्यत मर्यादित असते. परंतु संसर्गाचा समूह प्रसार सुरू झाल्यानंतर रुग्णांच्या संख्येचा आलेख अनेक पटीने वाढायला लागतो. याचे मुख्य कारण म्हणजे करोनाची लागण झालेल्यांपैकी बहुतांश रुग्णांना लक्षणे दिसून येत नाही. त्यामुळे लागण झालेली व्यक्ती ज्या ज्या लोकांच्या संपर्कात येते, त्यांच्यामध्ये नकळतपणे संसर्गाचा प्रसार करते. त्या व्यक्तींनाही लागण झाल्याचे लवकर लक्षात न आल्याने तेही मग अनेक लोकांपर्यत हा संसर्ग पसरवितात. अशारितीने समूह प्रसार सुरू होणे ही धोक्याची घंटा असून त्याला रोखणे अवघड आहे.

टाळेबंदी, सामाजिक अंतर हाच योग्य पर्याय

अनेक व्यक्तींनी एकत्र येऊन गर्दी करू नये, सामाजिक अंतर पाळणे हे समूह प्रसार रोखण्यावरील योग्य पर्याय आहे. एक व्यक्ती चार ऐवजी दोन जणांच्या संपर्कात आली तर त्याच्यामार्फत पसरविण्यात येणाऱ्या संसर्गाचे प्रमाणही तितक्या पटीने कमी होते. म्हणून टाळेबंदी मार्ग अवलंबिला जातो. चीनमधील वुहान शहरात समूह प्रसार सुरू झाला आणि रुग्णांची संख्या अनेक पटीने वाढल्यावर त्यांनी टाळेबंदीचा मार्ग अवलंबिला. त्याच धर्तीवर आता रुग्णांची संख्या झपाट्याने वाढणाऱ्या भारतासह जगभरातील अनेक देशांनी टाळेबंदी लागू केली आहे.

भारतामध्ये अजूनही समूह प्रसार सुरू झालेला नाही असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. परंतु राज्यात आढळलेल्या जवळपास १० टक्के रुग्णांना लागण झालेल्या स्त्रोत अद्याप सापडलेला नाही. त्यामुळे समूह प्रसाराची सुरूवात होत आहे का, यावर अनेक वादविवाद सध्या सुरू आहेत.