निसर्ग या चक्रीवादळाने महाराष्ट्राच्या जमिनीला स्पर्श केला आहे. हे चक्रीवादळ येणार याचा अंदाज हवामान खात्याने आधीच वर्तवला होता. या वादळामुळे कमी नुकसान व्हावं यासाठीची तयारी करण्यात आली आहे. पण मुळात चक्रीवादळ म्हटलं की धोकादायक, विध्वंस हेच समोर येतं. चक्रीवादळाची निर्मिती कशी होते? हे आपण जाणून घेणार आहे.

चक्रीवादळाची निर्मिती कशी होते?

समुद्रात एका कमी दाबाच्या प्रदेशाभोवती चारही बाजूंनी येणाऱ्या वाऱ्यांमुळे वादळ तयार होतं. वातावरणातील उष्ण व आर्द्र हवेचा सततचा पुरवठा हे चक्रीवादळाच्या निर्मितीचे मुख्य कारण आहे. समुद्राचे तापमान हा चक्रीवादळाच्या निर्मितीचा मोठा घटक ठरतो. समुद्रात २६ अंश डिग्री सेल्सिअस तापमान आणि ६० मीटर खोलीपर्यंत असणे हे चक्रीवादळासाठी पोषक ठरतं. यामध्ये वादळाच्या केंद्रातून दाब वाढत जातो. दबावाचे प्रमाण त्याच्या केंद्रात कमी होते तशी बाहेरील वादळाची तीव्रता व हवेचा वेग अधिक वाढतो. याचा वेग व शक्ती इतकी असते की घराच्या भिंतीही ढासळून जातात.

वादळांना नावं का दिली जातात?
वादळांना नावं देण्याची प्रथा शेकडो वर्षांपासून चालत आली आहे. सध्याच्या घडीला चक्रीवादळांना महिलांची किंवा त्यांच्या नावाशी साधर्म्य असणारी नावं दिली जात आहेत. चक्रीवादळांचा अक्षांश व ते ज्या भागात आले होते तो भाग लक्षात ठेवण्यासाठी ही नावं दिली जातात. हिंदी महासागरता तयार होणाऱ्या चक्रीवादळांना इंग्रजीत सायक्लोन, वेस्ट इंडिज बेटं आणि अटलांटिक महासागरात तयार होणाऱ्या चक्रीवादळांना हरिकेन, तर चीनचा समुद्र आणि पॅसिफिक महासागरात तयार होणाऱ्या चक्रीवादाळला टायफून म्हटलं जातं. ऑस्ट्रेलियात चक्रीवादळांना विलीविलीस असे म्हटले जाते. जेव्हा वादळ जमिनीवर तयार होते तेव्हा त्याला टोरनॅडो असे संबोधले जातं.

बंगालच्या उपसागरात सर्वाधिक वादळे का?
भारताच्या दोन्ही बाजूंनी समुद्र असूनही सर्वाधिक वादळे बंगालच्या उपसागरातून जन्माला येतात. याचे कारण लपलं आहे समुद्राच्या तापमानात. बंगालच्या उपसागराचे तापमान मान्सूनआधी आणि मान्सूननंतर अरबी समुद्राच्या तुलनेत उबदार असते. त्यामुळे पावसाआधी किंवा नंतर म्हणजे खासकरुन ऑक्टोबर महिन्यात बंगालच्या उपसागरात चक्रीवादळे तयार होण्यासाठी पोषक वातावरण तयार होतं.