Gautam Buddha’s Piprahwa Relics Return to India After 127 Years: गौतम बुद्धांचे पिप्राहवा येथील बौद्धधातू तब्बल १२७ वर्षांनंतर भारतात परत आले आहेत. हे बौद्धधातू १८९८ साली उत्तर प्रदेशातील पिप्राहवा येथे सापडले होते, त्यानंतर ते भारताबाहेर नेण्यात आले. बौद्धधातू म्हणजे गौतम बुद्धांचे अस्थिअवशेष. या अवशेषांचा उल्लेख आदरपूर्वक बौद्धधातू असा करण्यात येतो. भारतीय इतिहासात या बुद्धधातूंना अनन्यसाधारण महत्त्व आहे. याविषयीची माहिती खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या एक्सवरील पोस्टमधून दिली आहे. पंतप्रधानांनी या बुद्धधातूंचे सांस्कृतिक आणि भावनिक महत्त्व अधोरेखित केलं आहे.
पिप्राहवाचे बौद्धधातू का चर्चेत आले?
२०२५ च्या सुरूवातीला पिप्राहवाचे बौद्धधातू चर्चेत आले होते. या बुद्धधातूंचा लिलाव सदबीज लिलावगृहाकडून होणार होता. परंतु, भारताकडून झालेल्या तत्काळ कारवाईमुळे हा लिलाव रोखण्यास मदत झाली आहे. या अवशेषांचे आध्यात्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व ओळखून भारत सरकारने हे अवशेष परत आणण्यासाठी प्रयत्न केले. १२७ वर्षांनी बुद्ध धातू परत येणं, हा भारताच्या सांस्कृतिक वारशासाठी आनंदाचा दिवस आहे, असे पंतप्रधान नरेंद्र नोदी यांनी गौरवोद्गार काढले. त्याच पार्श्वभूमीवर पिप्राहवा या स्थळाचे पुरातत्त्वीय, सांस्कृतिक महत्त्व समजून घेणे महत्त्वाचे ठरणारे आहे.
पिप्राहवा का महत्त्वाचे?
पिप्राहवा हे गाव भारत- नेपाळच्या सीमेवर लुंबिंनी या गौतम बुद्धांच्या जन्मस्थळापासून जवळच आहे. भारतीय बौद्ध धर्माच्या इतिहासात पिप्राहवा या गावाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ब्रिटिश सिव्हिल इंजिनिअर विल्यम क्लॅक्सटन पेप्पे यांनी पिप्राहवा येथे बौद्ध स्तूपाचे अवशेष शोधले होते. बुद्धधातूतील जो भाग शाक्य वंशाला देण्यात आला होता, त्या भागावर उभारण्यात आलेला स्तूप पिप्राहवा या गावात होता. म्हणजेच प्रत्यक्ष गौतम बुद्धांचेच अस्थिअवशेष या स्तूपात होते.
बुद्धधातू पिप्राहवा या गावात कसे पोहोचले?
महापरिनिर्वाण सुत्तानुसार गौतम बुद्धांचे महानिर्वाण इ.स.पू. ४८० च्या सुमारास झाले. त्यानंतर बुद्धांचे अवशेष कोणाला मिळणार यावरून वाद उद्भवला होता. बुद्धांचे कुशीनगर येथे निर्वाण झाल्यावर शाक्य वंशातील लोकांनी कुशीनगरच्या मल्लांना संदेश पाठवला. त्यांनी संदेशात म्हटले, भगवंत आमच्या कुळाचे असल्याने आम्ही त्यांच्या अवशेषातील वाटा घेण्यास पात्र आहोत आणि त्यांच्यासाठी मोठा स्तूपही बांधणार आहोत. परंतु, मल्लांनी कोणालाही अवशेषांचा भाग देण्यास मनाई केली. शेवटी वाढता वाद पाहून दोण नावच्या ब्राह्मणाने हस्तक्षेप केला. त्याने गौतम बुद्धांच्या उपदेशाची आठवण करून देत कलह, युद्ध आणि रक्तपात टाळण्याचा सल्ला दिला. शिवाय बुद्धधातूंची मागणी करणार्या आठ राज्यांमध्ये या अवशेषांची विभागणी करावी, जेणेकरून दूरवरच्या प्रदेशात स्तूप उभारले जातील, असाही सल्ला दिला. त्यानुसार बुद्धधातूंची विभागणी करण्यात आली आणि बुद्धधातू शाक्यवंशाला मिळाले.
पिप्राहवातील स्तूप २,००० वर्षे तसाच अबाधित राहिला
नंतरच्या कालखंडात मूळ जन्मभूमीतून बौद्ध धर्माचा ऱ्हास झाला, तरी शाक्यांनी बांधलेला पिप्राहवातील स्तूप २,००० वर्षे तसाच अबाधित राहिला. भारत आणि नेपाळच्या सीमेवर असणार्या पिप्राहवा गावाबाहेर झाडाझुडुपात हा स्तूप झाकोळून गेला होता. १८९७ साली या झाकोळलेल्या टेकाडाने विल्यम क्लॅक्सटन पेप्पे यांचे लक्ष वेधून घेतले. पेप्पे हे एक ब्रिटिश वसाहतकालीन अभियंता आणि जमीनदार होते.
स्तूपाचे उत्खनन
पेप्पे यांनी इंडॉलॉजिस्ट व्हिन्सेंट स्मिथ यांच्या सल्ल्यानुसार त्या टेकडीवर उत्खनन सुरू केले. स्मिथ यांनी त्यांना सांगितले होते की, हा एक अत्यंत प्राचीन बौद्ध स्तूप आहे. त्यामुळे झुडपे आणि जंगल हटवून त्यांनी टेकडीवर एक खोल खंदक तयार करण्याचे काम सुरू केले. सुमारे १८ फूट जाड विटांच्या बांधकामातून खोदत गेल्यानंतर त्यांना एक मोठे दगडी पात्र सापडले. त्यात पाच लहान मातीची मडकी होती. या मडक्यांमध्ये हाडांचे तुकडे, सोन्याचे अलंकार आणि दागिने होते. या अवशेषपात्रांमध्ये मौल्यवान वस्तूंचा साठा होता. यात सुमारे १,८०० रत्न आणि अर्ध-मौल्यवान दगड, स्फटिक, मोती, शंख, प्रवाळ, सोन्याचे आणि चांदीचे पत्रे, सूक्ष्म सोन्याचे कण, तसेच हाडे आणि राख यांचा समावेश होता.
ब्राह्मी लिपीतील लेख काय सांगतो?
पाच मडक्यांपैकी एका मडक्यावर ब्राह्मी लिपीतील लेख होता. या लेखाचे वाचन प्रसिद्ध युरोपीय पुराभिलेख तज्ज्ञ जॉर्ज ब्यूहलर यांनी केले. या लेखात बुद्धधातूंची स्थापना शाक्य कुळातील सुकृति बंधू आणि त्यांच्या भगिनी, पुत्र व पत्नी यांच्याकडून करण्यात आली, असा उल्लेख आहे. याच लेखामुळे या स्तूपातील अस्थिधातू गौतम बुद्धांचे आहेत हे समजण्यास मदत झाली. विन्सेंट स्मिथ, विल्यम होए, थॉमस राइस डेविड्स आणि एमिल सेनार्ट या इतर अभ्यासकांनी पुराभिलेखाचे भाषांतर करून हे अवशेष बुद्धांचेच असल्याचे सांगितले.
१९०५ साली जॉन फ्लीट यांनी या पुराभिलेखाचे वेगळे भाषांतर केले. या भाषांतरानुसार हे अस्थिधातू सुकृति बंधूं आणि भगिनी, मुले आणि पत्नी यांचे होते. परंतु, तत्कालीन विद्वानांनी हा अर्थ नाकारला. शंभराहून अधिक वर्षांनंतर, २०१३ साली Bones of the Buddha या माहितीपटात बर्लिन येथील फ्री युनिव्हर्सिटीचे पुराभिलेख तज्ज्ञ हॅरी फाल्क यांनीही कोलकात्यातील भारतीय संग्रहालयातील अवशेषपात्राचा अभ्यास करून भाषांतर केले. हा बुद्धांचा (शारीरिक अवशेषांचा) स्तूप आहे, जो शाक्य बंधूंनी, त्यांच्या भगिनी, पुत्र आणि पत्नींसह उभारलेला आहे, असे भाषांतर केले.
अवशेषपात्र आणि स्तूपाची कालनिश्चिती
१९९७ साली पुराभिलेख अभ्यासक आणि पुरातत्त्वज्ञ अहमद हसन दानी यांनी निष्कर्ष काढला की, “हा शिलालेख इ.स.पूर्व दुसऱ्या शतकाच्या पूर्वाधातील आहे.” दानी यांच्या मते हा पुराभिलेख बुद्धांच्या इ.स.पूर्व ४८० मध्ये झालेल्या परिनिर्वाणानंतर सुमारे २५० वर्षांनी कोरला गेला असावा. यावरून हा स्तूप बुद्धांच्या मृत्यूनंतर बांधला गेला असावा. या लेखातील लिपी ही अशोककालीन असल्यामुळे हा स्तूप अशोकाच्या कालखंडात बांधला गेला असावा असे मानले जाते.
बुद्धांच्या महापरिनिर्वाणाशी जुळणाऱ्या तारखा
७० च्या दशकात के. एम. श्रीवास्तव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याने केलेल्या उत्खननापेक्षा अधिक खोलवर उत्खनन केले. या उत्खननात दोन पेट्या सापडल्या, त्यात हाडांचे तुकडे होते. या पेट्या भाजलेल्या विटांच्या दोन कक्षांमध्ये ठेवलेल्या होत्या. या पेट्यांवर ठेवलेली काही तुटलेली मातीची भांडी ब्लॅक पॉलिश्ड वेअर होती. हे सापडलेले अवशेष इ.स.पूर्व ४००-५०० च्या कालखंडातील आहेत. म्हणजेच बुद्धांच्या महापरिनिर्वाणाच्या (इ.स.पूर्व ४८०) तारखेशी समकालीन आहेत.
श्रीवास्तव यांच्या निष्कर्षानुसार स्तूप तीन टप्प्यात बांधला गेला
- पहिला टप्पा: बुद्धांच्या महापरिनिर्वणानंतर लवकरच शाक्यांनी बांधला. या स्तूपाचे बांधकाम गौतम बुद्धांनी दिलेल्या सुचनांनुसार करण्यात आले होते.
- दुसरा टप्पा: पेप्पे यांनी उघडलेला स्तूप हा अशोककालीन होता.
- तिसरा टप्पा: या टप्प्यावर स्तूपाची उंची वाढवून पाया चौकोनी करण्यात आला. स्तूपाभोवती विहारसदृश इमारती बांधण्यात आल्या, त्याचे बांधकाम कुषाण काळात झाले असावे.
पिप्राहवा बुद्धधातू भारताबाहेर
या बुद्धधातूंचा एक भाग सियामच्या राजाला देण्यात आला होता. १८९९ साली एका समारंभात बुद्धांच्या अस्थी राजा राम पाचव्यांच्या प्रतिनिधीकडे सुपूर्द केल्या गेल्या आणि त्या बँकॉकला नेण्यात आल्या. या अस्थी लगेचच विविध ठिकाणी वितरित केल्या गेल्या.
- गोल्डन माउंट मंदिर, बँकॉक, थायलंड
- श्वेडागोन पॅगोडा, रंगून (म्यानमार)
- अराकान पॅगोडा, मंडाले (म्यानमार)
- दीपदुत्तमारामा मंदिर, कोलंबो (श्रीलंका)
- वास्कादुवे विहार, कलुतारा (श्रीलंका)
- मारीचिवट्ट स्तूप, अनुराधापुरा (श्रीलंका)
सोन्या-नाण्यांचा आणि मौल्यवान अलंकारांचा बहुतेक अवशेषांचा साठा भारतीय सरकारने कोलकात्याच्या भारतीय संग्रहालयात ठेवला. आज तेथे फक्त मूळ पात्राची प्रतिकृती प्रदर्शित करण्यात आली आहे. अवशेषांची छायाचित्रे पिप्राहवा येथील कपिलवस्तू संग्रहालयात पाहायला मिळतात. डब्ल्यू. सी. पेप्पे यांना काही वस्तू ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती. १६ डिसेंबर २०११ रोजी या कपिलवस्तू बुद्धअवशेषांपैकी काही भाग थायलंडमधील रतनावन मठातील संघाला अर्पण करण्यात आला. २०१२ मध्ये जानेवारी महिन्यात हे धातू अवशेष रतनावन मठातील बुद्ध होमेज रीलिक्वरी हॉलमध्ये प्रदर्शित करण्यात आले होते. या पवित्र समारंभात अजाह्न सुमेधो आणि अजाह्न विरधम्मो यांसह अनेक वरिष्ठ भिक्षू सहभागी झाले होते.
अखेर घरवापसी
२०२५ मध्ये लंडनमधील सदबीज लिलावगृहाने पेप्पे कुटुंबाकडे राहिलेल्या रत्नांच्या अवशेषांचा लिलाव करण्याची योजना जाहीर केली होती. मे महिन्यात भारताने त्यांचा लिलाव थांबवण्यासाठी कायदेशीर पावले उचलली आणि लिलाव स्थगित करण्यात आला. जुलैमध्ये भारताच्या सांस्कृतिक मंत्रालयाने जाहीर केले की, त्यांनी हे अवशेष परत मिळवले आहेत आणि ते सार्वजनिक प्रदर्शनात ठेवले जातील.