NCERT Textbook Highlights Akbar’s Brutality: एनसीईआरटीच्या इयत्ता ८ वीच्या नव्या पाठ्यपुस्तकात १५६७-६८ साली झालेल्या चित्तोडगडच्या वेढ्याचा इतिहास देण्यात आला आहे. पुस्तकातील या प्रकरणात अकबराच्या कारकिर्दीला क्रूर आणि निर्दयी म्हणून दर्शवण्यात आलं आहे. सिसोदिया राजपुतांचा बालेकिल्ला असलेल्या चित्तोडगडच्या वेढ्यात नेमकं काय घडलं होतं?

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (NCERT) इयत्ता ८ वी साठी समाजशास्त्राचे नवीन पुस्तक प्रकाशित केले आहे. या पुस्तकात इसवी सन १३ व्या शतकापासून ते १७ व्या शतकादरम्यानच्या इतिहासाचा आढावा घेण्यात आला आहे. Exploring Society: India and Beyond या मालिकेचा भाग असलेल्या या पुस्तकात अकबराच्या कारकिर्दीला क्रूरता आणि सहिष्णुतेचं मिश्रण म्हटलं आहे. तसेच चित्तोडगड येथे त्याने केलेल्या ३०हजार लोकांच्या कत्तलीचा संदर्भ देण्यात आला आहे.

चित्तोडगडचा वेढा हा भारतीय इतिहासातील एक निर्णायक टप्पा होता. हा वेढा अकबराने मेवाडच्या राणाला अधीन करण्यासाठी सुरू केलेल्या मोहिमेचा प्रारंभ मानला जातो. खाली दिलेला तपशील हा मुख्यतः अबुल फजल यांनी लिहिलेल्या अकबरनामा या ऐतिहासिक ग्रंथावर आधारित आहे. यात या वेढ्याची कारणे, घडलेली घटना आणि त्यानंतरच्या परिणामांचा आढावा घेण्यात आला आहे.

सिसोदिया राजपूत

राजपूत ही उत्तर भारतातील एक योद्धा जात आहे. हे अनेक वंशांमध्ये विभागलेले आहेत. ते प्राचीन क्षत्रिय परंपरेतून आपली उत्पत्ती मानतात. ही जात प्रामुख्याने सूर्यवंशी, चंद्रवंशी किंवा अग्निवंशी अशा वंशांशी जोडलेले असल्याचे सांगितले जाते.

सिसोदिया हे सूर्यवंशी राजपूत वंश होते. त्यांनी मेवाडवर चित्तोडगड आणि नंतर उदयपूर येथून राज्य केले. त्यांनी मुघलांच्या अधिपत्याला सर्वाधिक काळ झुंज देणाऱ्यांपैकी एक म्हणून इतिहासात आपले स्थान निर्माण केले आहे. विशेषतः राणा उदय सिंह दुसरा आणि त्यांचा पुत्र राणा प्रताप सिंह यांच्या काळात हा संघर्ष अधिक तीव्र स्वरूपाचा होता.

चित्तोडगड, हे सध्याच्या राजस्थानमध्ये आहे. हा एक भक्कम डोंगरी किल्ला होता आणि मेवाडचे मुख्य ठिकाण मानले जात असे. १८० मीटर उंच टेकडीवर पसरलेला हा किल्ला सुमारे ७०० एकर क्षेत्रफळावर वसलेला आहे. या किल्ल्याचा इतिहास संघर्षमय आहे. १३०३ साली अलाउद्दीन खिलजी आणि १५३५ साली गुजरातचा बहादूर शाह यांनी या किल्ल्याला वेढा घातला होता.

चित्तोडगडचा वेढा

१५६७ पर्यंत अकबराने उत्तर भारतातील बहुतेक भागावर, त्यात मालवा आणि राजपुतानाच्या काही भागांचा समावेश होता, त्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. अंबर आणि बिकानेरच्या राजपूत राजांप्रमाणे इतरांनी अकबराशी राजनैतिक आणि विवाहसंबंधांतून युती केली होती. मात्र राणा उदय सिंह दुसऱ्याने मुघल वर्चस्व मान्य करण्यास नकार दिला. त्याने माळव्याच्या बाज बहादूरसारख्या बंडखोर मुघल सरदारांना पाठींबा दिला, त्यामुळे अकबर अधिकच चिडला.

१५६७ साली अकबराने आग्र्याहून ४०हजार सैनिक घेऊन मेवाडच्या राणाला शरण आणण्याच्या उद्देशाने मोर्चा वळवला. त्याच्या सैन्याजवळ तोफा, बंदुका आणि वेढ्यासाठी लागणारी यंत्रसामग्री होती. त्यांनी चित्तोडगडच्या टेकडीच्या पायथ्याशी तळ ठोकला आणि किल्ल्याचा पुरवठा बंद केला.

चित्तोडगड किल्ला हा राजपूत अभिमानाचा प्रतीक मानला जात असे. या किल्ल्याच्या आत जैमल राठोड यांच्या नेतृत्वाखाली ८,००० राजपूत योद्धे शेवटच्या श्वासापर्यंत लढण्यासाठी सज्ज झाले होते. मेवाडचे राजा राणा उदय सिंह दुसरे यांनी अरावलीच्या डोंगरात सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला होता आणि सिसोदिया घराण्याच्या राजधानीचे रक्षण करण्याची जबाबदारी त्यांनी आपल्या विश्वासू सेनापतीवर सोपवली होती.

थोड्याच वेळात तोफांचा आवाज घुमू लागला आणि किल्ल्याच्या ३० फूट जाड भिंतींवर लोखंडी गोळे आदळू लागले. पण, किल्ल्याची उंची आणि मजबूत संरक्षणामुळे मुघल सैन्याचे प्रयत्न निष्फळ ठरत होते. जैमलच्या सैनिकांनी किल्ल्याच्या बुरुजांवरून बाण, बंदुकीचे गोळे आणि गोफणीतून दगड फेकून मुघलांवर प्रतिहल्ला केला. रात्रीच्या वेळी राजपूत सैनिकांनी मुघलांच्या कनातींवर अचानक हल्ले करत त्यांना त्रास दिला.

सैन्याच्या अपयशाने आणि राजपूतांच्या प्रखर प्रतिकाराने अस्वस्थ झालेल्या अकबराने आपल्या सैनिकांना झाकलेले खंदक (सबात) खोदून किल्ल्याच्या जवळ जाण्याचा आदेश दिला. मुघलांनी किल्ल्याखाली सुरुंग खोदून त्यात दारुगोळा भरला, जेणेकरून किल्ल्याचा पाया उद्ध्वस्त करता येईल. पण राजपूत जागृत होते. त्यांनी प्रतिसुरुंग खोदले आणि जमिनीवरच युद्ध केले.

चित्तोडगडचं पतन

आठवडे, महिने झाले, पण संरक्षण करणारे राजपूत खंबीरपणे उभे होते. अकबरालाही झोप नव्ह्ती. त्याचे सैन्य हताश होत होते. पण फेब्रुवारी १५६८ साली जैमल राठोड मारले गेले. त्यांचा मृत्यू हा निर्णायक क्षण ठरला, कारण त्यामुळे किल्ल्याचे रक्षण करणाऱ्यांचा आत्मविश्वास ढासळला आणि किल्ला पतनाच्या उंबरठ्यावर आला.

शरणागती टाळण्यासाठी किल्ल्यातील राजपूत स्त्रियांनी २३ फेब्रुवारी १५६८ च्या सुमारास जोहर केला. पुरुषांनी केशरी वस्त्र परिधान करून अंतिम युद्ध लढलं.

२३-२४ फेब्रुवारी १५६८ रोजी, सुमारे चार महिन्यांच्या वेढ्यानंतर मुघलांनी किल्ल्याच्या एका भिंतीचा भाग फोडून प्रवेश केला. मुघल दस्तऐवजांमध्ये म्हटले आहे की, बहुतेक सर्व रक्षण करणारे मारले गेले, अंदाजे ८,००० ते १०,००० राजपूत योद्धे धारातीर्थी पडले. दीर्घकाळ चाललेल्या प्रतिकारामुळे संतप्त झालेल्या अकबराने किल्ल्यातील सामान्य लोकांची कत्तल करण्याचे आदेश दिले. या नरसंहारात २०,००० ते ३०,००० निरपराध नागरिक ठार झाल्याचा अंदाज आहे. शेवटी, जळलेला आणि शांत झालेला किल्ला एक पोकळ विजय म्हणून उभा राहिला.

परिणाम

चित्तोडगडचं पतन हा अकबरासाठी एक मोठा विजय ठरला. मुघलांनी काही काळासाठी किल्ल्याचा ताबा घेतला, पण तो कायमस्वरूपी ताब्यात ठेवला नाही, कारण किल्ल्याचे ठिकाण दुर्गम होते आणि देखभालीचा खर्च फार मोठा होता. अकबराने या भागावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक गव्हर्नर नेमला, पण मेवाडचा प्रतिकार राणा उदय सिंह यांचा पुत्र प्रताप सिंह यांच्या नेतृत्वाखाली सुरूच राहिला. त्यांनी नंतर मुघलांविरुद्ध छापामारी युद्ध (गनिमी कावा) सुरू केले.

राजपूतांसाठी हा वेढा बलिदान आणि स्वाभिमानाचे प्रतीक ठरला. चित्तोडगडचा जोहार आणि राजपूतांची शौर्यगाथा राजपूतांच्या लोककथा आणि इतिहासात अजरामर झाली. जैमल, पट्टा सिसोदिया (दुसरे सेनापती) आणि जोहार करणाऱ्या स्त्रियांचे पराक्रम आजही गौरवाने गायले जातात. राणा प्रताप यांनी अकबरासमोर शरण न जाता मुघलांचा केलेला प्रतिकार हा मेवाडच्या स्वाभिमानी इतिहासाला अधिक बळकट करणारा ठरला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आजही चित्तोडगड किल्ला अस्तित्वात आहे आणि त्याचे दरवाजे, मनोरे आणि प्रमुख राजवाडे हे १५६८ पूर्वीच्या वास्तूशैलीचे अवशेष म्हणून उभे आहेत. हे स्मारक पाहणाऱ्यांना त्या काळातील वेढा, नरसंहार आणि मेवाडच्या राणांचा स्वाभिमानी संघर्ष याची आठवण करून देतात.