66-year-old German woman gave birth to her 10th child: जर्मनीतील ६६ वर्षीय अलेक्झांड्रा हिल्डब्रँट यांनी यावर्षी अलीकडेच त्यांच्या दहाव्या बाळाला जन्म दिला. त्यासंदर्भात त्या सांगतात, या वयात अपत्यप्राप्ती झाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचवलेल्या असल्या, तरी व्यक्तिगत स्तरावर त्यांना काहीही फरत पडलेला नाही.
त्यांचा धाकटा मुलगा फिलिप याचा जन्म १९ मार्च रोजी बर्लिनमधील शारिएट हॉस्पिटलमध्ये सिझेरियन शस्त्रक्रियेद्वारे झाला. जन्माच्या वेळी त्याचं वजन सात पाउंड १३ औंस इतकं होतं. जन्मानंतर त्याला श्वसनासाठी ऑक्सिजन थेरपीवर ठेवण्यात आलं होतं, मात्र अलेक्झांड्रांनी स्पष्ट केलं की, “फिलिपच्या वेळी गर्भधारणा पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने आणि कोणत्याही अडचणीशिवाय झाली होती.”
पहिली मुलगी ४६ वर्षांची
अलेक्झांड्रा यांनी TODAY.com ला ईमेलद्वारे दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, त्यांची पहिली दोन अपत्य वगळता इतर सर्व बाळांना त्यांनी वयाच्या ५३ वर्षांनंतर जन्म दिला होता. त्या सांगतात, मोठं कुटुंबं असणं ही सुंदर गोष्ट आहे, पण त्याचबरोबर मुलांच्या संगोपणाची मोठी जबाबदारीही येते.
त्यांचं पहिलं आणि सगळ्यात मोठ अपत्य स्वेतलाना हे फिलिपपेक्षा तब्बल ४६ वर्षांनी मोठं आहे.
एक तास पोहणं आणि दोन तास चालणं
अलेक्झांड्रा या पेशाने मानवाधिकार कार्यकर्त्या आहेत. त्यांनी शिस्तबद्ध जीवनशैलीचा अंगीकार केला आहे. मी आरोग्याला पूरक आहार घेते. दररोज एक तास पोहते आणि दोन तास चालते, असं अलेक्झांड्रा यांनी जर्मन वृत्तपत्र बिल्डला सांगितलं. त्या पुढे म्हणाल्या की, “मी कधीही गर्भनिरोधक वापरले नाहीत आणि ना धूम्रपान किंवा मद्यपान केले.”
गुंतागुंतीशिवाय प्रसुती
हिल्डब्रँट यांच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. वुल्फगँग हेन्रिच यांच्याशीही बिल्ड या वृत्तपत्राने संवाद साधला. त्यांनी सांगितलं की, अलेक्झांड्रा यांची प्रसूती कोणत्याही गुंतागुंतीशिवाय झाली. जर्मनीच्या DPA इंटरनॅशनलने दिलेल्या वृत्तानुसार, त्यांच्या दहा मुलांपैकी एलिसाबेथ आणि मॅक्सिमिलियन ही १२ वर्षांची जुळी मुलं आहेत.
६० वर्षांपुढील महिलांसाठी नैसर्गिक गर्भधारणा आणि प्रसूतीतील धोके कोणते?
इंडियन एक्स्प्रेसला या प्रश्नाचं उत्तर देताना डॉ. गाना श्रीनिवास (बोन अँड बर्थ क्लिनिक आणि रेनबो हॉस्पिटल, बॅनेरघट्टा रोड येथील प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ) म्हणाल्या, “सक्षम शरीर आणि आरोग्यदायी जीवनशैली नक्कीच उत्तम आरोग्यास मदत करते, परंतु वय हे गर्भधारणेतील जोखमीचं स्वतंत्र आणि महत्त्वाचं कारण ठरतं. साठीनंतर नैसर्गिक गर्भधारणा होणं, अत्यंत दुर्मीळ असतं. अशी गर्भधारणा झालीच किंवा सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान (ART) वापरलं गेलं, तरी ती अतिशय जोखमीची गर्भावस्था (high-risk pregnancy) मानली जाते.”

धोके कोणते?
गर्भावस्थेदरम्यान मधुमेह (गर्भावस्थेतील डायबिटीस), उच्च रक्तदाब, प्री-एक्लॅम्प्सिया (गर्भावस्थेतील आकडीचा त्रास), अपरा (placenta) संबंधित गुंतागुंत आणि अकाली प्रसूती (preterm labor) यांचा धोका हा मुख्य चिंतेचा विषय आहे. याशिवाय, सिझेरियन प्रसूती आणि प्रसूतीनंतरच्या गुंतागुंतींची शक्यता देखील जास्त असते.
हृदयावरील ताण वयानुसार अधिक
डॉ. श्रीनिवास स्पष्ट करतात की, “गर्भावस्थेदरम्यान हृदयावरील ताण हा वयस्क महिलांमध्ये अधिक जाणवतो, अगदी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असलेल्या महिलांमध्येही हा धोका असतो. कारण शरीराची नैसर्गिक कार्यक्षमता आणि अवयवांची क्षमता वयानुसार कमी होत जाते. तसेच, वयाच्या ४० वर्षांनंतर प्रजननक्षमतेत झपाट्याने घट होते, त्यामुळे ६० वर्षांनंतर नैसर्गिक गर्भधारणा वैद्यकीय मदतीशिवाय अत्यंत दुर्मिळ मानली जाते.”
उतरत्या वयात झालेल्या गर्भधारणेत जीवनशैलीचे घटक कितपत महत्त्वाचे ठरतात?
डॉ. श्रीनिवास यांच्या मते, आरोग्यदायी सवयी कोणत्याही गर्भावस्थेसाठी फायदेशीरच
ठरतात. आणि जोखीम कमी करण्यात मदत करतात. नियमित व्यायाम, पोषणयुक्त आहार, तसेच धूम्रपान आणि मद्यपान टाळणं या सवयींमुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते, रक्तातील साखरेचं प्रमाण संतुलित राहते आणि शरीराची एकूण सहनशक्ती वाढते. हे सर्व गर्भावस्थेदरम्यान अत्यावश्यक असतं.
सततची वैद्यकीय देखरेख आवश्यक
त्या पुढे स्पष्ट करतात, “तरीही, या सवयी केवळ संरक्षणात्मक असतात, पण त्या वयानुसार असणारी जैविक जोखीम पूर्णपणे टाळू शकत नाहीत. गुणसूत्रांमधील (chromosomal) विकृतींचा धोका, अपऱ्याचं (placenta) कार्य कमी होणं आणि ऊतींची लवचिकता घटणं हे वयानुसार होणारे नैसर्गिक बदल आहेत. आरोग्यदायी जीवनशैलीमुळे आई आणि बाळाचं आरोग्य निश्चितच सुधारतं, पण वाढत्या वयात झालेल्या गर्भधारणांसाठी सतत वैद्यकीय देखरेख आवश्यकच असते,” असं डॉ. श्रीनिवास सांगतात.
वयवर्षे ६० आणि मुलांच्या संगोपनातील संभाव्य आव्हानं
डॉ. श्रीनिवास सांगतात, “सुमारे ६५ वर्षांच्या आईसाठी थकवा आणि प्रसूतीनंतरची शरीराची झालेली झीज भरून काढण्याची प्रक्रिया अधिक वेळखाऊ असते. आरोग्य उत्तम असलं तरी लहान मुलांची काळजी घेणं. विशेषतः एकाच वेळी अनेक लहान किंवा शाळकरी मुलं असतील, तर शरीरासाठी खूप कष्टदायक ठरू शकतं.” त्या म्हणतात, “अशा वयात मातृत्वात केअरगिव्हिंग बर्नआउट म्हणजेच सततची जबाबदारी आणि थकवा, भविष्यातील नियोजनाची चिंता आणि आरोग्य खालावल्यास मुलांच्या दीर्घकालीन देखभालीबाबतची काळजी, ही ताणाची कारणं ठरू शकतात.”
केअरगिव्हिंग नेटवर्क आवश्यक
त्या पुढे स्पष्ट करतात, “शैक्षणिक, आरोग्यविषयक आणि दैनंदिन व्यवहार हाताळण्यासाठी मजबूत आधार आवश्यक असतो. त्यामुळे अशा मातांसाठी सामाजिक, कौटुंबिक किंवा केअरगिव्हिंग नेटवर्क अत्यावश्यक ठरतं, जेणेकरून आई आणि मुलं दोघांचंही एकूण आरोग्य टिकून राहू शकेल.”