scorecardresearch

विश्लेषण : अदानी समूह आता सिमेंट व्यवसायातही; काय झाला होल्सिम कंपनीशी करार?

‘होल्सिम लिमिटेड’ कंपनीचा भारतातील व्यवसाय मिळविण्यासाठी अदानी समूहाने १०.५ अब्ज अमेरिकी डॉलरचा म्हणजेच ८१,००० कोटी रुपयांचा करार पूर्ण केल्याचे नुकतेच जाहीर केले आहे.

adani holsim deal

गौरव मुठे

बंदरांपासून ऊर्जा क्षेत्रापर्यंतच्या विविध क्षेत्रांत प्रस्थापित असलेल्या अदानी समूहाचा आता सिमेंट उद्योगाचा मार्ग सुकर झाला आहे. ‘होल्सिम लिमिटेड’ कंपनीचा भारतातील व्यवसाय मिळविण्यासाठी अदानी समूहाने १०.५ अब्ज अमेरिकी डॉलरचा म्हणजेच ८१,००० कोटी रुपयांचा करार पूर्ण केल्याचे नुकतेच जाहीर केले. अदानी समूहाने गेल्या काही वर्षांत बंदरे, वीज केंद्रे आणि खाणकाम अशा उद्योगांपलीकडे जाऊन विमानतळे, डेटा सेंटर्सपर्यंतच्या विविध क्षेत्रांत मजल मारली आहे.

नेमका करार काय?

स्विस बहुराष्ट्रीय कंपनी ‘होल्सिम लिमिटेड’चा भारतातील व्यवसाय संपादण्यासाठी सुमारे ८१,००० कोटी रुपयांचा मोबदला मोजणारा करार केल्याचे अदानी समूहाने रविवारी जाहीर केल़े. या समूहाने गेल्या वर्षी अदानी सिमेंटेशन लिमिटेड आणि अदानी सिमेंट लिमिटेड अशा दोन सिमेंट उपकंपन्या स्थापन केल्या होत्या. यापैकी अदानी सिमेंटेशन ही कंपनी महाराष्ट्रातील रायगड आणि गुजरातमधील दहेज येथे दोन सिमेंट कारखाने उभारण्याची योजना आखत होती. आता होल्सिम लिमिटेडशी झालेल्या करारामुळे अदानी समूहाला अंबुजा सिमेंट्समधील ६३.१ टक्के हिस्सा आणि एसीसीमध्ये ५४.५३ टक्के हिस्सेदारी मिळणार आहे.

अदानी समूहाकडून खुल्या बाजारातून समभाग खरेदीचा प्रस्ताव काय?

अदानी समूहाने होल्सिमची भागभांडवली मालकी असलेल्या अंबुजा सिमेंट आणि एसीसी लिमिटेडच्या भागधारकांकडून खुल्या बाजारातून समभागांची खरेदी करून दोन्ही कंपन्यांत प्रत्येकी २६ टक्के हिस्सेदारी वाढविण्याचा निर्णय सोमवारी जाहीर केला आहे. त्यानुसार अदानी समूहाकडून खुल्या बाजारातून अंबुजा सिमेंटचे समभाग प्रत्येकी ३८५ रुपयांना, तर एसीसी लिमिटेडचे समभाग प्रत्येकी २,३०० रुपयांना खरेदी करण्यात येणार आहेत. अशा तऱ्हेने दोन्ही कंपन्यांचे २६ टक्के भागभांडवल खरेदी करण्यात येणार आहेत. त्यापैकी १९,८७९.५७ कोटी रुपयांचे अंबुजा सिमेंटचे ५१.६३ कोटी समभाग तर एसीसी लिमिटेडचे ४.८९ कोटी समभाग एकूण ११,२५९.९७ कोटी रुपयांना खरेदी करण्यात येणार आहेत. खुल्या बाजारातून समभाग खरेदीनंतर अदानी समूहाची अंबुजा सिमेंटमध्ये ८९ टक्के आणि एसीसी लिमिटेडमधील हिस्सेदारी ८१ टक्क्यांवर पोहोचणार आहे.

निर्मिती क्षेत्रात नव्याने प्रवेश…

अदानी समूहाने गेल्या काही वर्षांत बंदरे, वीज केंद्रे आणि खाणकाम यांच्या संचालनाच्या मुख्य उद्योगांपलीकडे जाऊन विमानतळे, डेटा सेंटर्सपर्यंतच्या विविध क्षेत्रांत मजल मारली असून, आता देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सिमेंट उत्पादक बनण्याच्या दिशेने त्याची पावले पडली आहेत. मात्र अदानी समूह पहिल्यांदाच सिमेंट निर्मिती क्षेत्रात प्रवेश करणार आहे. अंबुजा आणि एसीसी सिमेंट कंपनी खरेदी केल्यानंतर अदानी समूह हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सिमेंट उत्पादक बनणार आहे. भारतीय सिमेंट व्यवसायात आदित्य बिर्ला समूहाची अल्ट्राटेक सिमेंट कंपनी सध्या आघाडीवर आहे. अल्ट्राटेकची वर्षाला ११.७ कोटी टन सिमेंटचे उत्पादन करण्याची क्षमता आहे. तर ‘होल्सिम लिमिटेड’च्या अंबुजा सिमेंट आणि एसीसी लिमिटेड या दोन्हींची संयुक्त क्षमता ६.८ कोटी टन प्रतिवर्ष इतकी आहे. २०१५ मध्ये स्वित्झर्लंडमधील कंपनी ‘होल्सिम’चे प्रतिस्पर्धी फ्रेंच कंपनी लाफार्जसोबत विलीनीकरण झाल्यानंतर लाफार्ज-होल्सिम नावाने सिमेंट व्यवसायातील जागतिक पातळीवरील एक मोठी कंपनी बनली होती.

दोन्ही कंपन्यांचे विलीनीकरण शक्य?

सिंगापूरची गुंतवणूक सल्लागार कंपनी फिलिप्स कॅपिटलच्या मते, अदानी समूहाकडून दोन्ही कंपन्यांच्या अधिग्रहणानंतर अंबुजा सिमेंट आणि एसीसी लिमिटेड या दोन्ही नाममुद्रांच्या एकत्रीकरणाचे धाडसी आवाहन असेल. दोन्ही कंपन्यांच्या एकत्रीकरणामुळे दोन्ही कंपन्यांना त्यांची कार्यक्षमता वाढविण्याबरोबरच उत्पादन खर्चात कपात शक्य होईल. शिवाय उत्पादनाशी संबंधित समन्वय साधण्यास मदत होईल. अदानी समूह सिमेंट व्यवसायाचा त्यांच्या इतर अनेक व्यवसाय जसे की बांधकाम, पायाभूत सुविधा, अक्षय्य ऊर्जा, बंदरे, मालवाहतूक इत्यादींशी उत्तम समन्वय साधेल अशी अपेक्षा करणे योग्य ठरेल, असे देखील फिलिप्स कॅपिटलने म्हटले आहे.

अदानींनी मारली बाजी…

अंबुजा सिमेंट आणि एसीसी लिमिटेड खरेदी करण्यासाठी अदानी समूहाबरोबरच सज्जन जिंदाल यांच्या नेतृत्वाखालील जेएसडब्ल्यू समूहदेखील दोन्ही कंपन्या ताब्यात घेण्यासाठी उत्सुक होती. होल्सिम समूहाने भारतात १७ वर्षांपूर्वी व्यवसाय सुरू केला होता. होल्सिम समूहाच्या अंबुजा सिमेंट, एसीसी लिमिटेड या दोन्ही कंपन्या भारतीय भांडवली बाजारात सूचिबद्ध आहेत. सिंगापूरची गुंतवणूक सल्लागार कंपनी फिलिप्स कॅपिटलने अंबुजा सिमेंट आणि एसीसी लिमिटेड या दोन्ही कंपन्यांच्या समभागांमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तविली आहे. अंबुजा सिमेंटचा समभागाचे पुढील लक्ष्य ४४० रुपये तर एसीसी लिमिटेडच्या समभागाचे पुढील लक्ष्य २,८५० रुपये राहील असा अंदाज वर्तविला आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Adani business group now entering in cement production holsim ltd pmw

ताज्या बातम्या