पोपटांच्या काही प्रजातींना प्रशिक्षण दिले की ते माणसांसारखे बोलू शकतात, हे आपल्याला फार पूर्वीपासून माहीत आहे. कबुतरांना प्रशिक्षित करून चिठ्ठी किंवा संदेश पोहोचविण्यासाठी वापरले जायचे. यातूनच शास्त्रज्ञांना पशु-पक्ष्यांची भाषा किंवा संवाद साधण्याचे साधन याविषयी कुतूहल निर्माण झाले. त्याबद्दल वर्षानुवर्षे संशोधन सुरूच आहे. या संशोधनातीलच एक महत्त्वाचा निष्कर्ष नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे, तो म्हणजे हत्तीही एकमेकांना माणसांसारखेच नावाने हाक मारतात किंवा संबोधित करतात. हा अभ्यास नक्की काय आहे, त्यात आणखी कोणत्या कोणत्या बाबी उलगडल्या आहेत, ते जाणून घेऊया. 

संशोधकांना काय काय आढळले? 

केनियातील जंगली आफ्रिकन हत्ती मनुष्याप्रमाणेच एकमेकांना संबोधित करण्यासाठी नावांचा वापर करतात. ते त्यांच्यासाठी असलेले नाव ओळखतात, त्याला प्रतिसाद देतात, अर्थात तेही कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय आणि अनुकरण न करता. ‘नेचर इकोलॉजी अँड इव्होल्यूशन’ या जर्नलमध्ये हत्तींबाबत केलेला अभ्यास नुकताच प्रसिद्ध झाला आहे. यात ही माहिती देण्यात आली आहे. 

हेही वाचा >>> एनटीएने रद्द केले १,५६३ विद्यार्थ्यांचे वाढीव गुण; कारण काय? आता पुढे काय होणार?

हत्ती कशा प्रकारे एकमेकांना संबोधित करतात? 

हत्ती एकमेकांना संबोधित करण्यासाठी रंबल म्हणजेच सौम्य चढ-उतार असलेल्या आवाजाचा वापर करतात. रंबलच्या तीन उप-श्रेणी आहेत. पहिल्या श्रेणीमध्ये संपर्क रंबल्सचा वापर दूर असलेल्या किंवा नजरेआड असलेल्या दुसऱ्या हत्तीला बोलावण्यासाठी केला जातो. दुसरा प्रकार हत्ती एकमेकांच्या अतिशय जवळ असतात, तेव्हा हर्षध्वनीचा वापर केला जातो. तर तिसऱ्या प्रकारात प्रौढ मादी तिच्या पिल्लांसाठी काळजीयुक्त स्वर, किंवा ध्वनीचा वापर करते. 

हे संशोधन कुणी आणि कुठे केले? 

न्यूयॉर्क राज्यातील कॉर्नेल विद्यापीठातील संशोधक आणि प्राणी वर्तणूकशास्त्रज्ञ मिकी पारडो यांनी आणि त्यांच्या गटाने कोलोरॅडो स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये असताना याबाबत संशोधन केले. त्यासाठी संशोधकांनी १९८६ ते २०२२ दरम्यान ‘अंबोसेली नॅशनल पार्क’ आणि सांबुरू आणि ‘बफेलो स्प्रिंग्स नॅशनल रिझर्व्ह’मध्ये मादी हत्ती आणि तिच्या पिल्लांच्या आवाजाचे ४६९ वेळा ध्वनिमुद्रण केले. त्यांच्या आवाजाच्या ध्वनिमुद्रणाचे विश्लेषण करण्यासाठी मशीन-लर्निंग मॉडेलचा वापर करण्यात आला. त्यातून तीन प्रकारचे रंबल त्यांना आढळले. 

हेही वाचा >>> मुस्लीम धर्मियांसाठी हज यात्रेचे महत्त्व काय? या यात्रेत मुस्लीम कोणते विधी करतात?

संशोधनात्मक विश्लेषण कसे? 

संशोधक अनेक दशकांपासून हत्तींचे सातत्याने निरीक्षण करत असल्याने सर्व हत्तींची त्यांच्या कानांच्या आकारावरून ओळख पटवणे शक्य झाले होते. ध्वनिमुद्रण केलेल्या आवाजाचा अभ्यास केल्यानंतर संशोधकांना आढळले की कोणाला संबोधित केले जात आहे यावर ध्वनिरचना बदलते. हत्ती ज्या दुसऱ्या हत्तीला आवाज देत होते, ते त्या हत्तीच्या आवाजाची नक्कल करत नाहीत. हाक दिलेल्या हत्तीचा आवाज आणि त्याला ज्या हत्तीने प्रतिसाद दिला त्यांच्याही आवाजाचे ध्वनिमुद्रण संशोधकांनी केले. ज्या हत्तीला आवाज दिला किंवा संबोधित केले होते, अशा १७ हत्तींना ते कळपात असताना संशोधकांनी मुद्रण ऐकवले असता त्या-त्या हत्तींनीच अधिक तीव्रतेने प्रतिसाद दिला. म्हणजेच ध्वनिरचनेत असे काहीतरी होते जे आवाज देणाऱ्याचा हेतू आणि तो आवाज कोणासाठी होता हे ओळखता येते. 

आणखी कोणत्या बाबी आढळल्या? 

इतर व्यक्तींना नाव देण्याची गरज भाषेच्या उत्क्रांतीशी संबंधित असू शकते. एखाद्याचे नाव लक्षात आल्यावर मानव अधिक सकारात्मक आणि सौहार्दाने प्रतिसाद देतात. त्याचप्रमाणे पिल्लांची काळजी करणारी हत्तीची मादी तिच्या पिल्लांना प्रशिक्षित करण्यासाठी किंवा त्याचे नाव जाणून देण्यास मदत करण्यासाठी त्यांच्या पिल्लांची नावे वारंवार वापरतात. पिल्लांना मात्र, अशा प्रकारचे वर्तन त्यांच्यात विकसित करण्यासाठी अनेक वर्षांचा कालावधी लागू शकतो. ही नावे जाणून घेतल्यास त्याचा शोध घेणे अत्यंत उपयोगी ठरेल. केवळ काही प्राणी आवाजांचे अनुकरण करण्यास सक्षम आहेत, काही हत्तीदेखील आवाजाची नक्कल करू शकतात. त्यामुळे या अभ्यासात हत्तींच्या आवाज, त्याची रचना यांचा अधिक अभ्यास गरजेचा आहे, हे दर्शविते, असे संशोधकांना वाटते.  

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोणत्या बाबींचा अधिक अभ्यास गरजेचा आहे? 

भिन्न हत्तींनी एकाच हत्तीला समान नाव वापरले किंवा त्यांनी एकाच हत्तीला वेगवेगळ्या नावांनी संबोधित केले, हे अभ्यासक ठामपणे सांगू शकलेले नाहीत. त्यामुळे मिकी पारडो म्हणतात की, या हत्तींनी नाव पुकारलेले नाव कसे आहे, विशिष्ट हत्तींसाठीची नावे मी जेव्हा वेगळे करू शकेन तेव्हा अनेक निष्कर्ष समोर येतील.