अमोल परांजपे
चंद्रयान-३ मोहिमेच्या यशाचा जल्लोष देशभरात सुरू असतानाच भारतीय अवकाश संशोधन संस्था, ‘इस्रो’ने आपल्या पुढल्या मोहिमेची घोषणा केली आहे. एकीकडे चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास सुरू असतानाच आता सूर्याचे अवलोकन करण्यासाठी अंतराळयान पाठविले जाणार आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात श्रीहरिकोटा येथून ‘आदित्य एल-१’ हे यान पीएसएलव्ही प्रक्षेपकाच्या मदतीने सूर्याकडे झेपावेल. या मोहिमेचे महत्त्व काय, आतापर्यंत सूर्यावर पाठविलेली याने कोणती आणि त्यातून काय हाती लागले, याचा हा थोडक्यात आढावा.

‘आदित्य एल-१’ मोहिमेची वैशिष्ट्ये काय?

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा पहिला देश ठरल्यानंतर भारताची पहिली सूर्यमोहीम पुढील आठवड्यापासून सुरू होणार आहे. प्रत्यक्ष प्रक्षेपणाची वेळ अद्याप निश्चित झाली नसली, तरी २ ते ४ सप्टेंबरच्या दरम्यान ‘आदित्य एल-१’चे प्रक्षेपण होईल. अंतराळयान श्रीहरिकोटा येथे पोहोचले असून ते पीएसएलव्ही या प्रक्षेपकाला जोडण्यात आल्याचे इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी जाहीर केले आहे. सूर्याच्या सर्वात वरील आवरणाचा, म्हणजे कोरोनाचा अभ्यास करण्यासाठी या यानामध्ये सात वेगवेगळी उपकरणे बसविण्यात आली आहेत. सौरवादळांचा पृथ्वीच्या वातावरणावर होणारा परिणाम तपासण्यासाठी यातून हाती आलेल्या माहितीचा उपयोग होणार आहे. सूर्याच्या संस्कृतमधील शेकडो नावांपैकी एक, आदित्य हे नाव या मोहिमेला देण्यात आले आहे. ‘एल-१’ हा सूर्य आणि पृथ्वीच्या मधील एक बिंदू आहे.

‘एल-१’ म्हणजे काय?

अंतराळातील मोठे वस्तुमान असलेल्या दोन वस्तूंमध्ये (तारे, ग्रह, उपग्रह इत्यादी) गुरुत्वाकर्षण असते. या दोन वस्तूंमधील काही बिंदू असे असतात की तेथे दोन्हींचे गुरुत्वाकर्षण समतोल (बॅलन्स) असते. अशा बिंदूंना ‘लँगरेंज पॉइंट’ म्हटले जाते. इटालियन संशोधक जोसेफ लुई लँगरेंज यांच्या स्मरणार्थ हे नाव देण्यात आले आहे. सूर्य आणि पृथ्वीदरम्यान आतापर्यंत असे पाच बिंदूू खगोल अभ्यासकांना सापडले असून त्यांना एल-१, एल-२, एल-३, एल-४ आणि एल-५ अशी नावे देण्यात आली आहेत. ‘आदित्य’ हे अंतराळयान एल-१ या बिंदूवरून सूर्याचा अभ्यास करणार असल्याने मोहिमेचे नाव ‘आदित्य एल-१’ असे ठेवण्यात आले आहे. अलीकडेच ‘नासा’ आणि ‘युरोपियन स्पेस एजन्सी’ने (ईएसए) संयुक्तपणे काढलेल्या ‘सोलर ऑर्बिटर’ मोहिमेतून तुलनेने लहान सौरवाऱ्यांचा शोध लागला होता. आदित्यच्या निरीक्षणांमधून यावर अधिक प्रकाश पडेल, अशी संशोधकांना अपेक्षा आहे.

चांद्रयान-३: भारतीय संस्कृतीतील चंद्राच्या, शिवापासून ते रामापर्यंतच्या पौराणिक कथा

‘आदित्य एल-१’ मोहीम कशी असेल?

पीएसएलव्हीच्या मदतीने उड्डाण केल्यानंतर पहिले काही दिवस अंतराळयान पृथ्वीभोवतीच लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये फिरत राहील. मंगळयान किंवा चंद्रयानाप्रमाणेच त्याची कक्षा वाढविली जाईल आणि त्यानंतर गोफणीप्रमाणे यान सूर्याच्या दिशेने भिरकावले जाईल. त्यानंतर सूर्य आणि पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणांच्या मदतीने यान सूर्याकडे प्रवास करेल. सुमारे १५ लाख किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर यान ‘एल-१’ बिंदूपाशी पोहोचेल. या ठिकाणी गुरुत्वाकर्षणाचा समतोल असल्यामुळे यान कमीत कमी इंधनामध्ये स्थिर राहू शकेल. त्यानंतर यानावर असलेल्या उपकरणांच्या मदतीने सूर्यावरील वातावरणाची माहिती त्याच क्षणी (रियल टाइम) पृथ्वीवरील नियंत्रणकक्षात पाठविली जाईल. लगोलग त्या माहितीचा अभ्यास करून सौरवादळे, त्यांची तीव्रता, त्याचा पृथ्वीवर होत असलेला परिणाम इत्यादी अभ्यासले जाईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सौरमोहिमांचा इतिहास काय?

मार्च १९६०मध्ये सूर्याचा अभ्यास करण्यासाठी पहिली मोहीम ‘नासा’ आणि अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने संयुक्तपणे हाती घेतली. त्यानंतर १९६५ ते ६९ अशी सलग सहा वर्षे ‘नासा’ने सूर्याकडे अंतराळयाने पाठविली. ६९ वगळता अन्य सर्व मोहिमा यशस्वी ठरल्या. १९७४ साली युरोपने सूर्याच्या अभ्यासात प्रथमच उडी घेतली. त्या वर्षी जर्मनीची अंतराळ संशोधन संस्था आणि ‘नासा’ने संयुक्तपणे मोहीम यशस्वी केली. त्यानंतर किमान १५ मोहिमा राबविल्या गेल्या असून त्यातील काही यानांचे काम अद्याप सुरू आहे. यातील बहुतांश मोहिमा या नासाने किंवा नासा आणि युरोपातील अंतराळ संशोधन संस्थांनी संयुक्तरीत्या पार पाडल्या आहेत. फेब्रुवारी २०२०मध्ये ‘ईएसए’ने स्वबळावर सूर्यमोहीम राबविली. आता भारत या मोजक्या देशांच्या पंगतीत जाऊन बसणार आहे. एकट्याच्या जिवावर संपूर्ण स्वदेशी बनावटीचे यान घेऊन सूर्यावर स्वारी करणारा भारत हा अमेरिकेनंतरचा पहिला देश ठरणार आहे.

amol.paranjpe@expressindia.com