Hidden Danger of AirPods: Airpods, Headsphones हे आजच्या जगण्याचे अविभाज्य भाग झाले आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत एकवेळ आपण जेवण विसरू, पण मोबाईल, एअरपाॅड्स हे बरोबर असणं आवश्यक झालं आहे. त्यामुळे दिवसभर सभोवतालच्या आवाजाबरोबर सतत कुठला ना कुठला आवाज कानावर पडतच राहतो. परंतु, हाच सततचा आवाज आपलं जगणं हिरावून घेवू शकतो याची, आपल्याला पुसटशी कल्पनाही नसते.
‘तो’ आपल्या सारखाच सामान्य माणूस. पण, तो शांत झोपू शकत नाही. रात्रीची नीरव शांतता असली तरी, सतत कसले ना कसले आवाज त्याला ऐकू येत असतात. ही काही भूतबाधा नाही. हा ध्वनी प्रदूषणाचा तोटा आहे. हे सगळं ६६ वर्षीय अमित चंद्र यांच्या बरोबर घडतंय. ते सांगतात, “माझं आयुष्य सतत होणार्या आवाजाच्या पार्श्वभूमीवर चाललंय. मला सतत कसला ना कसला आवाज ऐकू येतो. कधी घंटानाद, कधी भुंवभुंव, कधी क्लिकिंग, कधी घरघर. पण हे आवाज इतर कुणालाच ऐकू येत नाही. हे आवाज आभासी आहेत आणि तितकेच त्रासदायकही. त्यामुळे मन:शांती, एकाग्रता आणि झोप सगळंच हरवलं आहे.
श्रवणयंत्रणेत कायमचा बिघाड?
एकेकाळी जिथं शांतता असायची, तिथं आता कायमचा गोंगाट आहे. हे आता रोजचंच झालंय. शांत खोलीत जरा उशीवर डोकं टेकवलं की, तो आवाज आणखी वाढतो. हा आवाज लहान, सौम्य नाही. तर प्रचंड असतो. चीत्कार, फुसफुस, यांत्रिक घरघर अशा स्वरूपाचे हे आवाज असतात. हे आवाज मला सतत आठवण करून देतात की, माझ्या श्रवण यंत्रणेत कायमचा बिघाड झाला आहे.
तज्ज्ञ काय सांगतात?
६६ वर्षीय अमित चंद्र व्यवसायाने साउंड इंजिनियर आणि तंत्रज्ञान सल्लागार होते. ते गेली दहा वर्षं ‘टिनिटस’ नावाच्या आजाराशी झुंज देत आहेत. या आजारात कोणत्याही बाह्य कारणाशिवाय कानात सतत आवाज किंवा भुंवभुंव असा आवाज ऐकू येतो. अमित यांची ही अवस्था सततच्याच आवाजामुळे म्हणजेच मोठ्या आवाजात संगीत ऐकणे आणि दीर्घकाळ इअरपॉड्स वापरण्यामुळे झाली आहे. आवाजाच्या क्षेत्रात काम करणारी लोक, म्हणजे ज्यांना सतत मोठ्या आवाजाच्या लाईव्ह कॉन्सर्ट्ससारख्या क्षेत्रात काम कराव लागतं, त्यांच्यावर असा परिणाम होतो, अस डॉ. संजय सचदेवा (दिल्लीतील वरिष्ठ ईएनटी तज्ज्ञ) यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितलं.
ते पुढे सांगतात की, सतत मोठ्या आवाजात राहिल्याने कानातील बारीक केसांसारख्या पेशींचं नुकसान होतं. मेंदूतील ‘ऑडिटरी कॉर्टेक्स’ म्हणजे आवाज ओळखणारा भाग, या पेशींमधून येणारे सिग्नल मिळणं थांबतं. त्यामुळे मेंदू जवळच्या न्यूरॉन्सना जास्त सक्रिय करतो. त्यामुळे तो स्वतःचा एक आभासी आवाज निर्माण करू शकतो. हाच ‘टिनिटस’ नावाचा त्रास आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर, जेव्हा मेंदूला बाहेरून आवाज ऐकू येत नाही, तेव्हा तो स्वतःच आवाज तयार करतो.
टिनिटस म्हणजे काय?
टिनिटस या आजारात मेंदूला बाहेरचा आवाज ऐकू येण बंद झालं की, त्याची भरपाई करण्यासाठी मेंदू स्वतःच ध्वनी निर्माण करतो. डॉ. सचदेवा सांगतात, सतत मोठ्या आवाजात राहणं किंवा मध्यम आवाजात अनेक वर्षे काम करणं, यामुळे श्रवणशक्ती कमी होते. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, २०५० पर्यंत जगातील प्रत्येक दहापैकी एक व्यक्ती श्रवणदोषाने त्रस्त असेल. आजच्या तरुणवर्गात इअरपॉड्स वापरणं आणि मोठ्या आवाजात संगीत ऐकणं याच प्रमाण अधिक आहे.
टिनिटसच्या मागची कारण
अमित सांगतात, “माझं आयुष्यच आवाजाशी जोडलेलं होतं. साउंड इंजिनियरिंग, रॉक कॉन्सर्ट्स, मोठ्या आवाजात संगीत ऐकणं हा माझ्या कामाचा भाग होता. त्याशिवाय दिल्लीसारख्या शहरात राहणं म्हणजे सतत ट्रॅफिकचा गोंगाट आणि कधी कधी फायरिंग रेंजचा आवाज. २०११ साली एका फायरिंग रेंजवरून परतल्यावर मला कानात घंटानादासारखा आणि विचित्र आवाज येऊ लागला. नंतर श्रवणशक्ती कमी होऊ लागली. व्यवस्थित ऐकू येईनास झालं. कमी ऐकू येत होत म्हणून मी इअरपॉड्सवर आणखी आवाज मोठा ठेवू लागलो. हळूहळू माझ्या कानांना दुहेरी फटका बसला. एकीकडे टिनिटसचा कायमस्वरूपी त्रास आणि त्यानंतर कानातील संसर्गामुळे गंभी्र बहिरेपणा आला. माझं संपूर्ण व्यावसायिक जीवन जे ऐकण्यावर अवलंबून होतं, अक्षरशः उद्ध्वस्त झालं.”
ते पुढे सांगतात, “या आजाराबरोबर चिंता, झोप न लागणं, ताण, चिडचिड, भीतीचे झटके, नैराश्य आणि उलटी येतेय असं सारखं वाटत राहाणं असं सतत होत राहिलं. साउंड थेरपी, कॉग्निटिव्ह बिहेव्हियर थेरपी, हिअरिंग एड्स आणि जीवनशैलीत बदल… या सगळ्यातून मी जात राहिलो. परंतु, बोन-अँकर्ड इम्प्लांट’ ही तंत्रज्ञान उपचार पद्धती माझ्या आयुष्यातील खरा टर्निंग पॉइंट ठरली. या तंत्रज्ञानाने मला पुन्हा आवाजाच्या जगात आणलं. पण हा सोपा उपाय नव्हता. यासाठी प्रचंड संयम, मेहनत आणि मेंदूला पुन्हा ऐकायला शिकवण्याचं सातत्य लागतं. हा माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ होता.”
सामान्य ऐकण्याची क्षमता परत मिळवता येते का?
अमित सांगतात, “आता मी स्वतःला शांत ठेवण्यासाठी ‘रिलॅक्सेशन टेक्निक्स’ वापरतो, पुरेशी झोप घेतो आणि जास्त प्रमाणात कॅफिन किंवा दारू टाळतो. आवाजाच्या ठिकाणी गेलो की, नेहमी कानांचे संरक्षण करतो. टिनिटस अजूनही आहे. तो एक नकोसा सोबती आहे. पण आता तो माझ्या आयुष्याचा केंद्रबिंदू नाही. मी त्याबरोबर जगायला शिकलोय, आनंदाने जगायला शिकलोय आणि आवाजातही माझी स्वतःची शांतता शोधायला शिकलोय.”
ते पुढे म्हणतात, “आज माझ्या प्रयत्नांचं फळ मिळालं आहे. मी पुन्हा संगीताचा आनंद घेतो आणि संगीत नाटकांसाठी ध्वनी मिक्सिंगचं काम करतो. जेव्हा हा आजार मला शांत बसवू पाहत होता, तेव्हा मी इतरांसाठी आवाजाचं जग सुंदर बनवायचं ठरवलं. हाच माझा सर्वात मोठा विजय आहे. यातून हे समजत की, गंभीर श्रवणदोषानंतरही मेंदूची लवचिकता (plasticity) आपल्याला नव्या पद्धतीने जुळवून घेण्याची ताकद देते.”