अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आखाती देशांच्या दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच गुरुवारी संयुक्त अरब अमिराती (यूएई)ला भेट दिली. ट्रम्प यांनी अबू धाबीमधील राष्ट्रपती राजवाडा असणाऱ्या कासर अल वतन येथे भेट दिली असता त्यांचे स्वागत एका लक्षवेधी आणि आगळ्या वेगळ्या अशा सांस्कृतिक कार्यक्रमाने करण्यात आले. डोनाल्ड ट्रम्प यूएईचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्यासह प्रवेश करत असताना महिलांनी पांढऱ्या पोशाखात कडेला एका रांगेत उभे राहून, त्यांचे लांब केस सोडून त्यांच्या स्वागतासाठी नृत्य सादर केले. या महिलांच्या मागे काही पुरुषांनी ढोल वाजवत पारंपरिक मंत्रांचा उच्चार केला.
राष्ट्रपती राजवाड्यातील सांस्कृतिक अभिवादनानंतर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले, “किती सुंदर शहर आहे! मला हे शहर खूप आवडते!” डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर सादर केलेल्या नृत्य प्रकाराला काय म्हणतात. या पारंपरिक नृत्यप्रकाराचे महत्त्व काय? ही प्रथा काय आहे व त्यानुसार हे नृत्य कधी सादर केले जाते? जाणून घेऊयात.
डोनाल्ड ट्रम्प यांची यूएई भेट
डोनाल्ड ट्रम्प संयुक्त अरब अमिरातीमधील अबू धाबीच्या झायेद विमानतळावर पोहोचताच त्यांचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांनी स्वागत केले. संयुक्त अरब अमिरातीच्या राष्ट्राध्यक्षांनी सांगितले की, यूएई ऊर्जा, एआय आणि उद्योगासह अनेक क्षेत्रांमध्ये अमेरिकेबरोबर भागीदार आहे. येणाऱ्या १० वर्षांत यूएई अमेरिकेत १.४ ट्रिलियन डॉलर्सची गुंतवणूक करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अबू धाबीमध्ये त्यांनी शेख झायेद ग्रँड मशिदीलादेखील भेट दिली. डोनाल्ड ट्रम्प चार दिवसांच्या आखाती देशांच्या दौऱ्यावर असताना त्यांनी सौदी अरेबियाचीदेखील भेट घेतली.
अमेरिका आणि सौदी अरेबियादरम्यान ऊर्जा, संरक्षण, खणिकर्म आणि अन्य क्षेत्रांमध्ये सहकार्यासंबंधित करार करण्यात आले. या करारावर मोहम्मद बिन सुलेमान आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षऱ्या केल्या. करारात अमेरिकेने सौदी अरेबियाला जवळपास १४२ अब्ज डॉलर मूल्यांच्या शस्त्रास्त्रांची विक्री करण्याचे मान्य केले. अमेरिकेने कोणत्याही देशाबरोबर केलेला हा सर्वात मोठा संरक्षण सहकार्य करार असल्याचे व्हाइट हाऊसने दिलेल्या माहितीत सांगितले.
काय आहे अल-अय्याला प्रथा अन् नृत्यप्रकार?
अल-अयाला हा संयुक्त अरब अमिराती आणि ओमानच्या काही भागांत लोकप्रिय असलेला पारंपरिक नृत्यप्रकार आहे. २०१४ मध्ये युनेस्कोकडून या नृत्यप्रकाराला मानवतेचा अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून मान्यता मिळाली. युनेस्कोच्या माहितीनुसार, या नृत्याच्या सादरीकरणात कविता, ढोलकी वाजवणे आणि युद्धाचा एखादा प्रसंग उभा करणे, यांसारख्या प्रथांचे पालन केले जाते.
पारंपरिक अशा अल-अयाला नृत्यात पारंपरिक पोशाखातील तरुणी समोर उभ्या राहतात आणि त्यांचे लांब केस एका बाजूने दुसरीकडे हलवत असतात. त्यांच्या मागे पुरुषांच्या दोन रांगा एकमेकांसमोर असतात. पुरुषांच्या हातात भाले किंवा तलवारी दर्शविणाऱ्या पातळ बांबूच्या काठ्या असतात. हे नृत्य आनंदी समारंभांचा एक मोठा भाग मानला जातो. ओमान आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये लग्न, राष्ट्रीय उत्सव आणि सांस्कृतिक उत्सवांमध्ये हा नृत्यप्रकार सादर केला जातो.
इराणसारख्या पश्चिम आशियातील इतर देशांप्रमाणेच संयुक्त अरब अमिरातीमध्ये महिलांना केस झाकण्याची सक्ती करणारे कोणतेही कायदे नाहीत आणि म्हणूनच महिला या नृत्य प्रकारात सहभागी होऊ शकतात. मुख्य अल-अयाला या प्रथेला आणखीन वेगळे करणारी गोष्ट म्हणजे सर्व वयोगटातील आणि पार्श्वभूमीचे लोक यात भाग घेऊ शकतात. या नृत्यप्रकारातील मुख्य कलाकार सहसा अशी व्यक्ती असते, ज्याला ही भूमिका वारशाने मिळाली असते. त्या व्यक्तीवर इतरांना प्रशिक्षण देण्याची आणि भविष्यातील पिढ्यांपर्यंत हा सांस्कृतिक वारसा पोहोचविण्याची जबाबदारी दिली जाते.
ट्रम्प यांचा आखाती देशांचा दौरा
डोनाल्ड ट्रम्प यांनी कतार आणि सौदी अरेबियाला भेट दिल्यानंतर सर्वात शेवटी संयुक्त अरब अमिरातीला भेट दिली. या दोन्ही आखाती देशांमध्ये त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. सौदी अरेबियामध्ये मंगळवारी सकाळी एअर फोर्स वन उतरताच ट्रम्प यांचे सहा लढाऊ विमानांच्या पथकाने स्वागत केले. कतारमध्ये त्यांच्या विमानाच्या बाजूला लढाऊ विमाने होती आणि त्यांच्या सायबर ट्रक मोटारगाडीचे उंटांच्या परेडने स्वागत करण्यात आले. कतारच्या राजघराण्यातील एका सदस्याने त्यांना ४०० दशलक्ष डॉलर्सचे लक्झरी जेट भेट म्हणून दिले होते. या भेटीने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले होते. संयुक्त अरब अमिरातीमध्ये, ट्रम्प यांच्या स्वागतासाठी अधिकाऱ्यांनी पहिल्यांदाच अबू धाबीमधील शेख झायेद ग्रँड मशीद जनतेसाठी बंद केली. त्यांच्या सन्मानार्थ बुर्ज खलिफावर लाल, पांढरा आणि निळा रंग अर्थात अमेरिकेचा ध्वज प्रकाशित करण्यात आला.
अल जझीरानुसार, ट्रम्प यांनी दावा केला की, त्यांच्या तीन देशांच्या दौऱ्यात तंत्रज्ञान, संरक्षण आणि व्यवसाय या क्षेत्रात करार केले, जे जवळ जवळ १० ट्रिलियन डॉलर्सचे होते. ते म्हणाले, “सौदी अरेबियात येताना कतार माझ्यासाठी खूप महत्त्वाचे होते, कारण माझे वैयक्तिक संबंध होते. लोकांनी गेल्या चार दिवसांत गुंतवणुकीच्या बाबतीत असे काहीही पूर्वी घडताना पाहिले नसल्याचे म्हटले आहे,” असे ट्रम्प पुढे म्हणाले.