गतशतकातील सर्वांत प्रदीर्घ आणि बहुचर्चित अशा व्हिएतनाम युद्धाच्या समाप्तीस ३० एप्रिल रोजी ५० वर्षे पूर्ण झाली. १९५५ ते १९७५ अशी तब्बल २० वर्षे हे युद्ध अमेरिका समर्थित दक्षिण व्हिएतनाम आणि कम्युनिस्ट समर्थित उत्तर व्हिएतनाम यांच्यात लढले गेले. अखेरीस दक्षिण व्हिएतनाम आणि अर्थातच अमेरिकेचा नामुष्कीजनक पराभव झाला आणि सोव्हिएत रशिया, तसेच काही कम्युनिस्ट देशांनी समर्थन दिलेल्या उत्तर व्हिएतनामचा विजय झाला. अमेरिकेने या युद्धात जवळपास ५८ हजार सैनिक आणि निमसैनिक, तसेच इतर कर्मचारी गमावले. व्हिएतनामची हानी तर अपरिमित झाली. एकूण मिळून या युद्धात ३० लाखांहून अधिक मनुष्यहानी झाल्याचा अंदाज आहे.

पार्श्वभूमी

व्हिएतनाम, कंबोडिया आणि लाओस या तिन्ही देशांना मिळून इंडोचायना असे संबोधले जायचे आणि ही गतशतकाच्या सुरुवातीस फ्रेंचांची वसाहत होती. दुसऱ्या महायुद्धामध्ये जर्मनीने फ्रान्सचा पराभव केला, त्यावेळी जर्मनीचा दोस्त असलेल्या जपानने तुरळक फ्रेंच प्रतिकार मोडून काढत इंडोचायनाचा ताबा घेतला. पण जर्मनी आणि पुढे जपानच्या पराभवानंतर फ्रेंचांनी पुन्हा एकदा इंडोचायनाचा ताबा घेतला. मात्र तोपर्यंत इंडोचायना आणि त्यातही व्हिएतनाममध्ये राष्ट्रवादी चळवळ फोफावू लागली होती. फ्रान्स किंवा जपान अशी कोणतीही सत्ता राष्ट्रवाद्यांना मंजूर नव्हती. या राष्ट्रवाद्यांचे नेतृत्व होते हो चि मिन्ह यांच्याकडे. त्यांच्या नेतृत्वाखालील बंडखोरांना एकत्रितपणे ‘व्हिएतकाँग’ असे संबोधले जाते. त्यांनी फ्रेंचांविरुद्ध युद्ध पुकारले, ज्यास ‘फर्स्ट इंडोचायना वॉर’ असे संबोधले जाते.

अमेरिकेचा सहभाग

इंडोचायना युद्धसमाप्तीसाठी जिनिव्हा करारानुसार तह झाला. हो चि मिन्ह हे प्राधान्याने कम्युनिस्ट होते. त्यांच्याविरुद्ध फ्रेंचांना आधीपासूनच अमेरिकेने समर्थन दिले होते. तहाअंतर्गत व्हिएतनामची दक्षिण आणि उत्तर भागांत तात्पुरती विभागणी झाली. पुढे निवडणुका लढवून व्हिएतनामचे एकत्रीकरण करावे असेही सुचवले गेले. उत्तर व्हिएतनामचा ताबा हो चि मिन्ह यांच्याकडे होता. ते कम्युनिस्ट होते, त्यामुळे सोव्हिएत रशिया आणि चीन यांचे त्यांना समर्थन होते. अमेरिका आणि फ्रान्स यांच्या समर्थनाने दक्षिण व्हिएतनामचे शासक बनलेले न्गो दीन दिएम यांनी निवडणुका घेण्यास नकार दिला, कारण त्यांना पराभवाची भीती वाटत होती. हो चि मिन्ह यांच्याइतकी लोकप्रियता अमेरिका समर्थित न्गो दीन दिएम यांच्याकडे अजिबात नव्हती. हो चि मिन्ह हे सोव्हिएत रशिया आणि चीनच्या पाठिंब्याने संपूर्ण व्हिएतनामचा ताबा घेतील अशी भीती अमेरिकेला वाटत होता. तो काळ शीत युद्धाच्या उदयाचा होता. त्यामुळे दक्षिण व्हिएतनामला पाठिंबा देताना कम्युनिस्टांना रोखण्याचा मुद्दा अमेरिकेने प्रतिष्ठेचा बनवला. सुरुवातीस केवळ सल्लागार पाठवून, पण नंतर टप्प्याटप्प्याने सैनिक पाठवून तसे हवाई ताकदीचा अनिर्बंध वापर करत अमेरिका या युद्धात सहभागी झाली. ड्वाइट आयसेनहॉवर, जॉन एफ. केनेडी, लिंडन जॉन्सन, रिचर्ड निक्सन अशा चार अमेरिकी अध्यक्षांच्या कार्यकाळात अमेरिकी सैनिक व्हिएतनामला पाठवले गेले. आयसेनहॉवर यांनी सुरुवातीस लष्करी सामग्री आणि सल्लागारांच्या रूपात मदत पाठवली. केनेडी यांनी सल्लागारांची संख्या १६ हजारांवर नेली. पण त्यांच्या हत्येनंतर लगेचच व्हिएतकाँगचा प्रतिकार वाढू लागला. १९६४मध्ये व्हिएतकाँगच्या नौकांनी अमेरिकी युद्धनौकांवर हल्ले केल्याचे वृत्त आल्यानंतर त्यावेळी अध्यक्ष असलेले जॉन्सन यांनी प्रचंड प्रमाणावर अमेरिकी सैनिक व्हिएतनामला धाडले. १९६४ ते १९६९ या जॉन्सन कार्यकाळात ५,४३,००० अमेरिकी सैनिक व्हिएतनाम किंवा आसपासच्या देशांमध्ये पोहोचले. त्यांच्यानंतर आलेले निक्सन यांनी सुरुवातीस अमेरिकी सैनिक माघारी बोलावण्याची घोषणा केली. पण पुढे काहीच केले नाही. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात सर्वाधिक अमेरिकी सैनिक युद्धभूमीवर ठार झाले.

अमेरिकेचा पराभव का झाला?

तांत्रिकदृष्ट्या अमेरिकेने या युद्धातून माघार घेतली, पण त्यांचा पराभव झाला की नाही याविषयी मतभेद आहेत. पण त्यांनी ज्यांचा सर्वशक्तीनिशी विरोध केला ते हो चि मिन्ह पुढे एकत्रित व्हिएतनामचे शासक बनले. त्यांना सोव्हिएत रशिया आणि चीनचे समर्थन होते, त्यामुळे जगभरातील कम्युनिस्टांनी व्हिएतनाम युद्ध म्हणजे कम्युनिस्टांनी मुजोर भांडवलशाहीवर मिळवलेला विजय याच भावनेतून साजरे केले. अमेरिकेचे धोरण जवळपास पूर्णतया विस्कळीत होते. व्हिएतनाममधील जंगलांमध्ये लढण्याचा कोणताही अनुभव अमेरिकी सैनिकांकडे नव्हता. त्यांच्याकडे त्या काळातील आधुनिक युद्धसामग्री होती, पण ती व्हिएतनाममध्ये निर्णायक लढाया जिंकण्यासाठी कुचकामी ठरली. दुसऱ्या महायुद्धातील विजयाचा कैफ अमेरिकी शासकांमध्ये मोठ्या प्रमाणावर होता. त्यामुळे विशेषतः सोव्हिएत रशियाच्या मदतीने व्हिएतनाम, उत्तर कोरिया, क्युबा येथील बंडखोर किमान छुप्या युद्धांत किंवा गेरिला वॉरफेअरमध्ये अमेरिकी सैनिकांपेक्षा सरस ठरत होते हे वास्तव अमेरिकी शासकांनी आणि माध्यमांनी स्वीकारलेच नाही. हजारो अमेरिकी सैनिकांना त्यांच्या इच्छेविरुद्ध व्हिएतनामला धाडले गेले, त्यामुळे त्यांच्यात लढवय्या वृत्तीचा अभाव दिसून आला. उत्तर व्हिएतनामच्या सैनिक आणि बंडखोरांनी अमेरिकेला प्रत्युत्तर देताना स्थानिक मनुष्यहानी वा वित्तहानीची परवा केली नाही. एजंट ऑरेंजसारखी घातक रसायने, विध्वंसक बॉम्ब यांचा अतिरेकी वापर अमेरिकेने केला, त्यामुळे उत्तर व्हिएतनामप्रमाणेच दक्षिण व्हिएतनामच्याही स्थानिक जनतेचा विश्वास अमेरिकेला कधीही संपादता आला नाही. रशिया किंवा चीनचे सैनिक थेट युद्धात सहभागी नव्हतेच. उलट अमेरिकेने मात्र हे युद्ध प्रतिष्ठेचे बनवले, यात त्यांचे अतोनात नुकसान झाले.

युद्धाच्या जखमा

युद्धात अमेरिकेचे अधिकृतरीत्या ५८ हजारांहून अधिक सैनिक मरण पावले. ३ लाखांहून अधिक सैनिक जखमी झाले. जे परतले, त्यांच्या मनावर युद्धाने प्रचंड आघात केला. मानसिक तणाव, एकटेपणा, अपराधीपणा, हुरहूर, युद्धाविषयी भीती आणि तिटकारा अशा विकारांतून कित्येकांचे आयुष्य कायमस्वरूपी उद्ध्वस्त झाले. पोस्ट व्हिएतनाम सिंड्रोम, पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसॉर्डर अशा नवीन विकारांना या युद्धाने जन्म दिला. अमेरिकी जनतेचा लोकनियुक्त प्रतिनिधी आणि माध्यमांवरील विश्वास उडाला.

व्हिएतनामची हानीही अपरिमित झाली. जवळपास ३० लाखांहून अधिक नागरिक व सैनिक मृत्युमुखी पडले. अमेरिकेने एजंट ऑरेंजसारखे तणनाशक उत्तर व्हिएतनाममधील शेतांवर, जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणात हवाई माध्यमातून फवारले. त्यातून पिके तर जळालीच, पण घातक रसायनांमुळे माणसे मृत्युमुखी पडणे, कायमस्वरूपी विकलांग जन्माला येणे, कर्करोगग्रस्त होणे असेही प्रकार घडले. आजही नवीन पिढ्यांमध्ये त्या रसायनांमुळे व्यंगे निर्माण झालेली दिसून येतात. व्हिएतनाम युद्धामुळे आजूबाजूचे देश – विशेषतः कम्बोडिया, लाओस आणि म्यानमारमध्ये कम्युनिस्ट शासकांनी अनिर्बंध सत्ता उपभोगताना मोठ्या प्रमाणात वांशिक संहारही घडवून आणला. अमेरिकी हस्तक्षेपाचा हा अप्रत्यक्ष परिणाम मानला जातो.