अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षातून उमेदवारीसाठी पहिल्यापासून आघाडीवर असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी एक कॉकस आणि एका प्रायमरीनंतर आपली फळी अधिकच भक्कम केली आहे. त्यांना आता भारतीय वंशाच्या राजकारणी निकी हॅले यांचे एकमेव आव्हान उरले आहे. आता २४ तारखेला हॅले यांची जन्मभूमी-कर्मभूमी असलेल्या साउथ कॅरोलिना राज्यात प्रायमरी होणार आहेत. त्यांचे आव्हान यापुढेही कायम राहणार की ट्रम्प यांचा मार्ग प्रशस्त होणार हे येत्या महिन्याभरात समजणार आहे. कारण त्यानंतरच्या कॉकसेस आणि प्रायमरीजच्या किचकट प्रक्रियेतून मार्ग काढणे हॅले यांच्यासाठी सोपे नसेल.

न्यू हॅम्पशायरमधील निकालाचा अर्थ काय?

आयोवा कॉकसमध्ये ५१ टक्के मते आणि २० डेलिगेट्स (प्रतिनिधी) ट्रम्प यांच्या पदरात पडली होती. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी झालेल्या न्यू हॅम्पशायर प्रायमरीमध्ये त्यांना ५४ टक्के मते व १२ डेलिगेट्स मिळाले आहेत. त्यांच्या एकमेव प्रतिस्पर्धी निकी हॅले यांच्याकडे दोन्ही राज्यांतून प्रत्येकी ९ डेलिगेट्स आले आहेत. त्यामुळे दोन राज्यांतील प्राथमिक फेरीनंतर ट्रम्प यांच्याकडे ३२ आणि हॅलेंकडे १८ प्रातिनिधिक मते आहेत. न्यू हॅम्पशायरमध्ये प्रचंड पैसा खर्च करून आणि आक्रमक प्रचार करूनही ट्रम्प यांना मागे टाकणे हॅलेंना शक्य झालेले नाही. या निकालाने रिपब्लिकन पक्षातून माजी अध्यक्षांची उमेदवारी अधिक पक्की केली असली, तरी हॅले यांनी अद्याप माघार घेतलेली नाही. त्यामुळे आता २४ तारखेच्या दक्षिण कॅरोलिनातील प्रायमरीवर दोन्ही उमेदवारांनी लक्ष केंद्रित केले आहे.

iran women hijab
हिजाब न घातल्याने महिलांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण, इराणमध्ये नक्की काय घडत आहे?
Arvind Kejriwal
अरविंद केजरीवालांची शुगर लेव्हल ३२० वर, अखेर तुरुंगात पहिल्यांदाच दिलं इन्सुलिन
Orenthal James Simpson
स्पोर्ट्समन, सेलेब्रिटी… मग पत्नीची हत्या, निर्दोष मुक्तता तरी कफल्लक आयुष्य… ओ. जे. सिम्प्सन यांचे आजही अमेरिकेवर गारूड कसे?
arvind kjriwal jail tihar
अरविंद केजरीवाल करणार वर्क फ्रॉम जेल? काय आहेत कायदेशीर तरतुदी?

हेही वाचा : विश्लेषण : मराठा आरक्षण सर्वेक्षण कसे केले जाणार? प्रश्न कोणत्या स्वरूपाचे? आक्षेप काय? 

साउथ कॅरोलिनाची निवडणूक महत्त्वाची का?

हे निकी हॅले यांचे जन्मस्थान आहे. २०११ ते २०१७ या काळात त्या साउथ कॅरोलिनाच्या गव्हर्नर राहिल्या आहेत. आपल्या ‘होमपिच’वर ट्रम्प यांना धोबीपछाड देऊन आव्हान कायम ठेवण्याच्या इराद्याने त्या मैदानात उतरल्या आहेत. साउथ कॅरोलिनाचे निवडणूक नियमही हॅले यांच्यासाठी अनुकूल आहेत. या राज्यात कोणत्याही पक्षाचा नोंदणीकृत मतदार स्वत:च्या पक्षाऐवजी रिपब्लिकन प्रायमरीमध्ये मतदान करू शकतो. डेमोक्रेटिक पक्षात फारशी चुरस नसल्यामुळे हॅले या पक्षाच्या सदस्यांना आपल्याकडे वळवू शकतात. दक्षिण कॅरोलिनामध्ये ५० प्रातिनिधिक मते आहेत. आता केवळ दोनच उमेदवार रिंगणात असल्यामुळे जास्तीत जास्त डेलिगेट्स आपल्या पदरात पाडण्याची, शक्य झाल्यास ट्रम्प यांना मागे टाकण्याची हॅले यांची रणनीती आहे. असे झाल्यास त्यानंतरच्या अत्यंत गुंतागुंतीच्या कॉकस आणि प्रामयरीजमध्ये मतदारांवर प्रभाव पाडणे त्यांना शक्य होणार आहे.

हेही वाचा : विश्लेषण: भारतीय भांडवली बाजाराची जगात चौथ्या स्थानी झेप कशी?

कॉकस आणि प्रायमरीज किती किचकट?

अमेरिकेची निवडणूक प्रक्रिया ही अत्यंत गोंधळात टाकणारी आणि समजून घेण्यास किचकट आहे. पक्षांतर्गत निवडणुका दोन प्रकारे होतात. कॉकसमध्ये एखाद्या ठिकाणी मतदार एकत्र येऊन मतदान करतात. हे कॉकस पक्षातर्फे भरविले जातात. प्रायमरीमध्ये राज्य सरकारच्या वतीने मतदानाचे नियोजन केले जाते आणि तेथे सामान्य पद्धतीने मतदान केंद्रांवर मतदान होते. रिपब्लिकन आणि डेमोक्रेटिक पक्षाचे कॉकस आणि प्रायमरीजचे आपापले नियम आहेत. काही राज्यांत एका पक्षाची कॉकस असेल, तर दुसऱ्याची प्रायमरी असू शकेल. रिपब्लिकन पक्षातील पहिली पक्षांतर्गत निवडणूक आयोवा राज्यातील कॉकस असते. डेमोक्रेटिक पक्षात न्यू हॅम्पशायरच्या प्रायमरीने पक्षांतर्गत निवडणुकीचा नारळ वाढवला जातो. प्रत्येक राज्याला त्याची लोकसंख्या आणि महत्त्वानुसार डेलिगेट्स (प्रातिनिधिक मते) निश्चित करून दिली जातात. काही राज्यांमध्ये मतांच्या टक्केवारीनुसार हे डेलिगेट्स वाटून दिले जातात. तर काही राज्यांमध्ये सर्वाधिक मते मिळालेल्या उमेदवाराला सर्व डेलिगेट्स बहाल केले जातात. दक्षिण कॅरोलिनानंतर अन्य राज्यांमध्ये कॉकस किंवा प्रायमरीज होतील. जुलैमध्ये होणाऱ्या पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात उमेदवार ठरविण्यासाठी डेलिगेट्स मतदान करतात आणि त्यातून अंतिम विजेता निश्चित होतो.

हेही वाचा : विश्लेषण: शिष्यवृत्ती संकेतस्थळावरील नव्या पर्यायाने गोंधळ का उडाला?

राष्ट्रीय अधिवेशनापर्यंत उमेदवारी कशी टिकते?

क्रमाक्रमाने विविध राज्यांत पक्षांतर्गत निवडणुका होतात आणि त्यातून उमेदवारांना वर सांगिलेल्या नियमांच्या आधारे डेलिगेट्स मिळत राहतात. यात ‘सुपर ट्युसडे’ सर्वांत महत्त्वाचा असतो. यंदा ५ मार्चच्या मंगळवारी अनेक राज्यांच्या पक्षांतर्गत निवडणुका होणार आहेत. रिपब्लिकन पक्षातील ३६ टक्के डेलिगेट्स या एकाच दिवशी निवडले जातील. (अर्थात तोपर्यंत हॅले तग धरून राहिल्या तरच…) राष्ट्रीय अधिवेशनापर्यंत उमेदवारी टिकवायची असेल, तर किमान १,२१५ डेलिगेट्स उमेदवाराकडे असावे लागतात. प्राथमिक फेऱ्यांदरम्यान माघार घेतलेल्या उमेदवारांचे डेलिगेट्स त्यांच्याकडेच राहतात. अधिवेशनात पहिल्या फेरीत आपल्या उमेदवाराला मतदान करणे या डेलिगेट्सना बंधनकारक असते. मात्र दुसऱ्या फेरीपासून ते आपल्या इच्छेने मतदान करू शकतात. सध्या रॉन डिसँटिस आणि विवेक रामस्वामी या दोन माघार घेतलेल्या उमेदवारांकडे काही डेलिगेट्स आहेत. या दोघांनी ट्रम्प यांना पाठिंबा जाहीर केला असला, तरी त्यांची प्रातिनिधिक मते आपल्या खिशात टाकण्यासाठी ट्रम्प यांना राष्ट्रीय अधिवेशनापर्यंत वाट बघावी लागेल. मात्र ट्रम्प किंवा हॅले यांच्यापैकी एकाने माघार घेतली तर सर्व डेलिगेट्स आपोआप एकमेव उमेदवाराकडे वळतील. आता दक्षिण कॅरोलिना आणि ‘सुपर ट्युसडे’ला हॅले ट्रम्प यांना किती टक्कर देतात यावर निवडणुकीचे पुढचे चित्र अवलंबून असेल.

amol.paranjpe@expressindia.com