कर्नाटकात सध्या दुधावरून युद्ध सुरू आहे. अमूलने कर्नाटकात आपली उत्पादने लॉन्च करण्याबाबत बोलताच वाद सुरू झाला. राज्यातील जनतेने आपला स्थानिक ब्रँड नंदिनी वाचवण्यासाठी मोहीम सुरू केली. अमूल बॉयकॉटचा आवाज जोरात येऊ लागला. कर्नाटकात सुरू झालेल्या दुधाच्या लढाईने राजकीय रंग घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नंदिनी हे नाव कसे पडले?

कर्नाटक दूध महासंघाच्या स्थापनेनंतर दुग्धजन्य पदार्थ झपाट्याने वाढू लागले. कंपनीला ब्रँड नावाची गरज भासू लागली. खूप सर्वेक्षण आणि संशोधनानंतर १९८३ साली नंदिनी हे नाव ठरवण्यात आलं. दुग्धजन्य पदार्थाचे नाव पवित्र गायीच्या नावावरून नंदिनी ठेवण्यात आले. नंदिनी ब्रँड कर्नाटकातील सर्वात मोठा ब्रँड बनला. त्याची पकड २२००० गावांपर्यंत जाऊन पोहोचली. २४ लाखांहून अधिक शेतकरी आणि पशुपालक नंदिनीशी संबंधित आहेत. कंपनी दररोज ८४ लाख लिटर दूध खरेदी करते. सध्या कंपनीकडे ६५ हून अधिक उत्पादने आहेत, जी बाजारात वर्चस्व गाजवत आहेत.

अमूल विरुद्ध नंदिनी वाद?

नंदिनीची उत्पादने खूप स्वस्त आहेत. अमूलच्या दूध किंवा दह्याशी तुलना केली तर त्यातील उत्पादने खूपच स्वस्त आहेत. अमूल टोन्ड दुधाची एक लिटर किंमत ५४ रुपये तर नंदिनी दुधाची किंमत ३९ रुपये आहे. म्हणजे नंदिनीचे दूध अमूलच्या तुलनेत १५ रुपयांनी स्वस्त आहे. आता दह्याबद्दल बोलायचे झाले तर नंदिनी दह्याच्या एक किलोच्या पॅकची किंमत ४७ रुपये आहे, तर अमूलची किंमत ६६ रुपये आहे. किमतीव्यतिरिक्त अमूल आणि नंदिनीची इतर गोष्टींमध्ये तुलना केली जाते.

…म्हणून नंदिनीचे दूध स्वस्त मिळते

नंदिनीची उत्पादने स्वस्त आहेत, त्यामागचे मोठे कारण म्हणजे सबसिडी. वास्तविक कर्नाटक सरकार यावर सबसिडी देते, त्यामुळे नंदिनीची उत्पादने स्वस्त होतात. २००८ मध्ये येडियुरप्पा सरकारने एका लिटर दुधावर २ रुपये अनुदान दिले होते. यानंतर सिद्धरामय्या यांचे सरकार आल्यावर त्यांनी सबसिडी दुप्पट करून ४ रुपये केली. २०१३ मध्ये पुन्हा येडियुरप्पा यांचे सरकार आल्यावर अनुदान ६ रुपये करण्यात आले. अधिक सबसिडी मिळाल्याने त्याची उत्पादने स्वस्त आहेत. बंगळुरूमधील ७० टक्के दुधाचा बाजार नंदिनीने व्यापला आहे.

कर्नाटकात नंदिनीचा खप किती?

नंदिनी नावाखाली ताजे दूध आणि दहीसह दुग्धजन्य पदार्थ विकले जातात. कर्नाटक कोऑपरेटिव्ह मिल्क प्रोड्युसर्स फेडरेशन लिमिटेड (KMF) ही कर्नाटकातील दुग्ध सहकारी चळवळीची सर्वोच्च संस्था आहे जी दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री करते. कर्नाटक दूध महासंघा (KMF)कडे डॉ. राजकुमार, उपेंद्र आणि पुनीत राजकुमार यांसारखे लोकप्रिय अभिनेते ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून गेल्या काही वर्षांपासून आहेत. नंदिनी हे कर्नाटकात घराघरात पोहोचलेले नाव आहे आणि कदाचित अनेक कुटुंबांसाठी ती ‘भावना’ आहे. KMF नं पहिली डेअरी १९५५ मध्ये कोडागू जिल्ह्यात बनवली आणि १९८४ पर्यंत फेडरेशनच्या लोकप्रियतेमुळे १४ जिल्हा दूध संघ होते. कर्नाटक दूध महासंघा (KMF)कडे आता कर्नाटकातील सर्व जिल्ह्यांचा समावेश असलेल्या १६ दूध संघ आहेत आणि ते राज्यातील विविध शहरे/ग्रामीण बाजारपेठेतील ग्राहकांना वितरित करण्यासाठी प्राथमिक दुग्ध सहकारी संस्थांकडून (DCS) दूध खरेदी करतात. गावपातळीवरील DCS आणि जिल्हा स्तरावरील जिल्हा दूध संघ (जसे की बंगळुरू, हावेरी, बेळगाव हसन दूध संघ) दुधाची खरेदी, प्रक्रिया आणि विपणन व्यवस्थापित करतात. ते राज्यातील दुग्ध क्षेत्राच्या वाढीस समन्वय साधण्यासाठी उत्पादक स्तरावर आणि राज्य स्तरावर फेडरेशनला दूध उत्पादन वाढविण्यासाठी तांत्रिक इनपूट सेवा प्रदान करतात. रामनगरा, चन्नापटना, कोलार, मंड्या, म्हैसूर आणि चामराजनगर यांसारख्या जिल्ह्यांमध्ये कर्नाटकातील दुग्धशाळेची बाजारपेठ मजबूत आहे, कारण या प्रदेशांतील शेतकरी मोठ्या प्रमाणात त्यांच्या उपजीविकेसाठी दुग्धव्यवसायावर अवलंबून आहेत. बंगळुरूमध्ये सुमारे २५ लाख लिटर दूध विकले जाते, जे प्रामुख्याने मंड्या तुमकूर, कोलार आणि आसपासच्या भागांसारख्या सहकारी संस्थांकडून मिळते.

नंदिनी आपले ताजे दुधाचे उत्पादन किती किमतीला विकते?

सरकार दूध उत्पादकांकडून ३३ रुपये प्रतिलिटर (नेहमीच्या ३१ रुपये प्रति लिटरवरून तात्पुरती व्यवस्था) दूध खरेदी करते आणि दूध (ज्यामध्ये ३% फॅट आणि ८.५% घन-नॉट-फॅट असते) ४० रुपये दराने विकते. जिल्हा दूध संघांनी खरेदी दरात किमान ५ रुपयांनी वाढ करण्याची मागणी केली आहे आणि दुग्ध उत्पादकांना मदत करण्यासाठी आणि महाग ऑपरेटिंग खर्च भागवण्यासाठी सरकारने ग्राहकांना दुधाची ५० रुपयांना विक्री करावी, अशी मागणी केली आहे. KMF च्या सदस्यांच्या मते, नंदिनीकडे कर्नाटकातील दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या बाजारपेठेतील ९० टक्क्यांपेक्षा जास्त हिस्सा आहे.

हेही वाचाः विश्लेषण : नवीन कर प्रणालीकडे जावे का?, कोणती कर रचना तुमच्यासाठी फायदेशीर, जाणून घ्या

कर्नाटकातील ताज्या दुधाच्या बाजारपेठेत अमूलचा वाटा किती ?

ताज्या दुधाच्या बाजारपेठेत कर्नाटक दूध महासंघाचे नंदिनी दूध प्रबळ प्रतिस्पर्धी आहेत, तर अमूलचे ताज्या दुधाच्या बाजारपेठेत तिसरे किंवा कधी कधी चौथे स्थान आहे. अमूलने दूध विक्रीसाठी बंगळुरूमध्ये प्रवेश करण्याची योजना आखली असली तरी गुजरातचा हा ब्रँड गेल्या आठ वर्षांपासून बेळगाव आणि हुबळी येथे ताजे दूध विकत आहे. अमूलचे व्यवस्थापकीय संचालक जयेन मेहता यांच्या म्हणण्यानुसार, कंपनी दोन शहरांमध्ये दररोज ६०००-८००० लिटरची विक्री करते, त्या तुलनेत नंदिनी १.२५-१.३ लाख लिटर दूध प्रतिदिन विकते. अमूलचे ताजा दूध ५४ रुपये प्रति लिटर आहे, तर नंदिनीच्या तुलनेत १४ रुपयांनी महाग आहे.

या वादावर केएमएफचे काय म्हणणे?

KMF चे अध्यक्ष बालचंद्र जारकीहोळी यांनी अमूल आणि नंदिनी यांचे विलीनीकरण नाकारले. KMFच्या मालकीच्या नंदिनीला अमूल किंवा ताजे दूध आणि दही विकणार्‍या कोणत्याही खासगी ब्रँडकडून कोणताही धोका नसल्याचं त्यांनी सांगितलं. जारकीहोळी म्हणाले, “बंगळुरूमध्ये आधीच १० खासगी ब्रँड दूध विकत आहेत. इतकं सगळं असूनही नंदिनीशी कोणीही स्पर्धा करू शकत नाही, कारण किमतीच्या मुद्द्यामुळे नंदिनी स्वस्त दरात दूध विकते. कृत्रिम टंचाईच्या आरोपांना उत्तर देताना जारकीहोळी म्हणाले की, यंदा केएमएफने उन्हाळ्यात आतापर्यंत ७५ लाख लिटर दूध संकलन केले आहे, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे ६०,००० लिटर कमी आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amul nandini cold war in karnataka what is the presence of the two brands in the dairy market vrd
First published on: 14-04-2023 at 21:02 IST