scorecardresearch

Premium

विश्लेषण : वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे, आयर्लंड यांना मागे सारत नेदरलँड्स विश्वचषकासाठी पात्र कसे ठरले?

नेदरलँड्सच्या संघाने अनपेक्षित यश संपादन करताना एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश मिळवला. त्यांचा विश्वचषक पात्रतेचा प्रवास कसा राहिला, याचा आढावा.

Netherland Cricket Team
विश्लेषण : वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे, आयर्लंड यांना मागे सारत नेदरलँड्स विश्वचषकासाठी पात्र कसे ठरले? (छायाचित्र – नेदरलँड क्रिकेट ट्विटर)

– ज्ञानेश भुरे

नेदरलँड्सच्या संघाने अनपेक्षित यश संपादन करताना एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश मिळवला. नेदरलँड्सने वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे, आयर्लंड आणि स्कॉटलंड यांसारख्या संघांना पात्रता स्पर्धेत मागे सोडताना भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकात स्थान मिळवले. या कामगिरीने त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरची एक पायरी चढली असे मानता येईल. नेदरलँड्स संघाचा विश्वचषक पात्रतेचा प्रवास कसा राहिला, याचा आढावा.

IND vs AUS: Ashwin makes a brilliant comeback in the World Cup after eight years gets a chance against Australia
IND vs AUS, World Cup: अश्विनचे आठ वर्षांनंतर विश्वचषकात शानदार पुनरागमन, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात मिळाली संधी
South Africa vs SriLanka odi match world cup
world cup 2023, SA vs SL: दक्षिण आफ्रिकेची श्रीलंकेशी सलामी
World Cup 2023 Updates
World Cup 2023: भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! दुखापतीमुळे ‘या’ दिग्गज खेळाडूचे खेळणे कठीण
Yuvraj Singh revealed 2011 World Cup
World Cup 2011: ‘वृत्तपत्र वाचणे, टीव्ही पाहणे बंद करा’; ‘या’ खेळाडूच्या सल्ल्यामुळे भारताने जिंकला विश्वचषक, युवराज सिंगचा खुलासा

विश्वचषक पात्रता स्पर्धेत नेदरलँड्स संघाची कामगिरी कशी राहिली?

पात्रता स्पर्धेत नेदरलँड्सची सुरुवात अपयशी ठरली होती. पहिल्या सामन्यात नेदरलँड्सला यजमान झिम्बाब्वेकडून पराभव पत्करावा लागला होता. मात्र, त्यानंतर ते केवळ एकच सामना श्रीलंकेविरुद्ध हरले. अमेरिका, नेपाळ आणि वेस्ट इंडिज यांच्याविरुद्ध साखळी फेरीतील सर्व सामने त्यांनी जिंकले. विंडीजवर त्यांनी सुपर ओव्हरमध्ये विजय नोंदवला. त्यानंतर ‘सुपर सिक्स’ फेरीत श्रीलंकेविरुद्ध पराभूत झाल्यानंतर ओमान आणि स्कॉटलंडविरुद्धचे सामने जिंकून नेदरलँड्सने विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता मिळवली.

किती वर्षांनी नेदरलँड्सचा संघ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे?

नेदरलँड्सचा संघ भारतात १९९६ मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत प्रथम खेळला होता. त्यानंतर २००३, २००७ व २०११ मध्ये झालेल्या सलग तीन स्पर्धांत त्यांनी पात्रता फेरीचा अडथळा पार करून मुख्य फेरीत प्रवेश मिळवला होता. त्यानंतर दोन स्पर्धेत त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले. या वेळीही निराशाजनक कामगिरीनंतर अखेरच्या क्षणी खेळ उंचावून त्यांनी मुख्य फेरीत प्रवेश मिळवला. म्हणजेच तब्बल १२ वर्षांनी नेदरलँड्स संघ विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरला.

पात्रता फेरीतील नेदरलँड्सच्या कामगिरीचे वैशिष्ट्य काय?

पात्रता फेरीत नेदरलँड्स, यजमान झिम्बाब्वे आणि स्कॉटलंड संघांची कामगिरी समांतर सुरू होती. पण, दोन वेळच्या विजेत्या वेस्ट इंडिजला सुपर ओव्हरमध्ये हरवून त्यांनी इतिहास रचला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत ३५० धावांपर्यंत पोहोचू न शकलेल्या नेदरलँड्स संघाने या सामन्यात विंडीजच्या ३७४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग केला. पात्रता फेरीतील हा विजय नेदरलँड्ससाठी सर्वोच्च ठरला. या विजयाने प्रेरित झालेल्या नेदरलँड्सने मग ‘सुपर सिक्स’ फेरीच्या अखेरच्या स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात धावांचे समीकरण सहज पार केले.

नेदरलँड्स संघाची ताकद कशात दिसून आली?

फलंदाजी हीच नेदरलँड्स संघाची या स्पर्धेतील ताकद दिसून आली. यातही त्यांच्या कामगिरीत विक्रमजीत सिंग आणि तेजा निदामानुरू या मूळ भारतीय खेळाडूंचा वाटा महत्त्वाचा होता. स्पर्धेत नेदरलँड्सकडून तीन शतके झळकावण्यात आली. यामधील दोन शतके या दोघांनी झळकावली. बास डी लीडे हा त्यांचा तिसरा शतकवीर फलंदाज ठरला. या तिघांखेरीज स्कॉट एडवर्ड्स, मॅक्स ऑडॉड आणि वेस्ली बरेसी यांनीही आपला ठसा उमटवला. गोलंदाजीत नेदरलँड्सचे गोलंदाज फारशी प्रभावी कामगिरी दाखवू शकले नाहीत. पण, यातही लीडेच्या कामगिरीला विसरता येणार नाही. माजी विजेत्या वेस्ट इंडिजला हरवताना आणि धावांच्या समीकरणाचे आव्हान असलेल्या स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात लीडेची गोलंदाजीही निर्णायक ठरली होती. स्कॉटलंडविरुद्ध त्याने शतक आणि पाच बळी अशी निर्णायक कामगिरी केली. नेदरलँड्सचे क्षेत्ररक्षणही या स्पर्धेत चर्चेत राहिले.

मुख्य फेरीत नेदरलँड्सचे आव्हान कसे राहील?

मुख्य फेरीतील पात्रतेनंतर आजपर्यंत नेदरलँड्स संघाला साखळी फेरीचाही अडथळा पार करता आलेला नाही. विश्वचषकाच्या पदार्पणात १९९६ मध्ये ते अखेरच्या १२व्या स्थानावर राहिले. त्यानंतर २००३मध्ये १४ संघांत ११व्या, २००७ मध्ये १६ संघांत १२व्या आणि २०११मध्ये १४ संघांत ते १३व्या स्थानावर राहिले. यामुळे सातत्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या संघांसमोर याही वेळी नेदरलँड्सचे आव्हान कसे टिकून राहील हे येणाऱ्या स्पर्धेतच दिसून येईल.

हेही वाचा : विश्लेषण : बेअरस्टोला बाद करण्याच्या पद्धतीवरून इतका वाद का? ऑस्ट्रेलियाची कृती खिलाडू वृत्तीला धरून होती का?

नेदरलँड्स संघात आंतरराष्ट्रीय स्तरावर टिकून राहण्याची क्षमता आहे का?

या प्रश्नाचे उत्तर या एका कामगिरीवरून देणे निश्चित कठीण आहे. नुसती गुणवत्ता पुरेशी नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर टिकण्यासाठी या गुणवत्तेला, क्षमतेला अनुभवाची जोड मिळणे आवश्यक आहे. या आघाडीवरच नेदरलँड्स खूप मागे आहे. ‘आयसीसी’मध्ये सहयोगी सदस्य म्हणून हा संघ खेळतो. ‘आयसीसी’ने नेदरलँड्सला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्याचा दर्जा दिला आहे. पण, त्यांना प्रमुख देशांविरुद्ध फारसे खेळायलाच मिळत नाही. या वेळच्या पात्रता फेरीत श्रीलंका, वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे या सातत्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या संघांविरुद्ध खेळण्याची संधी त्यांना मिळाली. या संधीचे त्यांनी सोने केले आहे. आता या सोन्याला झळाळी आणण्याचे आव्हान त्यांना मुख्य फेरीत आहे. भारतात होणाऱ्या स्पर्धेत त्यांचे प्रस्थापितांना धक्का देण्याचे लक्ष्य असेल.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Analysis how netherland qualified for the icc odi world cup print exp pbs

First published on: 12-07-2023 at 11:25 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×