राखी चव्हाण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय हवामान खात्याने नुकताच नोव्हेंबर महिन्याच्या हवामानाचा अंदाज जाहीर केला. त्यामध्ये कमाल व किमान तापमानासह नोव्हेंबर महिन्यात देशातील पावसाची स्थिती कशी असेल याबाबत सांगण्यात आले. त्यानुसार यंदा नोव्हेंबर महिन्यात देशातील किमान तापमान सरासरीच्या वर जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातसुद्धा किमान तापमान अधिक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात थंडीचे प्रमाण कमी राहणार आहे. त्याच वेळी काही राज्यांमध्ये पावसाचीदेखील शक्यता वर्तवण्यात आली आहे.

थंडीचा जोर केव्हा वाढणार?

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार नोव्हेंबर महिन्यात कमाल आणि किमान तापमानात घट होणार आहे. त्यामुळे थंडी कमी राहणार आहे. या अंदाजानुसार नोव्हेंबर महिन्यात देशातील किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातही किमान तापमान अधिक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात थंडीचे प्रमाण कमी असेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. नोव्हेंबर महिनाच्या अखेरीस मात्र थंडीचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हेही वाचा >>> रस्ते अपघातांमुळे प्रत्येक तासाला १९ लोकांचा मृत्यू; रस्ते अपघात अहवालातून धक्कादायक आकडेवारी समोर

हिवाळा लांबणीवर जाण्यामागील कारण?

वातावरणात सातत्याने होणाऱ्या बदलांमुळे यंदा थंडी पडायला आणखी काही आठवडे वाट पाहावी लागणार आहे. मागील काही दिवस तुरळक प्रमाणात पडलेला पाऊस तसेच यंदाच्या पावसाचा परतीचा प्रवास आणि इतर बाबींमुळे यंदा हिवाळा लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरच्या पूर्वार्धात गुलाबी थंडीला सुरुवात झाली असली, तरीही कडाक्याच्या थंडीसाठी मात्र वाट पाहावी लागणार आहे, असे हवामान अभ्यासकांचे म्हणणे आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर हा मान्सूनोत्तर कालखंड मानला जातो. येत्या काही दिवसांत राज्यातील कमाल तापमानात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. तरीही थंडीसाठी वाटच पाहावी लागणार आहे.

नोव्हेंबरमध्येही पावसाची शक्यता का?

या वर्षी नोव्हेंबर महिन्यात थंडीचा जोर काहीसा कमी राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तरीही राज्यातील काही भागांत रिमझिम पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. अरबी समुद्र आणि प्रामुख्याने केरळच्या समुद्रकिनारपट्टीलगत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे केरळ आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचाच परिणाम राज्यातील वातावरणावर होत असल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात काही भागात पावसाची रिमझिम सुरूच राहणार आहे.

हेही वाचा >>> केरळचे कोझिकोड ठरले भारताचे पहिले ‘साहित्यिक शहर’; युनेस्कोकडून शहरांना कलेचा दर्जा कसा देण्यात येतो?

नोव्हेंबर महिन्यात कुठे कुठे पाऊस पडतो?

नोव्हेंबर महिन्याच्या काळात दक्षिणेकडील राज्यांमध्ये अधिक पाऊस पडतो. तर भारतीय हवामान खात्याच्या १९७१ ते २०२० दरम्यानच्या दीर्घकालीन सरासरीनुसार दक्षिण भारतात नोव्हेंबर महिन्यात ११८.७ मिलिमीटर इतका पाऊस पडतो. यंदा नोव्हेंबर महिन्यातील पावसाचा अंदाज पाहता, दक्षिणेकडील बऱ्याच भागांसह, ईशान्य, पूर्व मध्य आणि पश्चिमेकडील काही भागांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस अपेक्षित आहे.

सध्याचे वातावरण कसे?

ऑक्टोबरच्या शेवटच्या आणि नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात राज्यातील तापमानात कमालीचा बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. संपूर्ण ऑक्टोबर महिन्यात ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा दिसून आला. उन्हामुळे आणि उकाडय़ाने नागरिक त्रस्त झाले. आता पहाटे आणि रात्री हवेत गारठा असला तरी सूर्यनारायणाचे आगमन होताच थंडी गायब होते. त्यामुळे दुपारी उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. नोव्हेंबर महिन्यात तापमानाचा पारा खाली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे थंडी आहे की उकाडा अशाच भ्रमात नागरिक आहेत.

अलनिनोच्या प्रभावामुळे काय होणार?

अलनिनोच्या प्रभावामुळे देशातील बहुतेक भागात नोव्हेंबरमध्ये तापमान सामान्यापेक्षा जास्त राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पॅसिफिक आणि हिंदूी महासागरांवरील समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानातील बदलांचा भारतीय द्वीपकल्पातील हवामानवरदेखील परिणाम होतो. भारतीय हवामान खात्यानुसार, पूर्व हिंदू महासागराच्या तुलनेत पश्चिम हिंदू महासागराचे तापमान वाढणे आणि थंड होणे याला हिंदू महासागर द्विध्रुव म्हणतात. यालाच भारतीय निनो असेही म्हणतात. याचा मान्सूनवर सकारात्मक तसेच नकारात्मक प्रभाव पडतो.

rakhi.chavhan@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Analysis of imd predicts maharashtra normal temperatures above in november print exp zws
First published on: 04-11-2023 at 00:39 IST