पुणे : एल-निनोचा परिणाम म्हणून एप्रिल महिन्यात जगभरातील तापमान सरासरीपेक्षा अधिक नोंदविले गेले. उष्णतेच्या लाटा अधिक तीव्र आणि असह्य झाल्या. जागतिक तापमानवाढ सलग ११ महिने कायम राहिली, असे निरीक्षण जागतिक हवामान संघटनेने (डब्ल्यूएमओ) नोंदविले आहे.

जागतिक हवामान संघटनेने कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिस आणि अमेरिकेच्या नॅशनल ओशनिक ॲण्ड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशनच्या (नोआ) मासिक अहवालातील निरीक्षणांचा उल्लेख करून म्हटले आहे. प्रशांत महासागरातील एल-निनोच्या स्थितीमुळे जगभरात तापमानवाढीचा कल कायम आहे. जगाच्या कानाकोपऱ्यांत विक्रमी तापमानाची नोंद होत आहे. यापूर्वी २०१५-१६ मध्ये प्रभावशाली एल-निनो सक्रिय असताना, अशाच प्रकारच्या तापमानवाढीचा सामना करावा लागला होता.

हेही वाचा – राज्यात पुन्हा गारपिटीची शक्यता, कोणत्या जिल्ह्यांसाठी गारपिटीचा इशारा?

एप्रिल महिना आजवरचा सर्वांत उष्ण एप्रिल महिना ठरला आहे. जगभरात सलग ११ महिने तापमानवाढीचा कल कायम राहून, जागतिक तापमान सरासरीपेक्षा जास्त नोंदविले गेले. या काळात उत्तर गोलार्धातील हिमाच्छादित क्षेत्रही कमी राहिले. समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमानही सरासरीपेक्षा जास्त नोंदविले गेले.

जगभरात पृष्ठभागावरील हवेचे सरासरी तापमान एप्रिल महिन्यात १५.०३ अंश सेल्सिअस राहिले. १९९१ ते २०२० मधील सरासरी तापमानापेक्षा ते ०.६७ अंश सेल्सिअसने जास्त होते. एल-निनो सक्रिय असताना २०१६ मध्ये हेच तापमान सरासरीपेक्षा ०.१४ अंश सेल्सिअसने जास्त नोंदविले गेले होते. तर जगभरात एप्रिल महिन्यातील तापमान १८५० ते १९०० या काळातील सरासरीच्या तुलनेत १.५८ अंश सेल्सिअसने जास्त नोंदविण्यात आले.

हेही वाचा – खरीप हंगामासाठी मुबलक खते… राज्याला किती खत मिळणार?

दक्षिण अमेरिकेने आजवरचा सर्वाधिक उष्ण एप्रिल अनुभवला, तर युरोपात दुसऱ्या क्रमाकांचा सर्वांत उष्ण महिना म्हणून यंदाच्या एप्रिलची नोंद झाली आहे. उत्तर गोलार्ध आणि युरोशियात (युरोप आणि आशिया) आजवरच्या सर्वांत कमी हिमाच्छादित क्षेत्राची नोंद झाली आहे. पूर्व रशिया आणि चीनच्या काही भागात सरासरीपेक्षा जास्त हिमाच्छादित क्षेत्राची नोंद झाली आहे. समुद्रातील बर्फ प्रमाणही सरासरीपेक्षा कमी राहिले.

आशियाला उष्णतेच्या लाटांचा तडाखा

आशिया खंडातील बहुतेक भागात एप्रिलमध्ये सरासरीपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली. सातत्याने येणाऱ्या उष्णतेच्या लाटांचा सामनाही करावा लागला. उष्णतेच्या झळांचा लाखो लोकांना फटका बसला. असंघटित किंवा पुरेशा पायाभूत सुविधा नसलेल्या लोकांचे उष्णतेच्या झळांमुळे जास्त नुकसान झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अतिवृष्टीमुळे जीवितहानी

एप्रिल महिन्यात दक्षिण आफ्रिकेला दुष्काळ आणि अरबी देशांना अतिवृष्टीचा फटका बसला. पूर्व आफ्रिका आणि दक्षिण ब्राझिलला अतिवृष्टीमुळे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महापुराचा सामना करावा लागला. अफगाणिस्तानमध्ये मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील पुरामुळे मोठी जीवितहानी झाली.